अध्यक्ष कोण असेल यंदा
साहित्य संमेलनी
बसेल कोणी नवखा स्थानिक
अथवा ज्येष्ठांतूनी
लेखणी शस्त्र आणि
ढाल बनली वाणी...
वागयुद्ध भडकले
साहित्यिकांच्या रणी
आपसांतच भांडती
ज्ञान-दीप विझवूनी
ज्ञान गंगा आटली
बोथट बनली लेखणी
मी हवा अध्यक्ष येथे
जन्म होईल कारणी
याची भूमीवरी करी मी
प्रथम धरली लेखणी
साहित्याचे बाळकडू
मी प्राषिले इथुनी
उतराई होईन म्हणतो
आता तिच्या रुणातूनी
बोल हे परिचयाचे
गोष्ट ही झाली जुनी
दिली स्थानिक लेखकांनी
पुन्हा नवेली फोडणी
ज्येष्ठ म्हणती, समर्पिले
जीवन तव चरणी
शंभरावर ग्रंथ रचिले
केवळ तव कारणी
आम्ही मुक्त संचार केले
साऱ्या प्रांतातूनी
समृद्ध केली मायबोली
वापरूनी लेखणी
कळस चढावा कार्याला
इतूकीच अपेक्षा मनी
निरोप द्यावा सेवेला
देऊनीया निवडूनी
सबुरी नाही लढत आता
जाऊदे होऊनी
भिडले दोघे परस्परांना
हट्टाला पेटूनी
माय मराठी व्यथित जाहली
वदली, पुत्र द्वंद्व पाहूनी
"तारण्या सारस्वताला
न उरला वाली कुणी"
"आता मज सोडविण्या
ह्या दूष्टचक्रातूनी
मराठीच्या पोटी यावे
पुन्हा ज्ञानोबांनी "