लागली इतकी खोड

( संगणक आणी फेसबुकचे व्यसन जडलेल्या लोकांना बघून सुचलेली कविता. )

मान पाठ दुखते, कमी
होतच नाही ओढ
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड

कसीबशी त्रोटक एक
चारोळी लिहायची
पूर्ण होण्या अधीच तिला
पोस्टही करायची
लाईकला प्रतिसादाची
हवी असते जोड
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड

विचारता आज असा का
उदास सखे चेहरा
पत्नी म्हणे जाणून घेण्या
गुगलवर सर्च करा
टोमण्यांचाच मिळतोय
हल्ली फराळ गोड
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड

हँग होता संगणक
सारेच झाले ठप्प
स्क्रीनवरची द्रौपदी
झाली होती गप्प
कौरवांना म्हणत नव्हती
पदर माझा सोड
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड

आयुष्याच्या मॉनिटरवर
नेहमीचेच आहे
माउस ड्रॅग करूनही
होतो तिथेच आहे
असेल का साईट करायला
नशीब डाउनलोड?
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड

पुरे झालं फेसबुकवरचं
वायफळ आता चॅटिंग
करून घ्यावं बहकलेल्या
मनाचं फॉरमॅटिंग
अ‍ॅक्च्यूअल वर व्हर्च्यूलने
निघत नसते तोड
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com