संध्याकाळ होता,
लागतात दिवे
जाती घरट्यात
पाखरांचे थवे
क्षितिज मेंदीचे
शून्यात लोपते
दमलेली आशा
वाटेत झोपते
डोंगर दूरचे
काळोखात न्हाती
गाणे अंधाराचे
रातकिडे गाती
घाटाघाटातून
एस्टी बस येते
पांगलेल्या देहां
घरांकडे नेते
घर नसलेले
हाटेलात जाती
टीव्ही पाहताना
उपास मोडती
नांगर टेकता
जमे पिलावळ
येई कुणब्याला
प्रेमाची भोवळ
टाळ ढोल आणि
पेटीचा आवाज
करी माळकरी
भजन रियाज
पत्र्याच्या दुकानी
दारूचे आगर
रातभर तेथे
दुःखाचा जागर
शेणोरी अंगणात
टाकोनिया खाट
जुनं खोड पाही
गरूडाची वाट
विझे वात वात
सरे धामधूम
झिंगलेला गाव
होतो सामसूम ....... झिंगलेला गाव होतो सामसूम
- अनुबंध