पं पं पं पं दारोदार......

पं पं पं पं दारोदार
पं पं पं पं दारोदार

बाईचा सोन्याचा संसार
बाईचा सोन्याचा संसार

तिचा पोरगा लई हुश्शारं
त्याची मारुती मोटार.................

सत्तरची अखेर आणि ऐंशींची सुरुवात या सुमारास हे सहल गाणं बरच प्रसिद्ध झालं होतं. होळी, कोजागरी, सहल वगैरे निमित्ताने जमलेली पोरं रंगात आल्यावर हे गाणं व्हायचं खर. सगळे बोल आता लक्षात नाहीत. पण संजय गांधी आणि त्याची मारुती मोटार हे समीकरण मारुती नावाची गाडी प्रत्यक्षात रस्त्यावर यायच्या अनेक वर्षे आधीपासूनच लोकांच्या डोक्यात पक्कं बसलं होतं.

इंदिराबाईंनी लावलेली आणीबाणी, संजय गांधी, कुप्रसिद्ध चांडाळ चौकडी या सगळ्याइतकीच गरम चर्चा मारुतीवर होत होती. साठच्या दशकाच्या अखेरीस संजय गांधी इंग्लंडहून परत आला तो डोक्यात मोटार घेऊनच. त्याचं दुसरं वेड होत ते विमानाच पण ते फक्त चालवण्यांपुरतं. मात्र आपण भारतात छोटी प्रवासी मोटार आणायचीच या ध्यासानं या माणसाला पछाडलं होतं. मारुती मोटरची स्थापना, स्थित्यंतरं, सत्तापालट, पुन्हा काँग्रेसचं बहुमतानं सत्ताग्रहण, संजय गांधींचा विमानाच्या कसरती करताना झालेला अकस्मात मृत्यू, डब्यात गेलेली मारुती मोटार कंपनी आणि बाईंनी पुत्राच्या आठवणीनं शोकविव्हल होऊन त्याच्या स्मरणार्थ केलेलं असेलही कदाचित पण मारुतीच पुनरुज्जीवन या सगळ्यातून तावून सुलाखून निघत, बरे वाईट दिवस पाहत मारुती तरली आणि आणि बघता बघता डिसेंबर १९८३ मध्ये एअर इंडियाचे कर्मचारी असलेल्या श्री. हरपाल सिंह या भाग्यवान सद्गृहस्थाला प्रत्यक्ष इंदिराजीच्या हस्ते पहिल्या मारुतीची चावी मिळाली आणि खरोखरच दशकभर गाजलेली मारुती मोटार प्रत्यक्ष रस्त्यावर धावू लागली.

