कौतुकाने बोलले ते, द्वाड होते
बैसलो ते हरभऱ्याचे झाड होते
व्हायला लागले मज थोडे खुजेही
मीच माझे बंद केले लाड होते
का दिलासा देत नाही आज कोणी
लागले शब्दांस माझ्या पाड होते
आदराने बोललो होतो कमी मी
भावनेची का सदा चिरफाड होते
वाटले की स्वप्न झाले पूर्ण आता
नेहमी का एक ती मग नाड होते
भासले मज भाग्य माझे लख्ख झाले
वास्तवाला केव्हढे भगदाड होते
चागला मी वागलो होतो जरासा
भेटले सारेच जे खादाड होते
धावण्याचा वेग आता मंद झाला
आजचे रस्ते जरा रेताड होते