कोंबडीचे सुके

  • बिनहाडी कोंबडी अर्धा किलो
  • आले-लसूण-हळद बारीक वाटण चार मोठे चमचे
  • पाच खरडलेल्या हिरव्या मिरच्या
  • घट्ट दही पाच मोठे चमचे
  • मिरी आणि शहाजिरे प्रत्येकी एक मोठा चमचा
  • दालचिनी सात मोठे तुकडे
  • तमालपत्रे दहा
  • मध्यम आकाराचे कांदे दोन
  • तेल एक मोठा डाव
  • मीठ
  • कोथिंबीर
६ तास
तीन जणांना पोटभर

बिनहाडी कोंबडी स्वच्छ घुऊन घ्यावी.
तीन चमचे घट्ट दह्यामध्ये तीन चमचे हळद-आले-लसूण बारीक वाटण आणि पाच खरडलेल्या हिरव्या मिरच्या घालून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण कोंबडीला व्यवस्थित लावून पाच तास मुरवत ठेवावे.
त्यानंतर कांदा बारीक कापून घ्यावा.
लोखंडी तवा मोठ्या ज्योतीवर गरम करून त्यावर मिरी भाजायला घ्यावीत. ज्योत मध्यम करून त्यात दालचिनी हाताने तुकडे करून घालावी. तमालपत्रांचेही तुकडे करून त्यात घालावेत. खमंग वास सुटल्यावर (पाच-सात मिनिटांनी) त्यात शहाजिरे घालून ज्योत बारीक करावी आणि पाच मिनिटे हलवत राहावे. ज्योत बंद करावी. हे मिश्रण गार झाल्यावर खलबत्त्यात बारीक कुटून घ्यावे.
कढईत तेल घालून धुरावेपर्यंत तापवावे.
धुरावल्यावर त्यात कांदा घालून रंग बदलेस्तोवर पटापट परतावा. कुटलेले मिश्रण घालून ज्योत बारीक करावी. सगळे नीट सारखे करून त्यात मुरवत ठेवलेली कोंबडी घालावी. मसाला सर्वत्र लागेलसे परतावे.
उरलेल्या दह्यात उरलेले हळद-आले-लसूण वाटण घालून त्यात दोन वाट्या पाणी घालून एकजीव करावे. हे कढईत घालावे. ज्योत मोठी करून दोन-तीन मिनिटे हलवावे. चवीनुसार मीठ घालून ज्योत बारीक करून झाकण न ठेवता सर्व द्रवमसाला आळेपर्यंत शिजवावे. मधून मधून हलवत राहावे.
कोंबडी शिजल्यावर ज्योत बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी

एक वेगळी चव पाहिजे असेल तर एक वाटी शेंगदाणे तव्यावर भाजून घ्यावेत. सालांसकट भरड कुटावेत आणि शिजलेल्या कोंबडीवर कोथिंबीरीबरोबर घालावेत.
अन्यथा सोबत कांदा काकडी कोशिंबीर द्यावी. त्याची कृतीः
कांदा आणि काकडी बारीक कापून घ्यावी.
त्यात हिरवी मिरची (आवडीनुसार) बारीक कातरून घालावी.
त्यात दाण्यांचे भरड कूट आणि मीठ घालावे आणि सारखे करावे.
वरून साजुक तुपात जिऱ्याची फोडणी करून घालावी (ऐच्छिक).
सायीचे घट्ट दही घालून सारखे करावे (ऐच्छिक).