चकवा

कुवेत एअरवेज चे फ्लाईट ३११ मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावरून आकाशात झेप घेत होते, तसतसे आशिष चे विचारही मणामणाचे ओझे उतरावे तसे हलके होत होते. गेले१० महिने आणि त्या काळातल्या घडामोडी एखाद्या चित्रपटासारख्या त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. गेले एकदोन दिवस नव्हे, तर चक्क १० महिने आपण असे झपाटल्यागत कसे काय वागत होतो? याचा वचार करूनही त्याला उत्तर सापडेना!


रचना! एखाद्या स्वप्नातल्या परीसारखी! गोव्याला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना पहिल्याच दिवशी एक नवीन चेहरा दृष्टीस पडला. नजरानजर झाली, आणि तिने चक्क स्माईल दिलं! आशिष मनातून खूश झाला. मग रोजच स्माईल ची देवाणघेवाण सुरू झाली. कधी "गुड मॉर्निंग " तर कधी कॉफी, ओळख वाढत गेली. तिचे मनमुराद खळखळून हसणे आणि दिलखुलास स्वभाव याची मोहिनी कधी आशिष वर पडली, आणि कधी ती त्याच्या स्वप्नात शिरली, ते आशिष ला कळलंच नाही.

ती पहिल्या वर्षाला होती तर आशिष दुसऱ्या! आशिष त्याच शहरात लहानाचा मोठा झालेला, तर ती १०० किमी वरच्या दुसऱ्या गावातून आलेली, होस्टेल ला राहायची! त्यामुळे कॉलेज-जीवनातले, अभ्यासातले बरेवाईट अनुभव त्याने तिच्याशी शेअर केले, अनेक खाच-खळगे, प्राध्यापकांच्या सवयी, लकबी आणि शिक्षकांचे मन जिंकण्याच्या खुबी त्याने तिला समजावून दिल्या, हळूहळू अभ्यास /नोट्स आणि इतर कारणांनीही भेटीगाठी वाढू लागल्या. तीही हळूहळू त्याच्याकडे ओढली जात होतीच. पण "प्यार का इजहार" मात्र झाला नव्हता.

बघता -बघता २ वर्षे उलटली, आशिषचे कॉलेज संपले, आणि ती होती शेवटच्या वर्षाला. नोकरी लागल्यावर लग्नाचे विचारायचे असे आशिष ने ठरवले होते. आशिष ला शहरातल्याच एमआयडीसी मध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉब लागला. आणि तो रुळला देखील नव्या नोकरीत, दिवस मस्त चालले होते, शनवार-रविवार भेटी-गाठी सुरूच होत्या आणि शेवटी एका रविवारी संध्याकाळी बीच वर फिरताना आशिष ने लग्नाच गोष्ट काढली.

तिने अतिशय शांतपणे ऐकून घेतले, आणि म्हणाली, "तू म्हणतोस ते खरे आहे, मीही तुझ्या प्रेमात कधी पडले ते मलाही नाही कळले रे! पण लग्न म्हणजे खूप मोठा निर्णय आहे, मी अजून घरी काही सांगितलेले नाही, आणि कॉलेज संपल्यावर मला घरी परत जावे लागेल. मग आपल्या भेटी कशा होणार? " त्यावर आशिष म्हणाला, "मी तुझ्यासाठी इकडेच जॉब बघतो नां, माझ्या आता ओळखी झाल्या आहेत इकडे. तू घरी विषय तरी काढून बघ"

दिवाळीच्या सुट्टीत रचना घरी गेली तेव्हा आई-बाबांना तिने सर्व सांगितले, पण शेवटी जात आडवी आली, आशिष ब्राह्मण आणि ती इतर समाजातील! त्यामुळे ब्राह्मण घराण्यात इतर मुलगी कशी चालेल? आशिष चे आईवडील तिला स्वीकारतील का? याबाबत रचनाचे बाबा साशंक होते. पुढे काय रामायण वाढून ठेवलंय, या विचाराने त्यांना आता तिची काळजी वाटायला लागली.

सुट्टी संपल्यावर रचना परत कॉलेजला आली, आशिषला तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. आशिष ही काळजीत पडला. प्रेमात पडताना जात-धर्म कोण बघते का? आता पुढे काय? या विचाराने तो धास्तावला! पण दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या होत्या, आयुष्य एकमेकांबरोबर काढण्याचा दृढ-निश्चय होता, पुढचे पुढे बघू, म्हणून ती आणि तो आपापल्या कामात व्यग्र झाले.

कॉलेजचे शेवटचे वर्ष संपले आणि रचना फर्स्ट क्लास मध्ये पास झाली, आणि आशिष च्या ओळखीने एका कंपनीत ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉईन ही झाली. दिवस पुढे सरकत होते, हळहळू दोघांच्या प्रेमाची कुणकुण आशिषच्या घरी लागली आणि आशीशचे बाबा भयानक संतापले. आम्ही पर-जातीतली मुलगी चालवून घेणार नाही असा थयथयाट केला. तेव्हा पासून आशिष सतत टेन्शनमध्ये राहू लागला. कंपनीतल्या मित्रांनाही हे जाणवले की आशिष कुठल्यातरी संकटात आहे, त्यांनी धीर दिला. आम्ही लागेल ती मदत करू, घाबरू नकोस.