मारुती ही एक केवळ एक मोटार नाही तर बरच काही आहे. मारुती हे जणू काही उदयाला येत असलेल्या मोठ्या अशा प्रगतिशील मध्यमवर्गाचं जणू प्रतीकच होतं अस म्हटलं तर गैर ठरू नये. मारुती येईपर्यंत भारतीय जनतेने गाड्यांचे दोनच प्रकार पाहिलेले. एक चित्रपटात सर्रास आणि रस्त्यांवर अधून मधून गर्भश्रीमंतांच्या दिसणाऱ्या भल्यामोठ्या परदेशी गाड्या किंवा बऱ्यापैकी दिसून येणाऱ्या आणि टॅक्सीच्या रूपात प्रत्यक्ष बसायला मिळणाऱ्या फियाट आणि ऍम्बॅसेडर. मधूनच चुकून एखादी स्टॅंडर्ड. डॉज, प्लायमाऊथ, वगैरे परदेशी गाड्यांचा जमाना संपत आला होता. साठच्या दशकाबरोबरच या गाड्या ठाणे- भिवंडी फेऱ्यांपुरत्या उरलेल्या, कुठे इथून माघार घेणाऱ्या चार गाड्या पाचगणी-महाबळेश्वरात गेलेल्या. सरकारी धोरणानुसार मोजक्याच कंपन्यांना मोटारी बनवायला परवानगी होती. ’बिर्लाशेट, तुम्ही बनावा आंबाशिटर आणि वालचंद शेट तुम्ही बनवा फ्याट. च्यामारी कोण मध्ये येतोय बघूयाच’ अशा सुरक्षाचक्रात या उद्योगातले अधिकारशहा आरामात होते. दुचाकीची स्थिती वेगळी नव्हती. बजाजला पर्याय नाही! भरा पाचशे रुपये आणि करा प्रतीक्षा. पाच - सात - दहा वर्षांनी जेव्हा लागेल नंबर तेव्हा मिळेल गाडी. आणि हो, रंग कुठचा वगैरे फालतू प्रश्न विचारू नका. गाडी मिळते आहे हे नशीब समजा. काय म्हणता? लवकर हवी? मग वितरकाचे पाय धरा नाहीतर दलाल गाठा. मोजा ठणठणगोपाळ आणि घ्या गाडी. या उद्योगाला कमालीची सुस्ती आणि आत्मसंतुष्टीची अवकळा आली होती. लोक आहे तो माल ’जसे आहे जेथे आहे’ तत्त्वावर विनातक्रार घ्यायला रांग लावून वर हात जोडून उभे असताना कोण कशाला आपल्या उत्पादनात सुधारणा करतोय? तांत्रिकदृष्ट्या या लोकांनी परदेशी तंत्रसहाय्य असलेल्या मूळ कंपन्यांना कराराचा काळ संपताच ’गाड्या कशा बनवायच्या ते आता आम्हाला उत्तम समजल्या; आता यांना मानधन कशाला द्यायचे?’असा विचार केल्याने इथे होत असलेल्या गाड्यांवर मूळ देशात त्या गाड्या तिथे कालबाह्य झाल्याने संशोधन वा उद्धार नाही आणि इथे आपले अंतर्गत तंत्रज्ञान पुरेसे नाही. काही सुधारणा करायची इच्छाशक्ती तर नव्हतीच.

आणि अचानक मारुती नावाची चिमुकली गाडी रस्त्यावर लीलया खेळू लागली. लोक कौतुकाने पाहत राहिले. आवाज न करता पळणारी गाडी, लुकलुकणारे वळणदर्शक दिवे, आकर्षक रंग, सुबक आकार अशा मारुतीने सगळ्यांना वेड लावले. ८४ च्या पावसाळ्यात वर्तमानपत्रातली पहिल्या पानावरची बातमी मला अजूनही लक्षात आहे - ’मुंबापुरीला पावसाने गाठले. पहिल्याच पावसात रस्त्यात अनेक वाहने बंद पडली. मात्र लालचुटुक मारुती सुसाट धावत होत्या’. जनतेची म्हणून लहान आकाराची, परवडेल अशी छोटेखानी म्हणून बनविलेली मारुती घेण्यासाठी धनिकांनी गर्दी केली. रोज टोयोटातून आमच्या एम डी ना घेऊन येणारा गणपत ड्रायव्हर छाती फुगवून सांगताना आम्ही पाहिला "पुढच्या महिन्यात शेटची मारुती येणार’. सगळ्या थराच्या सगळ्या वयाच्या लोकांना या मारुतीनं अक्षरशः वेडं केलं होतं. ८४ सालातलीच गोष्ट आहे. एकाएकी शाळकरी मुलांचे वही पेन्सिल घेतलेले घोळके वाहतुकीची तमा न बाळगता सिग्नलच्या दिशेने धावताना दिसू लागले.  हा काय प्रकार आहे हे कुणालाच समजेना. मुले पटापट सिग्नल सुटायच्या आंत उभ्या असलेल्या मारुत्यांचे क्रमांक टिपताना दिसत होती. मग वर्तमानपत्रात आले की कुणी आणि कशी पण मुंबईत अशी अफवा पसरवली होती की मुंबईतल्या पहिल्या शंभर मारुती मोटारींचे क्रमांक जो कुणी सर्वप्रथम मारुती कंपनीला कळवेल त्याला म्हणे मारुतीवाले गाडी देणार होते.

