श्रावण साजण....

रेशीम सरींना
गुंफतो उन्हात
श्रावण साजण
येतो गं भरात

कोवळ्या थेंबांना
सांभाळी हातात
पान पान डुले
नाजुक तालात

जाई जुई पानी
शुभ्रशी कनात
मंद मंद गंध
झुलवी मनात

शोभली सवाष्ण
गर्द हिरव्यात
नथ चमकते
मोत्यांची उन्हात

सणांचा श्रावण
झुलतो झुल्यात
गहिरी मेंदीही
खुलते हातात

कान्हाही भुलला
राधेचे दर्शन
यमुना कल्लोळी
भेटवी चरण

रसीला श्रावण
रंगीला साजण
धणी ही न पुरे
करीता वर्णन..