समांतर

             दूरवर मिसिसिपीच्या बाजूने जाणारा एकेरी रस्ता, उंचच उंच दाट झाडी आणि तळपणारा सूर्य सोडून काहीही दिसत नव्हतं. ख्रिस्ती आणि ग्रेगला एअरपोर्ट सोडून एक तास झाला होता. तरी अजून त्यांच्या मुक्कामी ते काही पोचले नव्हते. बरं बोलून तरी किती बोलणार  ते? तो तिचा बॉस होता तेही १५-२० वर्षे मोठा.  त्याच्याशी बोलायचे तरी काय असा प्रश्नच होता. तिला नोकरीला लागून ६ महिने तर झाले होते. तिचा डिपार्टमेंटचा डिरेक्टर म्हणून ओळख झाली होती पण कामाचं बोलणं क्वचितच  व्हायचं, तेही फारतर तासभर महिन्यातून.   ती जरा बिचकूनच असायची त्याला. उगाच कुठे उलटे बोलला तर वाईट वाटायला नको म्हणून जपूनच बोलायची. आता हा प्रोजेक्ट सुरू झाला आणि त्यांचे बोलणे थोडेफार वाढले.  ते दोघेही प्रोजेक्टसाठी एका गावात येत होते, टेनेसी मधलं ते छोटंसं गाव. तिथे जायला लोक टाळायचे. अडीच तीन हजाराची वस्ती असलेलं ते गाव, मोजून  ५००-६०० घरं, तीही ठीकठाकच.   दर दोन वर्षांनी नवीन इंजिनियर तिथे जायचा, नवीन लागला कंपनीत की. काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यासारखे दिवस काढायचा आणि कॉर्पोरेट ऑफिसला परत यायचा. यावेळी ख्रिस्तीचा नंबर होता. पण ती कदाचित तिथे जाणारी  शेवटची इम्जीनियर असणार होती.       

            बरेच  दिवस कंपनीने त्या प्लांट कडे दुर्लक्ष केले होते, 'ऑर्डर तिकडे गेली की ती बाहेर येतेय ना? मग जाऊ दे' म्हणून सर्वजण  सोडून देत होते.   कंपनीचा कपड्यांचा व्यापार होता. कपडे म्हणजे युनिफॉर्म विकायचा. त्यासाठी ४०-५० तरी वेअरहाउसेस भरलेली पूर्ण अमेरिकेत त्यांची. या छोट्याशा गावात १८-२० वर्षापूर्वी एक छोटासा प्लांट सुरू केला होता इम्ब्रोयडरीसाठी. ज्या युनिफॉर्मवर विशेष कारागिरी करून हवी असेल ते सर्व इथे पाठवले जायचे. आणि हा एकच प्लांट ते काम करत असल्याने कितीही गोंधळ  झाला तरी तो प्लांट अजून तग धरून होता.  आता नाईलाज झाला होता, तिथे जायलाच पाहिजे होतं कुणीतरी, तिथला गोंधळ निस्तरायला.   बऱ्याच तक्रारी येऊन गेल्या होत्या ऑर्डर्सबद्दल. कितीही जरुरी असले तरी बाकी अनेक लोकांना न पाठवता स्वतः:च यायचा निर्णय ग्रेगने का घेतला ते काही कुणाला कळलं नव्हतं. असो.  दोन दिवस ग्रेग आणि ख्रिस्ती तिथे राहणार होते.

