कताई शास्त्र ४

वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आपला भारत प्राचीन काळापासून अग्रेसर आहे. कोंकणातील बंदरे इसवीसन पूर्व
व इसवीसनोत्तर प्राचीन काळात कापडाच्या मध्य पूर्व तसेच युरोपीय देशाशी
व्यापारामुळे संपन्न झाली होती. मध्य युगात भारतीय कापडाच्या आयातीसाठी
युरोपीय देशांनी ईस्ट इंडिया कंपन्यांसारख्या
संस्था ही काढल्या होत्या.
औद्योगिक क्रांती नंतर मात्र चित्र बदलले. भारतातून मँचेस्टरसाठी कच्चा माल (कापूस) निर्यात होवू लागला.
तयार कापडास भारतासारखी हुकुमी बाजारपेठ मिळाली. मँचेस्टर संपन्न झाले,व
एतद्देशीय कारागीर बेकार ,निर्धन झाले.कपाशीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले
गेले. इंग्रजांनी कापसाच्या जलद वाहतुकीसाठी
भारतभर रेल्वेचे जाळे पसरवले. देशाची संपन्नता गेली. बेकारी वाढली.
एका द्रष्ट्या व्यक्तीच्या लक्षात ही गोष्ट आली. कापसाचा व्यापार करणार्‍या त्या व्यक्तीने कापड उद्योग येथेच
सुरू करून रोजगार निर्मिती करण्याचा निश्चय केला.
मित्रहो, हा द्रष्टा म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्राचा जनक सर जमशेदजी नसरवानजी टाटा.

टाटांनी भारतातील पहिली कापड गिरणी 'द एम्प्रेस मिल्स' ही १ जानेवारी १८७७ रोजी नागपुरात
सुरू केली. या साठी महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहील.
एम्प्रेस मिल्स ही टाटा उद्योग समूहाची जननी आहे ( होती, कारण टाटांनी मोठ्या दु:खाने ही गिरणी
कामगारांच्या अवास्तव मागण्यांमुळे १९८२ साली बंद केली.)

मागील भागात आपण कापसाच्या शेतापासून बाजारापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला.
कापूस हे सामान्य नाम असून कपाशी हे सरकीसह कापसाचे विशेष नाम व रुई हे सरकी वेगळी केलेल्या
कापसाच्या तंतूंचे विशेष नाम आहे.
सर्वसाधारणपणे गिरण्या रुईची खरेदी करण्या आधीच तिची प्रयोगशाळेत योग्य लांबी,
परिपक्वता,तलमता,बल,रंगाची प्रत इत्यादींचे परीक्षण करून गरजेनुसार कापसाची खरेदी करतात.
भारतात कॉटन मार्केटमध्ये प्रचंड उलाढाली होतात.
आता मुख्य विषयास म्हणजे कताई शास्त्रास हात घालू.
गिरणीमध्ये कापूस आल्यावर त्यावर खालील खात्यांमध्ये प्रक्रिया होतात.

१) मिक्सिंग व कंडिशनिंग
निर्माण करायच्या सुताच्या गरजेनुसार रुईच्या विविध जाती,विविध स्टेशन-गावाकडून आलेल्या गाठी,
येथे उघडल्या जातात व त्यांचे एकजिनसी मिश्रण करून ते ढीग २४ ते४८ तास
७०-७५% सापेक्ष आर्द्रतेत ठेवले जातात. (मुंबईची पावसाळ्यात सापेक्ष
आर्द्रता६०ते ७०% असते). असे केल्याने रुईची
प्रेसिंग मध्ये व बाहेरील कोरड्या हवेने घटलेली आर्द्रता पुनर्स्थापित (moisture regain) होऊन
पुढील प्रक्रियांमध्ये घर्षणामुळे निर्माण होणारे स्थितिज विद्युत भार कमी होण्यास मदत होते. कापसाचे
बल वाढते.
पॉलिएस्टर, विस्कोस इत्यादींचे डाईड यार्न बनवायचे असेल ,तर मिक्सिंग मध्येच तंतू रंगवले जातात.

सोबत बेल ब्रेकिंग मशीन व मिक्सिंग खात्याचे चित्र दिले आहे.
क्रमशः