अशीच दोन वर्षे उलटली. आशिष चा रिझ्युम नौकरी. कॉम वर होताच. त्यामुळे त्याला कुवेतच्या एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीकडून इंटरव्ह्यू साठी कॉल आला. मुंबईत इंटरव्ह्यू झाला आणि गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर त्याची नियुक्ती झाली. आशिष मात्र एका बाजूने आनंदी, तर दुसऱ्या बाजूने रचना पासून दूर जावे लागणार म्हणून दू:खी होता. अशा द्विधा मन:स्थितीतच शेवटी ताने रचनाचा निरोप घेतला. मी तुझी वाट पाहीन, फोन-मेलं द्वारे संपर्कात राहूच! असे ठरले.

आशिष कुवेत ला आला, बघता बघता तिथल्या नवीन नोकरीत रमला. कंपनीने अतिशय आधुनिक आणि आरामदायक सोयी-सुविधा दिल्या होत्या. भारत आणि कुवेत मधला जमीन-अस्मानाचा फरक, याचेच कौतुक करत करत नव्याची नवलाई कधी सरली ते समजलेच नाही आशिषला, कुएतला एक वर्ष पूर्ण केल्यावर १ महिन्याची सुट्टी मिळणार होती. भारतात जाऊन लग्न करून घ्यावे आणि मग रचनाला इकडेच आणू, म्हणजे बाबांनाही त्रास नको आणि आपल्यालाही, असा विचार तो करत होता.

सुरुवातीला रचनाशी रोज फोन/मेल द्वारे बोलणे व्हायचे, तिकडचे फोटोही त्याने तिला पाठवले, पण हळूहळू रचनाकडून येणारा प्रतिसाद कमी होऊ लागला. रोज होणारे फोन आठवड्यातून एकदा होऊ लागले.... पुढे पुढे तर आशिषच्या मेल नां उत्तर न देणे, फोन न उचलणे असेही प्रकार घडू लागले.
त्यामुळे आशिष मनातून धास्तावलेला होता! आशीशचे कुवेतला एक वर्ष पूर्ण झाले, मुंबईत विमानतळावर उतरल्यावर अजिबात वेळ न दवडता त्याने थेट गावाकडची ट्रेन पकडली आणि घरी आला.

कंपनीतल्या मित्रांकडे रचनाची चौकशी केल्यावर जे कळले त्याने आशिष उडालाच! आशिष कुवेत ला गेल्यावर मधल्या काळात रचना संदीप नावाच्या दुसऱ्या एका मुलाच्या संपर्कात आली होती. तो होता पुण्याचा, पण शिकायला इकडे होता. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मागच्याच महिन्यात त्या दोघांचा साखरपुडा ही झाला!

संपले सगळे! आशिषच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. त्याने गेल्या ३-४ वर्षापासून वाढवलेले प्रेमाचे रोपटे या कुठल्याशा फडतूस संदीप ने पायदळी तुडवले होते. दू:ख, अपमान, फसवणूक अशा अनेक भावनांचा हलकल्लोळ झाला, आणि रागाच्या भरात त्याने या सगळ्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी रचनाच्या घरी जाण्याचे ठरवले!

दुसऱ्याच दिवशी काही जवळच्या मित्रांना घेऊन आशिष रचनाच्या घरी गेला, घरी रचना, संदीप, आई-वडील आणि रचनाचा भाऊ होता. आशिषला एक शब्दही बोलू न देता दमदाटी करून संदीप आणि रचनाच्या भावाने घराबाहेर काढले. आशिष अतिशय व्यथित झाला.

घरी परत येताना आशिष च्या गाडीला अपघात झाला, पण सुदैवाने त्याला फार लागले नाही, फक्त डोक्याला मुकामार लागला. २ दिवस हॉस्पिटल मध्ये काढून जेव्हा आशिष घरी आला, तेव्हा त्याला जाणवले की काहीतरी बिनसलंय... त्यानंतर त्याला रात्री नीट झोप येईनाशी झाली, विचित्र भीतिदायक स्वप्ने पडू लागली. एका रात्री तो ओरडत झोपेतून उठला तेव्हा घरच्यांनाही जाणवले काहीतरी बिघडलंय.

आशिषच्या बाबांनी त्यांच्या आध्यात्मिक गुरुंना आशिषची सर्व कहाणी सांगितली, ते म्हणाले की त्या मुलीच्या मित्राने तुमच्या मुलावर काळी जादू केलेली आहे... मग आशिष आपल्या आई-वडिलांसह नाशिक ला जाऊन विधी करून आला, तेव्हा कुठे त्याचे चित्त थाऱ्यावर आले! शेवटी आईबाबांना तुम्ही पसंत कराल त्या मुलीशीच मी लग्न करीन, असे वचन देऊन आशिषने परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली.
...
. या विचारांच्या तंद्रीतून आशिष जागा झाला तो विमानाच्या वैमानिकाने केलेल्या उद्घोषणेमुळे.. " थोडीही देर में कुवेत एअरवेज की फ्लाईट ३११ कुवेत अंतर-राष्ट्रीय हवाई अड्डे पर उतर रही है...... ". आणि मग विमानतळावर उतरल्यावर त्या गर्दींतलाच एक बनून आशिष हरवून गेला............................