एल एम ले वेस्पाने नुसती जाहिरात करायची खोटी, एका रात्रीत नोंदणी दुथडी भरून वाहिली होती; उत्पादन क्षमतेच्या कितीतरी अधिक नोंदणी झाली होती. जे वाहन अजून पाहिले नाही त्याला इतका प्रतिसाद? छे छे! हा तर वर्षानुवर्षे तांगडविणाऱ्या एकाधिकार शहाविषयीच जनतेचा नाराजीचा इशारा होता. मग जी मारुती खरोखरच भुलविणारी होती तिच्यावर उड्या न पडल्या तरच नवल. लोक प्रतीक्षेला कंटाळले होते. लोक उर्मटपणाला कंटाळले होते. लोक नित्कृष्ठ दर्जाला कंटाळले होते. लोक अगदी साध्या सोयी सुविधा न देण्याच्या वृत्तीवर वैतागले होते. आणि या खदखदत्या असंतोषात मारुतीचे आगमन म्हणजे लोकांच्या दृष्टीने आनंदाचा सोहळा होता. आलिशान गाडी नाही पण निदान दिलेल्या पैशाचा मोबदला मिळावा ही अपेक्षा चुकीची वा अवाजवी नव्हती पण उत्पादकांना मक्तेदारीमुळे काहीही पडलेली नव्हती. मारुती आली आणि लुकलुकणारे दिवे, माघार घेताना देखिल बरा प्रकाश, वेगवेगळ्या लयीत हालणारे काचपुशे, पुढच्या वाहनानं काचेवर उडवलेला चिखल धुण्यासाठी पाण्याचे फवारे, दार उघडताच आत पेटणारे दिवे, कार्यरत असलेला हॅण्डब्रेक, पुढील भागातली रेलणारी आसने, रेडिएटरचे पाणी बघायची आवश्यकता नाही अशा एक ना अनेक गोष्टी ग्राहकाला तो आजपर्यंत कशाला मुकत आला याची जाणीव करून देत होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे ८०० सी सी चा इवलासा जीव थंडगार हवाही देत होता. मुंबईच्या उन्हाळ्याला पुरेसा. सगळ्यावर कडी म्हणजे बदललेले बॅटरी तंत्रज्ञान. आठ आठ दिवस चालवली नाही तरी नवव्या दिवशी पहिल्या चावीला सज्ज! इंजिन घॉं घॉं करीत व्यर्थ जाळायची बात नाही की गाडी चालवता येत नसली तरीही नवरोबा दौऱ्यावर गेले म्हणून बायकोला रोज सकाळी एकदा तरी गाडी चालू करायची सक्ती नाही. तरीही सगळेच बरे बोलत होते असे नाही. काही कर्मठ लोक ’ह्यॅ - ही काय गाडी झाली? हे तर खेळणं आहे’, ’पत्रा बघितला का? बिस्किटाच्या डब्याचा पत्रा यापेक्षा बरा!’, ’गाडी सुगड दिसते पण तकलादू आहे’, ’हे खेळणं कसलं वजन पेलतंय’ अशी टिका आणि आशंका होत्याच. मात्र चार जणांना घेऊन मारुती खंडाळा घाट चढून गेली आणि लोक काय ते समजले.

मारुती ही गाडी नव्हती तर नव्या युगाची नांदी होती, एक क्रांती होती. चालविण्यातल्या सुलभतेमुळे व हलक्या चाका मुळे स्त्रियांना या गाडीनं गती दिली. मोठ्या प्रमाणावर बायका - मुली गाडी चालवायला उत्सुक झाल्या. मध्यमवर्ग आपल्या शिक्षणाने, कष्टाने व आधीच्या पिढीने केलेल्या त्यागाने हळू हळू वर सरकत होता आणि लवकरच या देशात एक नवा वर्ग निर्माण होत होता. या गाडीने मध्यमवर्गाला नवी प्रेरणा दिली. ’अरेच्च्या! ही गाडी तर उद्या मी सुद्धा घेईन. त्या साठी फार बडा अधिकारी, डॉक्टर वा उद्योगपती असायची गरज नाही’ हा आत्मविश्वास बदलत्या काळाबरोबर मध्यमवर्गियाला आला. कर्जबाजारी हा शब्द आता मागे पडत होता, ज्याची पत असते त्यालाच कर्ज मिळते हे हळू हळू मान्य होऊ लागले होते. कर्ज घेणे म्हणजे ऋण काढून सण करणे नव्हे तर आपलीच भावी काळात होणार असलेली संपत्ती आपण किंमत मोजून आगाऊ उपभोगणे’ ही मानसिकता जन्माला आली. मारुती हा समाजाचा एक अविभाज्य भाग झाला. प्रगतिशील मध्यमवर्गीय आता जागा बघताना ’स्टेशन जवळ आहे का’ या बरोबरच ’गाडी लावायला जागा आहे का हे शोधू लागला. शिकायला आधी जुनी डब्बा गाडी घ्यायची आणि हात बसला की मग नवी कोरी हा समज पटकन हात बसणाऱ्या गाडीबरोबर बदलत गेला. ’एल’ च्या पाट्या नव्या गाडीवर दिसू लागल्या. बघता बघता मोटार शिकविणाऱ्या संस्था भरभराटीस आल्या. भल्या मोठ्या इम्पोर्टेड गाडीची स्वप्ने मध्यमवर्गाने कधीच पाहिली नाही. किंबहुना गाडी ही प्राथमिकता नव्हतीच . मात्र बदलत्या काळाबरोबर गाडी ’यादी’मध्ये येऊ लागली.

