याद आली खूप; म्हणुनी, काय तो माणूस येतो? (तरही गझल)

तरही गझल

श्री.विजय दिनकर पाटील यांच्या मतल्यातला अलौकिक सानी मिसरा घेवून
स्फुरलेली तरही गझल.......

याद आली खूप; म्हणुनी, काय तो माणूस येतो?
(नेहमी आभाळ भरले की, कुठे पाऊस येतो?)

काय,दरबारात साईच्या असाही भेद असतो?
रंक येतो, राव येतो, थोर वा फडतूस येतो!

भावते आंबट, अशीही माणसे असतात काही......
ती जिथे जातात, त्यांना वासही आंबूस येतो!

दांडगाई, दडपशाही, आरडाओरड किती...ही!
नेमका संभावितांच्या प्राक्तनी धुडगूस येतो!

चार पैसा काय माझ्या कनवटीला आज आला;
सोयरा प्रत्येक आता माझिया बाजूस येतो!

शेवटी प्रत्येक सासू ही कुणाची सून असते!
सून काहीही करू दे, राग का सासूस येतो?

माणसे प्रेमामधे, किंवा असो गुस्स्यामधेही....
चेहऱ्यावर माणसांच्या रंग का तांबूस येतो?

कार आहे, मात्र वापरतो उन्हाला, पावसाला...
नेमका मी कार नेतो, तर कुठे पाऊस येतो?

राबतो शेतामधे, शेतीतले कळते कुठे रे?
भाव नसतानाच का शेतात माझ्या ऊस येतो?

काय स्थावरजंगमाच्या धावतो माणूस मागे!
नागवा जातो, जसा तो नागवा माणूस येतो!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१