आठ बाय आठ

ऑफिस मधून निघायला त्या दिवशी सव्वादहा वाजले. निवांत सायकल मारत, 'आर्मीन'चा "अ स्टेट ऑफ ट्रांस ५५६" ऐकत घरी परतत होतो. 
भरत च्या कोपऱ्यावर दोन आजोबा बसलेले दिसले. बुद्धिबळाचा डाव अगदी चांगलाच रंगला होता. आता बुद्धिबळ म्हटल्यावर माझ्या जिव्हाळ्याचा विषय, त्यातून बुद्धिबळ खेळासाठी इतक्या दर्दी व्यक्ती पाहून मी तिथे जाऊन 'नाक' खुपसणं ओघानं आलंच. 
पटावर रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश पडला होता. तिकडे जाऊन मी शांतपणे उभा राहिलो आणि पटावरच्या परिस्थितीचा मनातल्या मनात आढावा घ्यायला सुरवात केली.
माझ्या हालचालीमुळे पटावर क्षणिक सावली सरकली. तेव्हा त्या दोघांनी एक क्षण माझ्याकडे पाहिलं आणि ते परत खेळात गुंतून गेले. 
आपला खेळ असं कोणीतरी बघायला थांबलंय हे त्यांना कदाचित नवीन नसावं.
माझ्या कुवतीनुसार सांगायचं झालं तर दोघं "चांगले" खेळत होते. मी बराच वेळ तिथेच उभा होतो. काही वेळानं डाव संपला. 
"आजोबा, मगाशी तिथे 'बिशप सी फोर' आला असता तर पोझिशन मजबूत झाली असती तुमची" मी पचकलो. हे ऐकून तरी ते माझ्याकडे बघतील अशी अपेक्षा होती.
पण माझ्याकडे न बघता त्यांनी लगेचच ती पोझिशन लावली. मी सांगतोय ते कदाचित बरोबर आहे त्याची खात्री करून घेतली. आणि 'फायनली' दोघांनी माना वर केल्या.
इतका वेळ शांतपणे सायकलवर उभं राहून हा टकल्या आपला डाव बघत होता ह्याचं त्यांना थोडं आश्चर्य वाटलं.
त्यांनी विचारलं, "आपलं काय नाव ? ".. "नमस्कार, मी करमरकर ..आणि आजोबा आपलं नाव काय म्हणालात ?"
"मी दामले", "आणि मी काळे.. " .. त्यांची आडनावे ऐकून मी मनात म्हटलं "अरे वा, दोघंही कोब्राच आहेत की .. ".
नाव सांगून झाल्यावर दामल्यांनी परत एकदा माझ्या टकल्यावरून नजर फिरवली.. "तुम्हाला पाहिलंय हो कुठेतरी.."..
मी त्या दोघांनाही पहिल्यांदाच पाहत होतो. त्यामुळे त्यांनी खरंच मनापासून हा प्रश्न केलाय की उगाच काहीतरी विषय काढण्यासाठी विचारलंय ते मला कळलं नाही.
"हो पाहिलं असेल ना.. चित्पावन संघाच्या कोणत्यातरी कार्यक्रमात पाहिलं असेल .. " मी जोक मारायचा प्रयत्न करून पाहिला. हे ऐकताच तिघांत जोरदार हशा पिकला.
दोन अनोळख्या व्यक्तीसमोर असला 'लेम' जोक मारायची मी एरवी हिंमत केली नसती. पण इथे तिघही बुद्धिबळाच्या सोंगट्यांचे गुलाम होतो. त्यामुळे हा जोक खपून गेला.
पुढे बऱ्याच वेळ मी काय करतो, कुठे राहतो मग माझ्या कामाचं स्वरूप वगैरे वर भरपूर चर्चा रंगली.
तितक्यात आईचा फोन आला. "अरे काय ? आज इतकं काम आहे की काय ?"....
"अग हो, आज जरा काम जास्ती होतं.. आलो आलो .. निघालोय बघ .. रस्त्यातच आहे.. "
आपल्या नव्या मित्रांचा निरोप घेऊन मी काढता पाय घेतला. जाता जाता "खेळू आपण एकदा .. " अस म्हणून त्यांच्यात आपली जागा बुक केली.