            दिडेक तासांनी ख्रिस्तीला वॉलमार्ट दिसलं आणि वाळवंटात पाणी दिसल्याचा आनंद झाला तिला. गाडीतून उतरून ख्रिस्ती दुकानात गेली. समोर एक गोरा सहा फुटी माणूस दिसला. भुरे केस, उन्हात लालसर झालेली त्याची स्कीन आणि एक हलकंसं स्मित! क्षणभर त्याला बघून हुरळूनच गेली ती जणू.  तर तिथला मॅनेजर होता तो. तिने त्याच्या शर्टावर नाव वाचले, 'जिमी'. तिने त्याला विचारले, ' हाय जिमी, इथे जो कंपनीचा प्लांट आहे तिथे कसे जायचे? '.   त्याने त्याच्या सदर्न बोलीत तिला रस्ता सांगितला आणि जाता जाता टोमणाही मारला, 'कॉर्पोरेटचे लोक ना तुम्ही? इथे हे असले कपडे चालत नाहीत बाईसाहेब. ' आपल्या ब्रान्डेड  सूट ला असे बोलल्याचा जरा रागच आला तिला. पण ती सटकली तिथून. आणि एकदम जाणवले, अरे इरवी  सूट  घालणारा  ग्रेगही  आज जीन्स घालून आला आहे. १५-२० मिनिटात ते प्लांट जवळ पोचले.  चार लाल विटांनी  बांधलेल्या भिंती आणि एका छप्पर इतकंच काय ते होतं तिथे प्लांट म्हणून. समोर कंपनीचा बोर्ड होता तोही थोडा फार रंग गेलेला.    आत ढीगच्या ढीग कपड्यांचे एका कोपऱ्यात पडलेले होते, त्यावर वेगवेगळ्या वेंडरची नावे लिहिलेली नारंगी रंगाची स्टिकर लावलेली होती. मध्येच भिंती उभ्या करून ऑफिस बनवले होते तर एका कोपऱ्यात  ब्रेकरूम असे  लिहिलेले होते. त्याच्या शेजारी रेस्टरूम.

           तिथे गेल्या गेल्या ग्रेगचा चेहरा संतापाने लाल झाला होता. ख्रिस्तीला बाकीचे स्वच्छ, नीटनेटके  वेअरहाउसेस आठवले. तिला  माहीत होते की, आधी जाऊन आलेल्या सर्व इंजिनियरांचे काही खरे नाही.    ८-१० लोक फोर्केलीफ्टने अजून थोडे कपड्यांचे  ढीग आणून आधीच्या जागी जमा करत होते. एक मुलगी एका टेबलावर मेलमधून आलेल्या ऑर्डर सुट्या करून ठेवत होती. एका भिंतीला लागून  ६ शिलाई मशीन ठेवलेली होती. त्यांच्याशेजारी बास्केट होत्या कपडे ठेवलेल्या. त्यांच्याच पुढे एका टेबलवर दोन कम्प्युटर ठेवलेले होते. एकाची स्क्रीन १३ इंच होती तर दुसऱ्याची २२ इंच. शेजारी मोठा फायलींचा ढीग आणि त्यांच्या मागे एक ४*६ ची फोटो फ्रेम. त्यात एका  सुंदर  तरुणीचा फोटो. सर्व गोष्टी बघत बघता, ग्रेग ख्रिस्तीला काय काय बदलले पाहिजे याची नोंद करायला सांगत होता. ती ते सर्व टिपून घेत होती. तेव्हढ्यात मागून एका हाक ऐकू आली, 'ग्रेगरी, इज दयाट यू? '. दोघांनीही दचकून मागे पाहिले. एक ४५-४८ वर्षाची स्त्री उभी होती. तिच्या कपड्यांवरून वाटत होते  की या गावात गेले १५-२० वर्ष नवीन ट्रेड आलेच नसावेत. तिच्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या वयाच्या रेषा दिसत होत्या. लालसर गोरी त्वचा, केस कुरळे, सुंदर, भुरे, उंची ५'६", गळ्यात एक चष्मा आणि डोळ्यावर एक. तिच्याकडे पाहताना ख्रिस्तीला कळले की  हीच ती फोटोमधली सुंदर तरुणी आहे. तिच्याकडे निरखून पाहतेय तेव्हढ्यात तिला घाईने जाऊन गळाभेट घेणारा ग्रेग दिसला आणि क्षणभर  काही कळले   नाही. एरवी लोकांना कोसभर दूर ठेवणारा हाच का तो ग्रेग. कुणाला  सर्दी झाली असेल तर स्वतः:च्या रूममध्ये कशाला हातही लावू द्यायच्या नाही तो.
तर दोन मिनिटांची गळाभेट झाली आणि सर्व परत जागेवर आले.

