मन पाऊस पाऊस

मन पाऊस पाऊस
त्यात असेना टिपूस
आहे व्यापून सर्वांना
कधी दिसेना कोणास

मन वादळ वादळ
घोंघावलं तनभर
खुणा उमटल्या नाही
उरी जखमा अपार

मन सागर सागर
किती अथांग गभीर
लाटा येती जाती तरी
भिजवेना कणभर

मन समज नुमज
कसं शहाणे ते बाळ
कधी वेडेपिसे होता
उधळिते रानोमाळ

मन अबलख वारू
धावे ब्रह्मांडाच्या पार
मना जाणे कोणी थोर
मन केवळ विचार.....