(हास्यदिना निमित्त हास्य विषयावर एक गंभीर कविता)
तणावात जगत मीच टाकलय मला वाळीत
दान म्हणून हसू टाका एक पसा झोळीत
दिवाळखोर अमीर वस्ती भीक नाही मिळत
हसावं कसं हेच मुळी त्यांना नाही कळत
बाकी उतलंय हसू आता गरिबांच्याच चाळीत
दान म्हणून हसू टाका एक पसा झोळीत
जीव झाला स्पर्धायुगी खूप खूप बेजार
हास्याच्या कमतरतेचा पसरलाय आजार
शोध लावुन भरा हसू औषधाच्या गोळीत
दान म्हणून हसू टाका एक पसा झोळीत
हास्यक्लबात जाउन कधी मिळतय का हसू?
आतून हसू फुलवण्याला कंबर थोडी कसू
नाही तर हसू उरेल कवितेच्याच ओळीत
दान म्हणून हसू टाका एक पसा झोळीत
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail -- nishides1944@yahoo.com