बीज तुझ्या रे आठवणींचे
मनी लागले रुजावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
ओल्या ओल्या मनास वाटे
सरून जावा अता दुरावा
तुझ्या संगती जगता जगता
क्षणात माझा ग्रिष्म विरावा
मिठीत तुझिया, रोमांचाने
अधीर झाले सजावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
ऋतू बदलती क्रमास अपुल्या
तू येण्याचे निमित्त साधुन
वारा घाली शीळ अशी की
कोकिळकंठी भासे ती धुन
बारा महिने श्रावण देइन
मनात ये तू रहावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
कडाडणार्या विजेप्रमाणे
तुझे क्षणातच येणे जाणे
सुरू व्हायच्या अधीच माझे
कसे संपते जीवन गाणे?
एक क्षणाच्या लखलखण्याने
प्रीत थरथरे फुलावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
रंगामध्ये असे रंगले
वेगवेगळे कधी न दिसले
तो सार्या विश्वाचा होता
कळूनही तिज नव्हते वळले
मुग्ध राधिका कृष्णासाठी
मनी लागली झुरावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
श्रावण वांझोटा गेल्यावर
मनास माझ्या मीच सांगते
पुढील वर्षी येइल तो हे
गोड मधाचे बोट लावते
भ्रामक आशा मनी बाळगत
शिकले आहे जगावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
रचनेची पार्षभूमी जाणून घेण्यासाठी क्लिक करा
दुवा क्र. १
निशिकांत देशपांडे मो.क्र. 98907 99023
E Mail-- nishides1944@yahoo.com