दिसते वरवर हलके छान, टिकाऊ आणि स्वस्त,
एके दिवशी हेच करेल, वसुंधरेला फस्त.. ॥१॥
मोहक सुंदर रंग आगळे, सफेद, नारिंगी अन निळे,
मुग्ध करोनी आमुचे डोळे, फोफावतसे आपुले जाळे.. ॥२॥
सुरू जाहला ह्याचा वापर, भकास बनले डोंगर सुंदर
लुप्त जाहले रम्य सरोवर, विळखा ह्याचा आवळल्यावर.. ॥३॥
नित्याचा हा भाग गडे, ह्याविन आमुचे सर्व अडे,
जिकडे तिकडे चोहीकडे, दिसती ह्याचे उकिरडे... ॥४॥
पृथ्वी ह्यासी पडे तोकडी, चंद्रावरही नजर वाकडी
भरूनी पाठ्वा एक तबकडी, इकडूनी तिकडे पहिली तुकडी ॥५॥
विघटन ह्याचे शक्य नसे, असुर असा हा महाभयंकर
वेळीच घालू आवर अथवा, बने सखा हा नित्य निरंतर... ॥६॥
प्रेम असे जर वसुंधरेवर, मिळोनी घेऊ शपथ अगोदर
प्लास्टीक चा टाळूनी वापर, जपू आपुला रम्य परिसर... ॥७॥
- श्रीयुत पंत