           ग्रेगने ओळख करून दिली, ' ही  ग्रेस. इथली सर्वात जुनी व्यक्ती.   एकदम सुंदर कलाकार आहे'. 'ग्रेग, कलाकार काय रे? कपड्यांवर नाव लिहिणाऱ्या माणसाला कलाकार म्हणतात का? हा एकदम असाच आहे आधीपासून बघ, सर्व चढवून बोलायचं. म्हणून तर आज एव्हढा मोठा झालाय. नाहीतर आम्ही इथेच आहे अजून. ' ख्रिस्तीकडे  बघत ग्रेस बोलली. ग्रेगला असं हसताना बघून ख्रिस्तीला जरा वेगळंच वाटत होतं. कधी पाहिलं नव्हतं ना असं. पुढे ग्रेस बोलत राहिली, 'इतका मोठा झाला की गेल्या १७-१८ वर्षात परत दिसला पण नाही. मी कॉर्पोरेटच्या मेल वाचते तश्या. बरं वाटायचं तुझी प्रगती बघून. बरं आहे न सर्व? कसा काय आलास इकडे? '.  ग्रेगने तिला समोरच्या पसाऱ्याकडे हात दाखवून विचारले, 'काय हे? मी आलो नाही तर कुणीच नाही बघितलं हे सर्व? आता खूप उशीर झाला सर्व ठीक करायला. असो, बघू जरा काय काय काम चालू आहे इथे? '. ग्रेसने एकेक प्रोसेस दाखवली, ऑर्डर कशा येतात, मग ती मुलगी त्या सुट्या करून ठेवते, मग ऑर्डरनुसार ग्रेस लोगो निवडते,  त्याची एक कॉपी फ्लॉपी मध्ये टाकून मशीनमध्ये लोड करते आणि मशीनवर शेवटी त्या डिझाईन प्रमाणे लोगो इम्ब्रोयडरी करून मिळतो. त्यात मध्ये मध्ये ग्रेस तिचा डोळ्याला लावलेला चष्मा आणि गळ्यातला चष्मा आलटून पालटून वापरत होती. तिने ग्रेग ला विचारले, 'तुला आठवल्या या  फ्लॉपी डिस्क? तेव्हाच वाटलं होतं तू काहीतरी वेगळं करशील म्हणून. आम्ही अजूनही  तू करून गेलेल्या वस्तूच वापरत आहे. '
          ग्रेग ला जुन्या गोष्टी आठवून हरवल्यासारखं  झालं होतं. खरंच १८ वर्ष झाली?   त्याला त्यांच्या त्या दोन वर्षांची आठवण झाली. किती कोवळा होता तो खरंच मनाने आणि अनुभवानेही. नुकत्याच सुरू झालेल्या प्लांट मध्ये ग्रेस नोकरीला लागली होती.  तिची ती रंगांची निवड, धाग्याची पारख आणि प्रत्येक वळण बारकाव्याने पाहण्याची सवय, सर्वच सुंदर होतं तिच्यासारखंच. तोही नुकताच इंजिनियर होऊन आला होता इथे मोठ्या उमेदीने, नवीन तंत्र, नवीन प्लांट एकट्याने उभारण्याच्या हट्टाने.   ग्रेसचं लग्न झालेलं होतं म्हणे. तिचा नवरा आणि ती वेगास ला जाऊन लग्न करून आले होते आणि पुढच्या ४-५ वर्षात वेगळे व्हायची वेळ आली होती.   एक मुलगाही होता तिला.  दारुड्या नवऱ्यापासून वेगळं होण्यासाठी स्वतंत्र व्हायचा ध्यास होता तिला आता फक्त.  सर्व माहीत असूनही तिची ओढ त्याला  होतीच. तिलाही तसा तो आवडायचा पण एकदा तोंड पोळल्यावर पुन्हा घाईने निर्णय घेणार नव्हती ती. त्याची तिथली दोन वर्षं संपत आल्यावर त्याने तिला विचारलंही, ' येशील माझ्यासोबत? इथे काय आहे या गावात आपल्यासाठी? चल बाहेर पडू, एकत्र राहू, आयुष्यभर. ' ती हो म्हणाली म्हणून त्याने कॉर्पोरेटची एक पोझिशन स्वीकारली होती. सर्व काही झाले होते, फक्त गावातून निघणेच काय ते बाकी होते. एक आठवडा  बाकी होता आणि ग्रेस येऊन बोलली ग्रेगला, 'नाही रे जमणार मला यायला. मुलासाठी का होईना थांबला पाहिजे मला इथे. त्याचा बाप माझा कुणी नसला तरी पोराला भेटणारच ना? आणि मी कधी बाहेरच नाही पडले या गावातून. मला नाही जमणार कॉर्पोरेटच्या जगात काम करायला. माझे कपडे बघ, बोलणं बघ, सर्वच जुनाट. तुझी गोष्ट वेगळी आहे, तू त्याच्यामधलाच आहेस. ' चार दिवसात ग्रेग ने खूप प्रयत्न केले तिला मनवायचे. पण नाहीच. शेवटी त्यांचे मार्ग वेगळे झालेच....

