सिधयांची शिकवणी

चांगले शिकवतात सिधये सर, ताईच्या किती मैत्रिणी होत्या सिधयांकडे. सगळ्यांना बारावीमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये भरपूर मार्क मिळालेत. अश्या प्रकारचं कौतुक ऐकल्यावर मी नववी मध्ये सिधये सरांचा क्लास लावला. माझ्या पूर्ण नववीच्या वर्षात सर जपानमध्येच होते. जुन्या मुलांकडून सर कसे आहेत, ते कसे शिकवतात आणि खास करून ते किती कडक आहेत ते बऱ्याचदा ऐकायला मिळालं.
मी दहावीत गेलो तेव्हा सर भारतात आले. ते आम्हाला मॅथ्स शिकवणार आहेत असं ऐकण्यात आलेलं. पहिल्याच दिवशी त्यांनी सांगितलं की आपल्या क्लासच्या दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षाला कमीत कमी ३६ दोनशे पानी फुल-स्केप वह्या लागतात. तेव्हा ऐकून गंमत वाटली. छे, इतक्या कश्या लागतील.. इतकं लिहिलं तर हात मोडून जातील ना. 
वर्ष संपल्यावर जेव्हा त्या वह्या एका मित्राला देत होतो, तेव्हा त्या बेचाळीस होत्या.

सुरुवातीला सरांच्या वागण्यात जसा ऐकायला मिळाला होता तसा 'खूप जास्ती कडक'पणा जाणवला नाही. बहुतेक पहिले काही दिवस सर कोणता विद्यार्थी कसा आहे ह्याचा आढावा घेत होते.
क्लासमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं त्यांनी 'नामकरण' केलं होतं. मला ते 'भूषनं' अशी हाक मारायचे. इंग्रजी मध्ये 'ण' नसल्यामुळे माझ्या नावाच्या स्पेलिंग मध्ये शेवटी 'n' असायचा. त्यावरून हे नाव पडलं असावं. एक मुलगा दहावीतसुद्धा रोज रिक्शाने क्लासला यायचा. (राहायला तो फार लांब नव्हता). त्यावरून त्याला 'रिक्षावाला' असं नाव पाडलं. एकदा एका 'धाडसी' विद्यार्थिनीने गुरुपूजनाच्या दिवशी  सरांवरती एक कविता केली आणि सगळ्यांना वर्गात वाचून दाखवली. त्यावरून तिला सर नेहमी 'कवयित्री' अशीच हाक मारू लागले. एकाचं नाव विश्वेश होतं. त्यावरून त्याला 'बिस्वेस (बीस वेष)' ह्या अर्थानं नाव पडलं.

सरांचं प्रत्येकाकडे अगदी वैयक्तिक लक्ष असायचं. कोणाची काय capacity आहे (किंवा काय लायकी आहे) ते सरांना अगदी व्यवस्थित ठाऊक झालेलं. सर आमच्या घराच्या अगदी २ बिल्डिंग सोडून पलीकडच्या बिल्डिंग मध्ये राहायचे. रस्त्यावरून जातानाऱ्येताना आम्ही एकमेकांना बऱ्याच वेळेस दिसायचो. मी रस्त्यावर क्रिकेट खेळतो ते त्यांना माहीत झालं. एकदा आई त्यांना भेटली तेव्हा आईकडे त्यांनी ही माहिती दिली. "अहो, तुमचा मुलगा रस्त्यावर क्रिकेट खेळतो..कुठली कसली पोरं असतात ती. सांगा त्याला की नको खेळत जाऊ रस्त्यावर.."
"तुम्हीच काहीतरी करा, मला पण तो रस्त्यावर खेळतो ही गोष्ट अजिबात आवडत नाही .. पण तो माझं ऐकेल तर ना.. तुमच्या पद्धतीनं त्याला समजवा. माझी काही हरकत नाही" आई त्यांना म्हणाली.
झालं, सरांनी क्लास मध्ये सर्वांसमोर मला चांगलीच समज दिली. 'परत रस्त्यावर खेळू नकोस. दिसलास तर गाठ आहेच आपली मग'
त्यांचं हे विधान मी ह्या कानानं ऐकून त्या कानानं सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी क्रिकेट खेळायला मी सगळ्या मित्रांबरोबर रस्त्यावर हजर. नशीब पण कसं, तेव्हड्यात सरांनी मला पहिला. मी फार लक्ष दिलं नाही.
दुसऱ्यादिवशी सर वर्गात आले. "करमरकर जरा बाहेर थांब मी आलोच". बाकीच्या मुलांना काहीतरी वाचायला देऊन ते बाहेर आले. मग त्यांनी मला प्रचंड धुतला. माझ्या डोळ्यातून भळा भळा पाणी आलं. मार पडतोय त्याचं फार काही वाटत नव्हतं. घरी आईच्या हातचा बऱ्याचदा मार खाल्लेला होता. झाडू, काठी किंवा मग गरम उलातने.. चांगले मित्र झालेले माझे. पण आह मात्र वाईट आणि खासकरून 'अपमानित' वाटत होतं. कारण घरी बघायला कोणीच नसायचं. इथे मात्र सगळी मुलं दारातून वाकून वाकून बघत होती.
माझं रडून झाल्यावर सरांनी मला वडापाव आणि चहा प्यायला खाली तिलकला नेलं आणि तिथे नीट गोड बोलून समजावून सांगितलं.
त्यानंतर आजपर्यंत कोणाला मी रस्त्यावर खेळताना कधीच दिसलो नाही ! त्या वेळेस जो धाक बसला, तो आज इतक्या वर्षांनी पण तसाच आहे.

