आपापल्या आठवणी

"काय लहान मुलांसारखं खेळत बसता रे ? बघावं तेव्हा आपला तो कॉम्प्युटर, घरात मित्र गोळा करून बसायचे, आणि दंगा घालायचा." आई माझ्यावर वैतागून ओरडली.
"तुला बोर वाटत असेल, पण आम्हाला मात्र एज ऑफ एम्पायर्स खेळायला खूप मजा येते. तुमच्या वेळी काहीतरी वेगळे खेळ असतील..तुम्ही ते खेळत असाल तासंतास" मी आईला म्हणालो.
"आमच्या वेळेस नव्हते असले खेळ. आम्ही तर सागरगोट्या खेळायचो. मी, विजाक्का आणि चित्री.. काय मजा यायची सांगते तुला. कधी कधी तर अशी मस्त जुंपायची आमची.. पार एकमेकींच्या झिंज्या उपटायचो. आणि मग पाच मिनटात गळ्यात गळे घालून हिंडायला सुरुवात. तुझा मामा तर इतक्या गोट्या खेळायचा.  दोन्ही खिसे भरून गोट्या असायच्या. मारामारी, शिव्या... इतकी भांडणं आणायचा घरी काही विचारू नकोस, कुठून कुठून पोरं यायची.. बाप रे .. " आई पोळी गरम करता करता तिच्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा ताज्या करून वाढत होती.
"बाप रे, मामा आणि मारामाऱ्या? आणि शिव्या ? .. आणि मग नाना आजोबा मारायचे का मामा ला ?" मी विचारलं.
"मारायचे म्हणजे ? किती मारायचे सांगू, खूप मार खाल्लाय मामानं तुझ्या. एकदा कुठेतरी हातगाडीवर काहीतरी खाऊन आला. नानांना कळलं बाहेरून हे. चप्पल काढून मारला त्याला. चांगला झोडपला.
एकदा तर आईनं चित्रीला सांडशी फेकून मारली. काय झालेलं कोणास ठाऊक आईला चिडायला. अजूनही चीत्रीच्या कपाळावर खूण आहे ती. 
पण आमची आजी होती तेव्हा. ती घ्यायची प्रेमानं जवळ आम्हाला. कधी पाठीला बाम चोळून द्यायची, कधी गाणं गायची. खूप जीव लावायची आजी आमच्यावर" आई आठवणीत रमत रमत बोलायला लागली.
"बाप रे, आजोबा आणि आजी इतके तापट होते? विश्वासच नाही बसत. बरं जरा आमटी वाढ वाटीत" मला विषय थांबवायचा नव्हता त्यामुळे मी प्रश्नार्थक विचारलं.
"तो भालू भाऊ आहे की नाही ? मुंबईचा रे .. त्याला एकदा आमच्या आजीनं आमटी वाढली ताटामध्ये. तो म्हटला तिला, अग आजी ह्यात मुंग्या पडल्यात.. तर आजी म्हणते, छे रे, ती तर मोहरी आहे मोहरी, फोडणी दिलीये.. वेड्या.. चल संपव पटकन.. टाकू नकोस."
"काय सांगतेस ? आणि मग त्यानं ती आमटी प्यायली ? आई गं, हे जरा अती होतंय बरका.. " मी तिला तोडत म्हणालो.
माझ्या वाटीमध्ये असलेल्या आमटीमधल्या मोहरीकडे मी एक क्षुद्र आणि केविलवाणी नजर टाकली. ते पाहून ती मोहरी नसून फोडणी घातलेल्या मुंग्याच आहेत असं मला एका क्षणासाठी वाटलं.
असलं काहीतरी ऐकण्यात जेवण जायचं नाही, म्हणून मी विषय बदलायचा प्रयत्न केला.
"मग, मातोश्री, संक्रांत आली की तुमची, हलव्याचे दागिने नाहीत का यंदा .."
"नाही कसे ? आहेत की, पण ह्यावेळेस कमी करायचे.. जागून काम करणं सहन नाही होत आता. आवड म्हणून थोडेफार करायचे"
"बरं, मंडईत गेलीस तर हरभरा आण मला".
