काल तुला फोन केला तेव्हा,
आभाळ गच्च भरलं होत.
सांडायचं का नाही -अस
ते मनात ठरवत होतं.
काळ्याकुट्ट ढगांच्या गर्दीत,
एखादाच पांढरा पुंजका होता.
हळुवार पणे कळ्यांना तो
समजावू काही पाहत होता.
गारांच्या माऱ्यात टपोऱ्या थेंबात,
दाटीन काही ऐकलंच नाही.
सारं सारं सुपूर्त करत,
हातच काही ठेवलंच नाही.
तुझा फोन होता होताच,
आभाळ कस स्वच्छ झालं.
निळसर मुलायम निरभ्र वस्त्रांच,
तलम ऊबदार पांघरूण झालं.