प्रेमास्तव

तुझी आठवण आली, मन सैरभैर झाले
अन मनाशीच माझ्या; माझे हाडवैर झाले

काही सुचता सुचेना; काही गमता गमेना
मन उधळे चौखूर, कोठे रमता रमेना
एकीकडे ध्यास तुझा; एकीकडे यश किर्ती
मन हिंदोळे हिंदोळे; जशी ओहोटी नि भरती
काय करावे कळेना; उरी प्रेम येई दाटून
घेई मजला कवेत; वा दूर दे लोटून
तूच यक्षप्रश्न माझा; तूच उत्तर तयाचे
तूच भाग्योदय माझा; तूच कारण लयाचे
तुज साठीच मजला; जग जिंकावे वाटते
जग जिंकता जिंकता, तुला विसरावे लागते
बास झाला आता छळ, नाही सोसत ही कळ
प्रेमास्तव जगण्याचे; मिळो मनास या बळ