          ग्रेसला चष्मा लावून कंप्युटर वर बघताना त्याला जाणवलं, तिलाही 'चाळीशी' लागलीच.  ती एकदम निरागसपणे सांगत होती की कसे एक रिपोर्ट फक्त छोट्या स्क्रीनवर नीट दिसतो आणि बाकी सर्व मोठ्या स्क्रीनवर बघावे लागते. त्यामुळे तिला दोन चष्मे, दोन स्क्रीन असे नाटक सांभाळावे लागते.त्याला तिची 'फ्लॉपी डिस्क' ची धडपड आठवली आणि थोडंसं हसू आलं. अजूनही तशीच आहे ती. पुढे ती त्या टेबला जवळच्या मुलीकडे  आली  आणि म्हणाली, 'ही माझी सून, मुलगा, 'जिमी' वॉलमार्टमध्ये मॅनेजर आहे. '. बरेच tattoo आणि जिथे मिळेल तिथे टोचलेले दागिने असलेल्या  त्या २०-२२ वर्षाच्या मुलीकडे बघून ख्रिस्तीला वॉलमार्ट मधला तो स्मार्ट 'जिमी' आठवला. त्याला 'ही' मिळाली?   ती विचार करतेय तोवर ग्रेग ग्रेसला त्याचा आई-पॅड दाखवत होता, ' या माझ्या मुली. आईवर गेल्यात एकदम. हट्टी आणि देखण्या. दोन वर्षापूर्वी ती गेली कॅन्सरने. आता आम्ही तिघेच असतो घरी.  ' त्याला इतकं मोकळं बोलताना ख्रिस्तीने पहिल्यांदाच पहिले होते. दोघे बोलत बोलत केव्हाच पुढे निघून गेले होते. ती मागून येतेय याचंही भान नव्हतं त्यांना.