या मारुतीच्या यशाचं गमक काय? ही काही सिनेमातल्या गाड्यांसारखी आलिशान वा प्रशस्त नव्हती. कदाचित म्हणूनच लोकांना आपलीशी वाटली. ना बडेजाव ना मोठ्या फुशारक्या. पण जे सांगितले ते चोख मिळणार हा विश्वास मात्र या मारुतीमध्ये होता. मारुतीने ’ग्राहकाभिमुखतेचे संस्कार’ आपल्या गाडीबरोबर आणले. ग्राहकाला काय हवे? ग्राहकाची सोय कशात आहे? गाडी घेताना ग्राहक कशाचा प्रामुख्याने विचार करेल? या सगळ्याचा मारुतीनं उत्तम अभ्यास केला. मुळात सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी म्हणजे सरकारने लोकांच्या पोटाची सोय लावायला उघडलेला उद्योग; तिथे उत्पादकात, नावीन्य, जबाबदारी, गुणवत्ता’ वगैरे अपेक्षा ठेवायच्या नसतात हा रूढ समज मारुतीने मोडून काढला. जे करायचे ते उत्तम, वेळेवर आणि प्रामाणिकपणे हा पायंडा मारुतीने नव्याने या क्षेत्रात पाडला आणि पी एस यु ची प्रतिमा बदलली. मारुतीने दूरगामी योजना आखल्या, उत्तम नियोजन केले. यशाने हुरळून जायची वेळ येताच गर्भित धोका ओळखला आणि स्वतः:ला सावरायचा प्रयत्न केला. देशभरात वितरक आणि सेवा केंद्रे यांचे जाळे विणले. उत्तमतेचा ध्यास घेत मारुतीने एक थक्क करणारी भेट भारतीय मोटार उद्योगाला व ग्राहकाला दिली आणि ती म्हणजे गंजरहित पत्रा. ११८ एन ई सारखी बरी गाडी सड्क्या पत्र्यामुळे डब्यात गेली. एक पावसाळा गेला की कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात गंजाचे ओघळ येणारच असा नियम असताना मारुतीने चार दशकांपूर्वी सात करोड्पेक्षा अधिक रक्कम गुंतवून अत्याधुनिक रंगशाळा बांधली आणि विद्युतलेपनाधारीत अस्तराचा वापर भारतात प्रथमच केला ज्या योगे गाडीच्या आतुन, बाहेरुन सर्वबाजुंनी अस्तर व्यवस्थित बसेल, अगदी अडचणीचा कोपराही अस्तराशिवाय सुटणार नाही मात्र कुठेही अस्तराचे गठ्ठेही जमणार नाहीत याची काळजी घेतली. जो रंग मारुतीला दिला तोच रंग चढ्या भावाने हिंदुस्थान मोटर्सला देताना रंगनिर्मात्यांनी ठणकावून सांगितले की पैसे मोजूनही तुम्हाला मारुतीसारखी पातळी आणि चकाकी मिळणार नाही कारंण तुमची रंगशाळा आणि प्रक्रिया या दोन्ही पुरातन आहेत. दर चार पाच वर्षांनी गाडी रंगवायची भविष्यात गरज उरणार नसल्याची ग्वाही मारुतीने तेव्हाच दिली होती. मारुतीने ग्राहकांना अभिमानाने सांगितले की गाडीला रंगकाम करायचे तर वरवर करा, पत्रा खरवडू नका कारण ज्या निगुतीने आम्ही प्रक्रिया केली आहे तशी स्थानिक गॅरेजवाला करू शकणार नाही.

