मन जाते पंढरीला.....

मेघ सावळे सावळे
आले क्षितीजाच्या तटी
मना आठवे आठवे
माय भिवरेच्या तटी

वेध लाविते जीवाला
कसे साजिरे सगुण
विटेवरी ठाकलेले
परब्रह्म विलक्षण

हाकारितो जनालागी
प्रेम करुणा सागर
भक्तिसुखात नहा रे
यारे सारे सान थोर

तुका, ज्ञाना, नामदेव
येती दर्शनासी संत
त्यांजसवे वैष्णवांचे
थवे भजनात दंग

असा सोहळा रंगतो
एकादशी आषाढीला
तन जरि प्रपंचात
मन जाते पंढरीला.....