परत एकदा प्रेम


त्या तिकडे घोळक्यात दिसली, कसं सांगू तुम्हाला, गालात काय सुंदर हसली
नजर तिच्यावर मस्त खिळली, डोळ्यात डोळे जाता मग, धडकी मला भरली
शब्द मला सुचेना सांगाया, किती सुंदर होता तो क्षण,
सरसावून पुढे बोलायला, हिंमत होई ना पण 

दुरून फक्त बघत बघत, वर्ष पूर्ण घालवलं, 
परीक्षेनंतरच्या सुट्टीमुळे, ते पण सुख हिरावलं
पुन्हा एकदा कॉलेज आलं, आला पहिला दिवस 
दर्शन तिचे होईना मला, मनाला धक्का मिळेना सुखद 

शोधता शोधता तिला, तंद्री आमची कुठे लागली
चला, उशीर होतोय लेक्चरला, शेजारी येऊन मग, हळू आवाजात बोलली
काय झालं समजायला, नेमका वेळ जरी नाही मिळाला,
हवा असलेला सुखद धक्का, आज पहिल्यांदाच मनाला मिळाला

पाहता पाहता वेळ कसा, पटापट पुढे जाऊ लागला,
मैत्रीच्या नात्यावर प्रेमाचं, मखमली आवरण चढवू लागला
हिंडलो, फिरलो, भांडलो, जगलो, आणि खूप केली धमाल,
मित्र म्हणाले, आश्चर्य आहे वेड्या, तू कशी काय केलीस कमाल ?

हास्य तिचं बघताना, जगाला जायचो विसरून,
बोलणं तिचं ऐकताना, जायचो वेगळ्याच विश्वात रमून
तू आजपर्यंत कोणाला कशी आवडली नाहीस, आश्चर्यच आहे मला,
कुतूहल जरी आहे ह्या गोष्टीचं, खरंतर भीती वाटतीये मला

विषय काढू नकोस वेड्या, भावना मग आवरणार नाही
अश्रूचा थेंब डोळ्यात येईल, स्वतः:लाच मी सावरणार नाही
काय मिळालं लपवून तुला, समजावून मला सांगशील का ?
सगळं नीट सांगते वेड्या, माफ तर मला करशील ना ?

पाहिलं प्रेम माझंही होतं, तेच माझं विश्वं होतं
मिळून दोघांनी स्वप्न पाहिलं, पूर्ण करायला तसं पाऊल टाकलं
एक दिवस अचानक, तो मला "नाही" म्हणाला, 
कारण विचारल्यावर मात्र काहीच नाही बोलला

लपवाछपवी केली जरी, खोटं कधी बोलले नाही,
तुझा माझ्यावरचा विश्वास, मी कधीच तुटू दिला नाही.
अश्रू तिला अनावर झाले, मनावरचा ताबा तिचा सुटला
ऐकताना तिची व्यथा मग, माझाही कंठ दाटला
अग इतकंच ना वेडे, मी चिडलो अजिबात नाहीये,
काळजी करू नकोस, मी तुला कधीच सोडणार नाहीये

एक दिवस म्हणाली, वेड्या तो माझ्यासाठी परत आला,
मलाही राहवत नाही आता, मलापण तो तितकाच हवा
मला माफ कर, मी तुझी अपराधी आहे,
अजून चांगली मिळेल तुला, तशी माझी खात्री आहे

खूप दिवस लोटून गेले, ती कधीच दिसली नाही,
संपर्क करायच्या भानगडीत मी, मुद्दामच पडलो नाही
एक दिवस अचानक, तिचा मोठा मेसेज आला,
लग्न झालं त्याचं, सांगितलं नाही म्हटली मला

माझं लग्न उरकून टाकायला, घरचे आता मागे लागलेत, 
मला मात्र त्याचे आणि फक्त त्याचेच वेध लागलेत
आता मात्र मी खंबीर होतो, झालेल्या चुकांमुळे निगरगट्ट बनलो होतो
असं काही होईल हे मला आधीच वाटलं होतं,
तुझ्यासमोर बोलायचं तेव्हडं, मी तेव्हा टाळलं होतं

आता काय करणार आहेस, पुढे काय ठरवलं आहेस?
आलेले दिवस आता, कसे निघून जाणार आहेत
जास्ती न बोलता मी फोन खाली ठेवला,
अजून काही वाटायच्या आत, तो धागा तिथेच तोडून टाकला

काही महिने अजून गेले, त्याला भेट म्हणून, घटस्फोट देऊन गेले
मग ती म्हटली, आता मी संधी नाही दवडणार,
त्याला माझ्या तावडीतून, आता कोणीच नाही सोडवणार
काय करत आहेस कळतंय का गं तुला ?
एका बिजवराशी लग्न करणारेस, कसं सांगतेस मला
तोच माझं प्रेम आहे, तोच माझं सर्वस्व आहे,
त्याच्याशिवाय जगण्याला माझ्या, अर्थच पूर्ण शून्य आहे

परवाच फेसबुकवर फोटो पहिला, नुकताच दोघांनी साखरपुडा आटोपला
तुला सांगू आज मला खूप कौतुक वाटतंय, जोडी तुमची पाहून, किती सुख वाटतंय
काही झालं तरी, हा प्रेमाचा विजय आहे,
तुझ्या साधनेला मिळालेलं, परिस्थितीकडून हे एक बक्षीस आहे
म्हणते कशी, वेड्या, तू खूप चांगला आहेस,
लग्नाला मात्र नक्की यायचं, मी तुझी वाट पाहत आहे !!