दर शनिवारी आठवड्या भराच्या अभ्यासक्रमावर पेपर असायचा. अश्याच एका शनिवारी सर बाहेर गेले होते. तरीसुद्धा सगळेजण मुकाट खाली मान घालून पेपर लिहीत होते. लवकर पेपर पूर्ण झाला म्हणून मी पेपर 'गठ्ठ्यात' ठेवून बाहेर आलो.
वर्गाच्या बाहेर अमोल आणि शौनक मोबाइलवर काहीतरी टाईमपास करत होते. मी पण त्यांच्यात शामिल झालो. आमचा हसण्याचा (खिदळण्याचा)आवाज कधी वाढला समजलंच नाही. सर मागे येऊन उभे आहेत त्याचाही पत्ता लागला नाही. त्यांना पाहताच आम्हा तिघांची चांगलीच जिरली. अमोल ने आदल्या दिवशीच एक स्टील ची पट्टी आणली होती. त्याचं उद्घाटन त्याच्यावरच झालं. तिघांना भरपूर प्रसाद मिळाला.

एखादं कारटं जर अभ्यासाच्या नावानं 'दिवे' लावत असेल तर हे पालकांना समजलेच पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन. एक दिवस सरांनी थोडा गृहपाठ दिला होता. आश्चर्य म्हणजे आमच्या पंचावन्न जणांपैकी एकानंही तो सोडवून आणला नाही. सर खूप चिडले. सरांनी सर्वांना घरून पालकांची एक चिट्ठी आणायला सांगितली. 
"माझा पाल्याने घरी दिलेला अभ्यास पूर्ण केला नाही ह्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि परत तो अशी चूक करणार नाही अशी मी खात्री देतो/देते" असाच मजकूर चिठ्ठीत हवा असंही आम्हाला सर्वांना बजावलं. 
दुसऱ्या दिवशी सर्वांनी चिठ्ठ्या आणल्या होत्या. माझाच त्याला अपवाद होता. "तू अभ्यास केला नाहीस, त्याबद्दल मी तोंडघशी का पडू ? मी कोणतीही चिठ्ठी देणार नाही" असं घरी आईनं सुनावलं. त्यामुळे मी चिठ्ठी न घेताच क्लासला आलेलो.
त्या दिवशी मला सरांनी घरी पाठवलं. चिठ्ठी देण्यासाठी मी आईला परत 'विनवणी' केली. पण चिठ्ठी मिळालीच नाही. तिसऱ्या दिवशीपण मी क्लास मध्ये बीना चिठ्ठीचा गेलो. पण सुदैवानं सरांनी चिठ्ठीबाबत काहीच विचारलं नाही.
काही दिवसांनी सरांनी क्लास सुटताना एक पेपर सोडवायला दिला. पेपर अतिशय मोठा होता आणि घरी जाऊन पुस्तकात बघून सोडवायचा होता. त्यासाठी चार तास दिले होते.
दोन दिवसांनी सरांनी ज्यांनी पेपर सोडवला 'नाही' अश्यांना उभं राहायला सांगितलं. आज मात्र मी सोडून सगळेच जण अपवाद होते. मी सोडून सगळा वर्ग उभा होता. मी एकट्यानं पेपर सोडवला होता. 
नेहमीप्रमाणे सर्वजण 'चिठ्ठी' आणायला घरी गेले. मला मात्र त्या दिवशी क्लासला सुट्टी मिळाली.

