वाट कुणाची बघते?

नटुनी थटुनी, फुले माळुनी वाट कुणाची बघते?
बावरते अन् अधीर होते लटके लटके रुसते
भेटायाची ओढ मनी पण लाज आडवी येई
साजन येता ती शरदाच्या चांदण्यास पांघरते

तिच्या भोवती वसंत उमले गंध पसरणारा
कुंतल काळे भुरभुर उडवी चटावलेला वारा
सौंदर्याची खाण अशी ती शुक्रतारका जणू
धरतीवरती आली उजळण्या आसमंत
सारा

मंदिरात ती जाता जमते भक्तजनांची गर्दी
तिच्यामुळे नास्तिकही बनले भगवंताचे दर्दी
झपाटली वस्तीच अशी की नवल वाटते मजला
तिला जराशी शिंक आली तर गावा होते सर्दी

शब्द जुळवतो तिच्याचसाठी लिहितो कविता, गजला
जागत असतो रात्र रात्र मी दीप कधी ना विझला
विरान ह्रदयी शुष्क कोपरा सदैव नांदत होता
दाद तिची मिळता गजलेला चिंब चिंब तो भिजला

कसे आगळे जगावेगळे तिचे
नि माझे नाते?
ती दवबिंदू, मी गवताचे थरथरणारे पाते
वास्तवात ती लाख नसूदे, सदैव येते स्वप्नी
रेशिम धाग्यांनी नात्याचा गोफ गुंफुनी जाते

हा
एक प्रयोग केला आहे. रचनेमधील पाचही कडवी चारोळी म्हणून वचली जाऊ शकतात.
पण सर्व चारॉळ्या एकाच विषयावर असल्यामुळे ही समग्र कविताही होते या
भावनेतून सादरीकरण केलंय. जाणकार्/सूज्ञ वाचकांनी यावर मतप्रदर्शन करावे.

निशिकांत
देशपांडे  मो. क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail--  nishides1944@yahoo.com