हात जोडतो देवापुढती, कधी न जातो दूर,
घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर |
वारकरी ना दिंडीमधला, मनास ना हुरहूर
नातीगोती वारकरी, हे माझे पंढरपूर |
सुखात सोबत विठ्ठल माझा, दु:ख बने कापूर
सुविचारांचा टाळगजर, हे माझे पंढरपूर |
कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर
सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर |
घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर
नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||