"अरे कालच पहिला एके ठिकाणी, काय महाग झालाय.. दहा रुपयांना एवडीशी पेंडी. ती पण कोवळ्या, पोकळ दाण्यांची.."
"नानांचे मित्र होते, 'सगरे' म्हणून ..  आता ह्या दिवसात ह्याSS इतक्या हरभऱ्याच्या पेंड्या आणून द्यायचे घरी. खा.. किती खायचं तितकं.. मग काही दिवसांनी लगेच पोतंभरून भुईमुगाच्या शेंगा ....
गेले ते मध्ये, मुलं मुंबईला असतात म्हणे. शेती विकली त्यांनी"
आईच्या कराडच्या एकेक जुन्या आठवणी ताज्या होऊन बाहेर पडत होत्या. तिचे हावभाव, आवाजातील व्याकुळता क्षणोक्षणी बदलत होती. ते ऐकायला खूप छान वाटत होतं. अश्या आठवणी मिळायला नशिबाची साथ असावी लागते म्हणा. आणि ते माझ्या नशिबात नाही ह्याची खंत माझ्या मनाला झोंबत होती.
आजी आजोबा कराडमध्ये होते तोपर्यंत दर मे महिन्यात जाणं व्हायचं. एकदा गेलो की ३०-३५ दिवस मुक्काम.
घराच्या बाहेर अंगणात असलेल्या मोरीवर एका दगडावर बसून मस्त अंघोळ करायची. जोरजोरात बाजीगर, रोजा ची गाणी म्हणायची. दुपारी टायर फिरवत सगळ्या गल्ल्यांमधून बोंबलत हिंडायचं. पोरं गोळा करून रस्त्यावर क्रिकेट खेळायचं. संध्याकाळ झाली की कृष्णामाईच्या घाटावर जायचं. ताज्या हवेचा, तिथल्या शांततेचा अपार आस्वाद घ्यायचा. रात्री मिलिंद मामाकडे पत्त्यांचा डाव रंगायचा. किंवा मग त्याच्या विसीआर वरती भाड्यानं पिक्चर आणून सगळ्यांनी मिळून बघायचा. झोप आली की परत आजीच्या घरी यायचं आणि शेणानं सारवलेल्या जमिनीवर ताणून द्यायची. दिवस कसा संपायचा कळायचं नाही. कधी कधी सगळ्यांनी मिळून खासगी गाडी करायची आणि फिरायला जायचं. त्यात बाजूला राहणारी सोनू, अतुल, शक्या, ओमकार, प्रवीण सगळेच शामिल व्हायचे.
आजीकडे गेलो की खायचे-प्यायचे भरपूर लाड. मी आणि ताई येणार म्हटल्यावर ती आधीच डबे भरून खायला करून ठेवायची. आमच्यासाठी जेवणात भाकरीच्या ऐवजी मग पोळ्या करायची. काय अप्रतिम चव असायची त्या सगळ्यालाच. आजोबा कुठूनतरी गुळाची काकवी घेऊन यायचे.
काय दिवस असायचे ते...त्या दिवसांना आज मी मुकतो ह्यात वादच नाही.
जवळपास आठ वर्षांनी कराडला जायची वेळ आली. त्याआधी जेव्हा कराडला गेलेलो तेव्हा अगदी धावती भेट झाली होती, त्यामुळे आठ नव्हे तर खूप वर्षांनी कराडला आलोय असं वाटत होतं.
अनेक बदल अपेक्षितच  होते. रस्त्यांमध्ये, घरांच्या रचनेमध्ये, आणि लोकांच्या स्वभावातसुद्धा.
निऱ्या बरोबर होता. त्याला घेऊन कृष्णामाईच्या घाटावर गेलो. परत एकदा तसंच प्रसन्न, शांत वातावरण अनुभवलं. ज्या गल्लीबोळातून टायर फिरवलं तिथून एक पायी रपेट मारली.
काही नातेवाइकांच्या घरी जाऊन भेटून आलो. बऱ्याच जणांनी ओळखलंच नाही.
