मित्र

तो माझा मित्र आहे,  
आणि त्याचा मी ही,  
असे वाटते आता,  
आम्हा दोघांनाही.  
येतो बसतो हसतो,
बोलत मात्र नाही,
मी ही फारसं काही,  
त्याला विचारतं नाही.  
घेणे नाही देणे नाही,  
बोलणेसुद्धा नाही,
व्यवहाराचे पाश,  
किंवा अपेक्षाही  नाही.  
परवा एकदा होतो,  
मी घरामध्ये एकटा,  
म्हटलं मारून यावा,  
कुठेतरी फेरफटका.  
दिसला तो अचानक 
उभा एका घरापुढे 
नकळत गेले पाय 
माझे त्याच्याकडे 
मी ही बसलो हसलो
बोललो मात्र नाही
त्यानं फारसं काही
मला विचारलं नाही
कधीतरी सहज तो
माझ्याकडे येतो
कधीतरी असंच मी 
त्याच्याकडे जातो 
तो माझा मित्र आहे,  
आणि त्याचा मी ही 
असे वाटते आता,  
आम्हा दोघांनाही 
- अनुबंध