कुरुक्षेत्रातील युद्ध अटळ हे कृष्णाला कळून चुकले होते. पांडवांचा विजय होणे सोपे नव्हते. पितामह भीष्म, गुरुवर्य द्रोणाचार्य, दुर्योधन, आणि कौरव सेना या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. परंतु कृष्णाला खरे भय होते कर्णाचे. कर्णाच्या कवच-कुंडलांचे. कर्णाला त्याचे जन्म रहस्य सांगून युद्धात पांडवांतर्फे लढण्याचा प्रस्ताव कृष्ण कर्णा समोर मांडण्याचे ठरवतो. कर्णाची प्रार्थनेची वेळ हेरून कृष्ण त्यास नदीकाठी भेटतो. एकी कडे कर्ण, ज्याला आधीच ह्या रहस्याचा उलगडा झालेला की तो सुत पुत्र नसून कुंती पुत्र आहे आणि सर्व पांडव त्याचे बांधव आहेत. परंतु दुसरीकडे त्याचा सखा, दुर्योधन, ज्याने त्याला सुतपुत्र असूनही कैक बहुमान दिले, राज्य दिले त्याला ह्या युद्धात साथ देणे हे कर्णाला त्याचे कर्त्यव्य वाटत होते. पांडवांनी जेव्हा जेव्हा हिणवले तेव्हा तेव्हा दुर्योधन कर्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. अशावेळी कौरवां कडून लढणे हाच धर्म हे कर्णाने मनाशी पक्के केले होते. परंतु कुंतीने कर्णा कडून दान रूपात 'पांडवांना इजा न करण्याचे' वचन मागून घेतल्याने कर्ण द्विधा मन:स्थितीत असतो. त्याउपर, इंद्राने कपटाने कर्णा कडून कवच मिळवल्याने कर्णाला युदधात वीरगती ही अटळ दिसते. अशा परिस्थितीत आपल्याला भेटायला आलेल्या सर्वज्ञानी कृष्णाकडे आपल्याला असलेल्या खुप प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कर्ण करतो. त्यावेळी ते प्रश्न आणि त्याला कृष्णाने दिलेली उत्तरे असे प्रश्नोत्तराचे द्वंद्ग खाली मांडले आहे.
कर्ण-कृष्ण द्वंद्व
"मरण यावे विरोचीत,
दान हे का अनुचित,
वद माधवा" पूसे कर्ण
"मी जीवन रथ-सारथी,
मृत्यु-सूड न मज हाती"
खिन्न हसे श्यामवर्ण
"कौंतेय की राधेय,
गाठ ही का उकलेल?"
उत्कंठ नेत्री असे जलपर्ण
"मात्रुत्व हे श्रेष्ठ; अमर्याद,
जानकी. देवकी. सदा अभिन्न"
विजयी मुद्रेत बोले कृष्ण
नि:शब्द परंतु निश्चल कर्ण
खंबीर परंतु द्वयित कृष्ण
चराचर ही विश्रांत एक क्षण
"कौरव की पांडव,
युदध सारथ्य कोणाचे? " कृष्णप्रश्न
"धर्म की अधर्म,
आपणच सुचवावे?" कर्ण प्रतिप्रश्न
"धर्म! अर्थात" निः शंक कृष्ण
"कौरव निर्विवाद" बेधडक कर्ण
"फेडणार कसे कुंती ऋण?
जपला तीने कर्ण भ्रृण" अस्वस्थ कृष्ण
"जीवन दान मातेने इच्छुनी,
पांडवास अमर केले,
दानवीर मी, वचन देवुनी,
मजला ऋण-मुक्त केले" कृष्णाकडे कर्णकटाक्ष
"अमरतेचे भयही गेले निघोनी,
कवच ही आता इंद्राचे जाहले,
हतबल मी, कर्त्यव्य साधुनी,
रंकपण सदाचे स्वीकारले" निरुत्तर कृष्णास, व्यथित कर्ण
"म्हणुनी एकच दान इच्छितो,
मरण यावे विरोचीत..
मरण यावे विरोचीत..." पराजित कृष्णास, विजयी कर्ण
सूड- लगाम, आसूड
वीरोचीत - वीरास उचित