काही दिवसांनी नव्या स्पायडरमान चा रात्रीचा शो पाहून घरी परतत होतो तेव्हा भरत पाशी बसलेले ते दोघं परत नजरेस पडले.
"दत्त्या तुम्ही जा घरी, मी आलोच.... काळे काका, मांडा नवीन डाव .." मी हक्कानं म्हणालो.
'तू कधी सुधारणार नाहीस' अश्या भावनेनं दत्त्या माझ्याकडे पाहून हसला आणि पुढे निघून गेला. 
डावाची ओपनिंग मस्त झाली. डाव पूर्णपणे मला माझ्या हातात वाटत होता. 
तितक्यात दत्त्याचा फोन आला.. "अरे हा.. आम्ही गिरिजाला आलोय.. तू डाव संपला की तिकडेच ये.. किती वेळ लागेल अजून तुला ?"
"हा येतो मी गिरिजाला.. मला पंधरा - वीस मिनिटं लागतील.. "..   ....    "ओके .. थांबलोय आम्ही .. ये लवकर "
प्रत्येक मूव्ह करायला दोघंही बराच वेळ घेत होतो. फोन झाल्यावर दोघांच्या अजून जेमतेम दोन मूव्ह झाल्या असतील आणि तेव्हड्यात दत्त्याचा परत फोन आला. 
"अरे झालं का ? साल्या तुझी पंधरा मिनिटं माहितीयेत मला.. म्हणून मुद्दाम अर्ध्या तासानं केला फोन .. किती वेळ अजून ? ".. 
"अरे यार, आत्ता तर डाव चांगला रंगात आलाय.. अजून दहा पंधरा मिनिटं..प्लीज यार"
ह्यावरून दत्त्या काय समजायचं ते समाजाला. "बरं मग तू काय खाणार आहेस? आम्ही तोपर्यंत ऑर्डर देऊन ठेवतो.. "
"अरे संपतच आलाय डाव, पण तुम्ही एक काम करा.. तुम्ही सुरू करा, मी आल्यावर बघतो काय सांगायचं ते ..".. ओके म्हणून दत्त्यानं फोन ठेवला. 
फोन ठेवतो न ठेवतोच लगेच आईचा फोन आला.. "काय रे, इतका वेळ लागतो का पिक्चर संपायला ? रात्रीचा एक वाजलाय .. कुठे आहेस.. ?" .. 
"अग आलो आलो .. पंधरा मिनिटात आलोच.." माझं ठरलेलं उत्तर.
"माझी मूव्ह खेळलोय, आता तुझी मूव्ह आहे.." काळे आजोबा म्हणाले..  
त्या गडबडीत मी पटकन मूव्ह केली. मूव्ह केल्यावर मनात आलं.. "बोंबला, नाइट गेला.. ब्लंडर केलं रे $#%$^" आणि मनातच स्वतः:वर एक शिवी हासडली. 
'मरूदे, काय व्हायचं ते होईल..' म्हणून त्यांच्या चालीची वाट बघू लागलो. काय करणार, पहिल्याच डावात 'एक मूव्ह back देता का हो ?' असं विचारणे मनाला पटत नव्हतं. असो.
काळे पण चेस मध्ये चांगलेच मुरले होते. आलेली संधी त्यांनी घालवली नाही. नाइट गेल्यावर खरंतर खेळण्यात काही मजाच नव्हती. दोन चालीनंतर त्यांच्या प्याद्याचा वजीर होणार हे निश्चित होतं. आणि त्यांच्या खेळावरून ते मला परत जिंकायची संधी देतील असं एकंदरीत जाणवलं नाही. 
मी लगेचच डाव सोडला. "छे, अजून लै प्राक्तीस करायला पाहिजे बोम्बल्या" असं स्वतः:लाच म्हणालो.
त्यांना गुड नाइट म्हणून मी लाल आप्पा गीरीजाकडे घेतली.