एकदा परीक्षा चालू असताना ढवळ्या, रिक्षावाल्याला 'रूट थ्री'' ची value विचारात होता. रिक्षावाल्याला कळतच नव्हतं की नक्की काय विचारतोय. म्हणून रिक्षावाला 'काय ? रूट थ्री ची value हवीये का तुला?' असं उलटं ढवळ्यालाच विचारात होता. सरांच्या नजरेतून ते नाहीच सुटलं. त्यांनी रिक्षावाल्याला भरपेट चोप दिला. प्रचंड मार दिल्यावर सरांनी त्याला काय बोलत होता ते विचारलं. 
"अहो सर मी नव्हतो काही बोलत.  ढवळ्याच विचारात होता मला 'रूट थ्री'' ची value" रिक्षावाला म्हणाला.
झालं, ढवळ्याला पण बेदम धुतला सरांनी. ताबडतोब घरी चिट्ठी आणायला पाठवलं. आता ढवळ्यापण पण सरांचाच एक विद्यार्थी. त्यानं एक युक्ती लढवली. हा बादशहा घरी गेलाच नाही आणि एका मित्राकडूनच चिठ्ठी लिहून आणली. त्या दिवशी वाचला पठ्ठ्या.

शनिवारी क्लासची वेळ दुपारी अडीच ते पाच अशी असायची. पण एक दिवस रात्री ८ वाजले तरी सरांनी कोणाला सोडलं नाही. ते शिकवतच होते. "सर वेळ झाली, आज क्लास कधी सुटणार आहे ?" असं विचारायची हिंमत कोणालाच झाली नाही. सव्वा आठ वाजता सर्वांना सरांनी 'तिलक' चा वडापाव आणि कोक देऊन घरी सोडलं. खाली आलो तेव्हा सगळे पालक आपापल्या पाल्यांना आणायला गोळा झालेले दिसले.
सर कडक असले तरी क्लास मध्ये भरपूर जोक करायचे आणि सर्वांना हसत ठेवायचे. त्यांनी पुण्यातल्या रिक्षावाल्यांवर मारलेले टोमणे अजूनही लक्षात आहेत.
बारावी झाली तसा सिधये सरांशी फारसा संपर्क राहिला नाही. सर सुद्धा राहायला दुसऱ्याजागी गेले. त्यामुळे गल्लीत जाता येता त्यांचं दर्शन व्हायचं ते कमी झालं.
graduate झालो तेव्हा पेढे घेऊन सरांना क्लासवर भेटायला गेलो. एक रस्त्यावर क्रिकेट खेळणारा उनाड, आज चांगल्या मार्कांनी graduate झाला त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
तरी त्यांनी मला जमिनीवरच ठेवायचा प्रयत्न केला. "अरे वा, तू कसा काय बीसीएस झालास ? अशक्यच आहे.. बरं किती वर्ष लागली ?" 
"अहो सर, काय तुम्ही पण .. तीन वर्षाचं असतं, मला तीन वर्षच लागली .." मी म्हणालो...  त्यावर त्यांचं उत्तर तयार होतं.
"अरे, काय उगाच काहीपण सांगतो का ? एकतर तू खोटं बोलतोयस किंवा युनिव्हर्सिटीने बहुतेक डिग्र्या वाटायला सुरुवात केलेली दिसतीये .. "..
त्यानंतर तिलकचा चहा झाला आणि माझ्या पुढच्या वाटचालीबाबत बऱ्याच गप्पापण झाल्या.

निमित्त होतं कंपनीच्या वाढदिवसाचं. कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या सर्वांच्या मित्रांना आणि परिवाराला कंपनी मध्ये आमंत्रित केला होतं. त्या दिवशी सिधये सर कंपनीमध्ये दिसले. कोणालातरी शोधत होते.
"अरे, सर, नमस्कार .. मला शोधताय कि काय ?".. मी त्यांना भेटायच्या उद्देशानं जाऊन म्हणालो. दोघही माझ्या तोमण्यावर जोरात हसलो. आमच्या सारख्यांना 'सरळ' करता करता त्यांचेपण केस थोडे थोडे पिकायला लागले होते.
त्यानंतर काही वेळ सरांशी गप्पा मारल्या. त्यांना भेटून खरंच खूप बरं वाटलं त्या दिवशी.
बारावीनंतर आठ - नऊ वर्ष किती पटकन सरली. सरांबद्दल असलेला धाक आणि भीती "आदरामध्ये" कधी रूपांतरित झाली ते समजलंच नाही.
आज असं वाटतं की आमच्या सारख्या निगरगट्ट (किंवा लाथो के भूत असणाऱ्या ) पोरांना असच कोणीतरी हवं होतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आम्हाला योग्य मार्ग दाखवला. त्यांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा परिणाम कायमचा मनावर छाप घालून गेलाय.