मारुती ८००, ऑम्नी, जिप्सी, १०००, एस्टीम, बॅलेनो, वेगानं आर, झेन, आल्टो, स्विफ्ट, डिजायर, रिट्ज़, असा वारू चौखूर सुटला. अर्थात बदलत्या काळाबरोबर नवे निर्मातेही आले, नव्या गाड्या आल्या, प्रचंड स्पर्धाही आली, कुठे अपयशही आले. वर्सा सारखा दणदणीत पराभवही पत्करावा लागला. मात्र भारतीय गाडी परदेशात अगदी इंग्लंड व युरोपातही जाऊ शकते आणि ती सुद्धा जिथे सुझुकीचे वितरक आहेत त्या देशात हे मारुतीने जगाला दाखवून दिले आणि देशाची मान उंचावली. प्रत्येकाला यशाबरोबर काही मर्यादाही लागतात तसा मारुतीला मध्यमवर्गियाची गाडी हा शिक्का बसला. कदाचित बॅलेनो उत्तम गाडी असूनही यशस्वी न होण्यामागे त्या काळातल्या अपेक्षित किमतीच्या तुलनेत चढ्या किमतीबरोबर मारुतीची मध्यमवर्गीय प्रतिमाही कारणीभूत असेल. ग्रॅण्ड विटारा चालली नाही ती कदाचित ’नाजुक नार, एस यु वी नव्हे’ या प्रतिमेबरोबरच ती काळाच्या आधी आणल्यामुळेही असेल. अगदी अलिकडे आलेली किझाशी कधी आली आणि कधी गेली हे समजलेच नाही. होंडा ऍकॉर्डशी मारुतीने केलेली बरोबरी भारतीय ग्राहकाला रुचली नसावी. नपेक्षा होंडाच्या गाड्या सुद्धा नाजुकच असतात, दणकट नव्हे. मात्र प्रत्येक दशकातल्या सर्व अडी अडचणींना संकटांना मारुतीने तोंड दिले आणि झेंडा फडकत ठेवला. आपली नाजुक साजुक बारीक सारीक ही प्रतिमा दूर करत आणलेल्या स्विफ्ट ने प्रतिमा बदलली आणि गाडी लोकप्रिय झाली. स्विफ्ट यशस्वी होत असतानाच एस्टीमला सक्षम पर्याय म्हणून तीन खणी सेडान गटात मारुतीने स्विफ्ट डिजायर बनविली आणि ती तुफान चालली. इतकी, की प्रत्येक उत्पादकाने अगदी आवर्जून आपापल्या गाड्यांपैकी एकतरी गाडी अशी बनविली की जी हॅचबॅकही आहे आणि सेडान रूपातही उपलब्ध आहे.