दत्त्या आणि निऱ्या बिल देत कौंटरवर उभे होते. "हरून आलास असं प्लीज सांगू नकोस हा .. " दत्त्या बोलला 
"अरे, गपे, ते कसले भारी खेळत होते.. " चेहऱ्यावर 'पराजित हास्य' आणून मी सारवासारव करायचा प्रयत्न केला.
"ई अरे, जीव दे तू.. डोंबल तुझं अरे.. " इति दत्त्या..
"ह आआआआआआ.. काहीही काय अरे.. हरला काय तू .. साल्या आम्ही इतका वेळ वाट पहिली तो वेळ वाया ... " निऱ्या पण एकदम मला चिडवायच्या स्पर्धेत उतरला.
माझ्याकडे मुकाटपणे ऐकून घेण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता.
अगदी परवाचीच गोष्ट, रात्री जेवणानंतर कॉफी प्यायला म्हणून बाहेर पडलो. येताना मुद्दामच भरतवरून गाडी नेली. मी गाडी बाजूला घेऊन पार्क करत आहे हे पाहून सगळे पुढे निघून गेले.
"काय काळे काका, मांडायचा का डाव ?".. मी धाडस केलं.
ह्या वेळेस तोंडातली तंबाखू थुंकायचा बहाणा करून काळे जागेवरून उठले आणि मला दामल्यांशी खेळण्याची संधी दिली. जागेवरून उठताना त्यांनी एक टोमणा मारला..
"अहो दामले, चांगलं खेळतो बरं का हा, त्या दिवशी घाई घाईत चूक केली म्हणून हरला, नाहीतर घेतच होता मला "
डाव चालू झाला, सव्वाबारा झालेले. गेम अगदी हळू हळू पुढे सरकत होता. दामलेसुद्धा अगदी तोडीस तोड खेळत होते. आमचा डाव बघायला रस्त्यानं जाणाऱ्या - येणाऱ्या मधले काही लोक थांबले.
डाव अगदी रंगला होता आणि परत एकदा माझा फोन वाजला. अर्थात आईच होती. मी ठरवलेली मूव्ह केली आणि मगच फोन उचलला.
"काय रे, इतक्या वेळ कॉफी ? साडेबारा वाजून गेले." .... 
"आलो गं आई, भरतपाशी आहे.. आलोच .. झोप तू.." .... 
"आजकाल भरतपाशी काय असतं रे सारखं ?".. 
"आलो गं, आलो दहा मिनिटात.. आलो की सांगतो .."
मी कुठे आहे, काय करतोय, कोणाबरोबर खेळतोय हे मला सांगायचा कंटाळा आलेला. आणि त्यात वेळ गेला असता. फोन सायलेंट करून मी परत लढाईत रुजू झालो. 
तितक्यात बघ्यांमधला एक जण पचकला. "तो उंट का दिलास रे खायला ? आणि काका तुम्ही पण खाल्ला नाहीत तो उंट .. असं का हो ?" ..
मग त्याला तसं खेळण्यामागे काय प्रयोजन होतं ते सांगितलं. त्या चालीचा मला फायदा होणार हे पण त्याला समजावलं. 
त्याला काही ते पटलं नाही किंवा, त्याला ते ऐकून आणि पटवूनच घ्यायचं नव्हतं, असं म्हटलं तरी चालू शकेल.
"चालायचंच, असतात असे बरेच. तू पण त्यातलाच एक आहेस वाटतं .." मी त्याला उद्देशून मनात म्हटलं आणि पुढची मूव्ह केली.
"क्वीन डी एट,  दामले आजोबा, चेक तुम्हाला "..
आता राजा हालवला की आपला सपोर्टच नसलेला हत्ती जाणार हे दामल्यांना कळून चुकलं. "छे, आता काय खेळण्यात अर्थच नाही" असं म्हणून दामल्यांनी सोंगट्या आवरण्यास सुरुवात केली.
"चला, दामले आजोबा, काळे आजोबा.. निघतो आता, असंच खेळत राहू आपण अधून मधून".. 
गाडी मेन स्टेन्ड वरून काढत बसायचे जास्ती कष्ट न घेता फर्स्ट वरच उचचली आणि घराकडे बुंगाट वळवली.
त्या रात्री मला बऱ्याच दिवसांनी चांगली झोप लागली.