सरदार अजितसिंह यांना आदरांजली

ajit singh

सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खटकरलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधू कूल म्हणजे साक्षात क्रांतींचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे.

आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली. ते युरोपियन अधिकाऱ्यांना उर्दू, हिंदी, पर्शियन व पंजाबी भाषा शिकवीत असताना त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या चपराश्यानं हाताशी धरून त्यांचा एक संघ बनविला होता, ज्यायोगे ते त्या अधिकाऱ्यांच्या बातम्या मिळवितं असत. सरदार अजितसिंह संत अंबाप्रसाद यांच्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांच्या ’भारतमाता सोसायटी’ चे सदस्य झाले. सरदार अजितसिंह लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वानेही प्रभावित झाले होते.

१९०७ मध्ये जुलमी कॅनलायझेशन ऍक्ट पंजाबात लागू केला गेला आणि असंतोषाचा भडका उडाला. या कायद्याच्या तरतुदी जाचक होत्या आणि त्यानुसार सरकारला शेतकऱ्याला नागवायचा जणू अधिकारच दिला गेला होता. १९०७ मध्ये मार्च महिन्यात पंजाबात उग्र आंदोलन उभे राहिले आणि त्याचे नेते होते हुतात्मा भगतसिंहांचे काका सरदार अजितसिंह. २२ मार्च १९०७ रोजी पंजाबात लायलपूर येथे सरदार अजितसिंह यांच्या पुढाकाराने ८००० शेतकऱ्यांचा मेळावा भरला. या प्रसंगी पंजाबचे लोककवी बॉंकेदयाल यांनी शेतकऱ्याच्या परिस्थितीचे वर्णन करणारी ’पगडी संभाल जट्टा, पगडी संभाल’ ही कविता म्हटली आणि ती सर्वत्र लोकप्रिय झाली.

सरकारच्या डोळ्यात खुपणारे सरदार अजितसिंह आणि लाला लजपतराय यांना सरकारने १८१८ सालच्या तिसऱ्या नियमनाच्या अंतर्गत २ जून १९०७ रोजी अटक करून मांडले येथे हद्दपार करून तुरुंगात डांबले. ते ७ नोव्हेंबर १९०७ रोजी सुटून पंजाबात परत आले. सुटून आल्यावर १९०८ साली लोकमान्य टिळकांनी सुरत काँग्रेस अधिवेशनासाठी निमंत्रित केले आणि त्यांचा सत्कार केला. मात्र परतलेल्या सरदार अजितसिंहांवर सरकारची करडी नजर होती. सरदार अजितसिंह यांनी देशभक्तिपर साहित्याच्या प्रकाशनास सुरुवात केली. त्यांच्या पेशवा या प्रकाशनावर सरकारने बंदी आणली. मात्र त्यांनी नावे बदलत आपला प्रचार भारत माता, सहायक इत्यादी नावांनी सुरूच ठेवला.१९०९ साली सरदार अजितसिंह देश सोडून स्वातंत्र्य लढा बाहेरुन चालविण्यासाठी निघून गेले. ते प्रथम इराणमध्ये व नंतर युरोपात गेले व त्यांनी अनेक देशांच्या सरकारांद्वारे आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाला मदत व पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. ते गदर उत्थानातही सहभागी होते. नेताजींच्या जर्मनीतील कालखंडात त्यांनी नेताजींचीही भेट घेतली होती. त्यानंतर ते ब्राझीलला गेले. १९४६ साली त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे ब्राझीलमधून पत्र आले आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांची पत्नी हरनाम कौर यांनी त्यांना आपला पुतण्या कुलतारसिंह याच्याकरवी पत्र पाठविले की ’आप तो परसो लौटनेका वादा करके गये थे, अभी तक आये क्यों नही? त्यांना सरदार अजितसिंहांचे उत्तर आले, ’प और ब मे दो नुक्तोंकाही बस फर्क है’ (उर्दू लिपीप्रमाणे). अखेर मार्च १९४७ मध्ये आपला देश स्वतंत्र होण्याचा संध्येवर ते हिंदुस्थानात परत आले आणि त्यांचा सर्वत्र सत्कार झाला, जवाहरलाल नेहेरुंनीही त्यांना आपले पाहुणे म्हणून घरी नेले होते.

मात्र फाळणीची कल्पना ते सहनही करू शकले नाहीत. हिंदुस्थानचे तुकडे आणि फाळणीमुळे होणारा रक्तपात त्यांना अस्वस्थ करीत होता. आपण ज्या भूमीला कर्मभूमी मानले तिचा काही भाग आता आपल्या देशात राहणार नाही ही कल्पनासुद्धा त्यांना असह्य होती. एकीकडे स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद आणि दुसरीकडे फाळणीचे दुःख अशा अवस्थेत त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ च्या पहाटे चार वाजता आपले प्राण सोडले. त्यांनी आपले प्राण ज्यासाठी जन्मभर अट्टाहास केला त्या स्वतंत्र भारतात सोडले मात्र त्या देशाचे तुकडे झालेले पाहायला ते राहिले नाहीत.

आज सरदार अजितसिंहांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त सरदार अजितसिंह यांना विनम्र आदरांजली.