मारुतीला भविष्यात स्पर्धा येणार हे अटळ होत. आणि ती आली सुद्धा. देवु, होंडा, ह्युंदाई, फोर्ड, टोयोटा, टाटा, स्कोडा, फोक्सवागेन..एक एक करीत सगळे वाहन उत्पादक भारताच्या वाटेला लागले. अनेकांनी सावध पवित्रा घेत जिथे मारुती नाही अशा प्रकारात आपल्या गाड्या उतरविल्या. मात्र मारुतीने सर्वांवर वचक ठेवला होता आणि आहे. उत्तम सेवा, सुट्या भागांची उपलब्धता या साठी प्रत्येक नव्या गाडीची तुलना मारुतीशी होणे अविभाज्य आहे. कुणी अधिक सोयी देते, कुणी अधिक दणकट, कुणी अधिक सुरक्षित मात्र या सर्वांना विचारण्यासाठी एक प्रश्न मारुतीने ग्राहकांना शिकवून ठेवला जो ग्राहक अजूनही विसरलेला नाही  - "गाडी किती देते?". अनेकजण देखभाल आणि सुट्या भागांची किंमत हे घटक लक्षात घेत अजूनही मारुतीलाच कौल देतात. भारतीय ग्राहक नुसता किमतीच्या बाबतीतच आग्रही नाही तर तो गाडी घेतानाच ’गाडी पाच सात वर्षांनी विकली तर काय भाव मिळेल’ याचाही विचार करतो. पुनर्विक्रीमुल्य ही मारुतीने भारतीय ग्राहकाला दिलेली आणखी एक भेट. मारुती ८०० किंवा झेन नुसती ’विकायची आहे’ असे म्हटले तरी विकली जाते. त्यात स्पर्धा केवळ सॅंट्रोची. बाकी कुठल्याही गाडीत केलेल्या गुंतवणुकीवर इतका चांगला परतावा मिळत नाही. मारुती ही मध्यम वर्गीयांच्या मनात आणि घरात जागा मिळवून राहिली याचे एक कारण म्हणजे सुलभ वापर, कमी खर्चाची देखभाल, कमी इंधन खर्च आणि उत्तम विक्रीमूल्य. आम्हा मध्यमवर्गियांच्या भाषेत मारुती म्हणजे चार चाकी बजाज. पेट्रोल टाका आणि पळवा. कुठेही दुरुस्त होते, सुटे भागही स्वस्त मिळतात आणी मुळात  अतिशय विश्वासू. सहसा रस्त्यात धोका देणार नाही. हळू हळू संकल्पना बदलत गेल्या. लोकांचे उत्पन्न वाढत गेले ऐपत बदलत गेली. अनेक मोहमयी गाड्या बाजारात आल्या, भराभर सहजगत्या विकल्याही जाऊ लागल्या. बरोबरच आहे. दर वीस वर्षांनी पिढी बदलते म्हणतात. जे आकर्षण त्या वेळच्या पिढीला मारुतीचे वाटले ते आता नव्या पिढीला आधुनिक महागड्या गाड्यांविषयी असणे स्वाभाविकच आहे. शिवाय दारातली गाडी हे उपयुक्ततेपेक्षाही अधिक प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. गाडी जितकी भारी तितका मान मोठा. मुळात ज्यांच्या विषयी बालपणापासून सुप्त आकर्षण असते त्या गाड्या आता सहज उपलब्ध झाल्यावर ते साहजिकच आहे. बघता बघता बेन्झ, बी एम डब्ल्यु, ऑडी यांचा ओघ वाढतो आहे. मात्र तरीही सगळे उत्पादक अजूनही झेन आणि आल्टोवर नजर ठेवून आहेत, आणि प्रत्येकाने स्विफ्ट च्या गटात आपली एक तरी गाडी उतरवली आहेच.

अशी ही मध्यमवर्गियाची लाडकी मारुती. काळाबरोबर प्रगती होत गेली. मध्यमवर्गियांचे उच्च मध्यम वर्गीय वा उच्च वर्गीय झाले पण तरीही ते मारुतीला विसरले नाहीत. नव्या गाडीचा कोराकरीत वास अनेक मध्यमवर्गियांनी याच मारुतीत भरभरून घेतला. पाहुणे बोलवायला घर नव्हे तर मन मोठं असावं लागतं, तसं मध्यमवर्गाच झालं होतं. आपली गाडी केवढी आणि त्यात माणसे किती बसतील हे विचारात न घेता पहिलटकर सर्रास पाच जण घेऊन मुंबईभर फिरले. आणि त्या मारुतीनेही कधी कुरकूर केली नाही, तिने अगत्यच जोपासले. मारुतीने मध्यमवर्गियांच्या मनात अढळ स्थान मिळविले. दारात होंडा, टोयोटा, फियाट, फोर्ड वा फोक्सवागेन येवो, असलेली  मारुती कुणाला काढावीशी वाटत नाही. फारतर ती घरातली दुसरी गाडी झाली, पण मारुती घराबाहेर गेली नाही. आणि जाणारही नाही.