तेजस हा समोरच राहणारा 'विशेष' मुलगा. पण तूसुद्धा वेद पाठशाळेत जातो हे ऐकून बरं वाटलं. अनिरुद्ध मामानं जुनं घर विकून त्याचं इमारतीत नवा २ बीएचके घेतलाय. मिलिंद मामा कोल्हापुरात कामाला असतो. कराडला क्वचितच फिरकतो. 'मिलिंद ऑफसेट' काही वर्षांपूर्वी बंद पडलं. मग अनिरुद्ध मामा आणि मिलिंद मामानं आपापले मार्ग स्वीकारले.
शक्या इंजिनियर झाला आणि किर्लोस्कर मध्ये लागलाय. दर विकेंडला कराडला येतो. ओमकार परळी वैजनाथला असतो. एम एस सी बी मध्ये लागला आहे.
प्रवीणचे लग्न झाले आणि त्याला एक मुलगा पण झालाय. ट्रेकच्या निमित्तानं सगळे परत एकदा भेटल्यावर खूप बरं वाटलं. मनातून खूप आनंद झाला.
"सोनू काय करते रे शक्या ?" मी सहजच विचारलं.
"काय ल्येका, इथं मी बसलोय माझं विचार की काय चाललंय, सोनू बद्दल बरं विचार्तुयीस" शक्यानं माझ्यावर पडी टाकली.
"गप्प रे .. उगाच घेऊ नको मला..  सांगतो का ती काय करते ते.."
"आर ल्येका, लग्न झालं तिचं. पुण्यालाच असते. मुलगी झाली परवा.. आलीये बघ माहेरी आत्ता. जायचं का भेटायला ?" शक्यानं विचारलं.
"अरे आत्ता नको, उद्या निघताना धावती भेट घेईन" मी विषय पुढे ढकलला.
जेवता जेवता खिडकीतून समोरच्या उंच इमारतीकडे नजर गेली. आजीचं घर एका पाच मजल्यांच्या इमारतीमध्ये रूपांतरित झालेलं.
सृष्टीच्या नियमानुसार प्रत्येक गोष्टीत बदल हा होतंच असतो. पण तो बदल कोणाच्या भावनांशी खेळ करून किंवा कोणाला फसवून झाला तर ते मनाला खूप लागतं. आजी-आजोबांच्या च्या घराबद्दल दुर्दैवानं हेच घडलं. त्यामुळे जेवताना थोडा नाराज झालो.
अश्या सगळ्या आठवणी गोळा करून निघायची वेळ आली. घरातून निघालो तेव्हा सोनुला नक्की भेटायचं ठरवलं होतं. पण हिंमत केलीच नाही. भेटू नंतर पुण्यात निवांत असं मनालाच खोटं समजावलं.
असो.
सांगायचा मुद्दा असा, की काही दिवसांपूर्वी आयुष्यातील अनेक गोष्टींना मी मुकलो असं मला वाटायचं. पण कराडला दिलेल्या एका भेटीनंतर आठवणींचा प्रचंड मोठा खजिना माझ्याबरोबर आहे ह्याची मला जाणीव झाली.
आई जशी तिच्या लहानपणीच्या आठवणी आज मला सांगते, तश्याच काहीश्या आठवणी आज माझ्याकडेही आहेत.
फक्त लहानपणीच्या नव्हे, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट हि एक आठवणच होणार आहे. मग ते पोरं गोळा करून गेम खेळणं असेल, किंवा चौकात कॉफी पीत गप्पा ठोकणं असेल.
आयटी मधली धावती गाडी असेल, किंवा विकेंडला अनुभवलेला किल्ल्यावरचा निवांतपणा असेल.
कदाचित आईच्या वाट्याला ज्या आठवणी आल्या आहेत, तितक्या समृद्ध नसतील माझ्या आठवणी. पण एक नक्की, माझ्या पुढच्या पिढीला  आठवणी सांगताना मी मोकळ्या हाताचा नक्कीच नाही. अजूनही त्यात भर पडणार ह्यात काही शंका नाही.