           ग्रेग तिला सांगत होता. ' इथल्या या बेशिस्तीमुळे बराच त्रास होतोय कंपनीला. किती तक्रारींकडे दुर्लक्ष करणार? आधी विचार चालला होता की काही थोडाफार बदल करून सुधारणा होते का बघायचे म्हणून. पण या गावात इतक्या दूर काही सोयी पण नाहीत. नवीन काही करायचं म्हणजे लोक पण तयार पाहिजेत न बदल स्वीकारायला. तूच बघ, अजूनही तशीच आहेस. ' हे कौतुक का टोमणा हे मात्र कळलं नाही ग्रेसला. 'मला तर वाटतंय की प्लांट बंदच करायला लागणार आहे. नवीन ठिकाणी सर्वच करणं सोपं आहे इथे काही करण्यापेक्षा. ' 'अरे पण, ग्रेगरी, इथली ही १००-२०० लोकं कुठे जाणार?   मला माहितेय तुझ्याकडे एकच माणूस चार कामं करतो, तसं नाही होत इथे. सगळं साचेबद्ध नाहीये, तुला हवं तसं. पण इथे दोन-चार तर कंपन्या आहेत. ते तरी कुठे जाणार? आणि मी तरी कुठे जाणार आहे इतक्या वर्षांनी? '  त्यांचं बोलणं ख्रिस्तीला बघून एकदम थांबलं. दिवस संपत आला होता, ग्रेग आणि ख्रिस्ती हॉटेलवर गेले.

           दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम फ्रेश वाटणारा ग्रेग प्लांट मध्ये आला. काळापेक्षाही जास्तच उत्साही वाटत होता तो. आणि ख्रिस्ती  काही बोलणार इतक्यात सरळ ग्रेसकडे गेलाही होता तो. 'ऐक', एकदम उत्साहात बोलला तो. 'प्लांट तर बंद करावाच लागणार आहे. पण तुला इतका अनुभव आहे  इम्ब्रोयडरीचा. सर्व लोगो, टाके, त्यांचे बारकावे सर्वच तुला माहीत आहे. तूच ये ना कॉर्पोरेटला?  फक्त नवीन मशीन आणावे लागतील आणि नवीन जागा इतकेच. बाकी मी आहेच मदतीला. तुला नवीन प्लांट वर काम करता येईल आणि प्रमोशनही मिळेल ते निराळेच. ' त्याचा उत्साह बघून ग्रेसला कळत नव्हतं काय बोलावं. तिला तोच २३-२४ वर्षाचा ग्रेग आठवला. रोज सकाळी नव्या उमेदीने काम करणारा. ताठ खांदे, मान सरळ आणि दोनही हात कमरेवर ठेवून उत्साहात बोलणारा. तसाच तो. तेव्हाही नाही म्हणणं किती जड गेलं होतं तिला.  पण पोरात जीव होता. आणि पुन्हा काही चुकलं तर नव्याने सुरुवात करायची हिंमत पण नव्हती. आधीच नाही म्हणाली असती तर तोही इथेच राहून गेला असता. त्यामुळे त्याचं जाणं नक्की झाल्यावरच तिने नकार दिला होता. आज पुन्हा तोच प्रश्न? काल त्याला बघून इतक्या वर्षाचा थकवा कसा पळून गेल्यासारखा वाटत होता. पुन्हा एकदा तरुण व्हावंसं वाटत होतं.  पण म्हणून एकदम गावंच सोडून जायचं?    ती म्हणाली, 'सांगते संध्याकाळी. आहेस ना आज इथेच? '. त्याचा दिवस तसा विचारातच गेला आणि तिचा त्याला न्याहाळण्यात. संध्याकाळी ती त्याला म्हणाली, 'चल ब्रेकरूम मध्ये बसू जरा. ' तिथल्या अनेक संध्याकाळी त्याला आठवल्या तिथे गेल्यावर. कशा सर्वच प्रेमाने मोहोरलेल्या आणि काम संपलं तरी पावलं जडावलेल्या.

           'बरं तू म्हणालास ते सर्व खरं. पण माझं ऐकशील? मला नाही जमायचं रे नव्याने सर्व करणं. आता शिकायचं वय नाही राहिलं माझं. आणि दोन-तीन वर्षात नातवंड होतील. त्यांनाही पाहिले पाहिजे ना. आणि नोकरीचे काय जिमी देईल वॉलमार्टमध्ये मला काहीतरी काम. करेन तेच. '

           'मला वाटलंच होतं तू नाही म्हणशील. आधी पण तसंच केलंस. जाऊ दे न, मी पण उगाच आलो इथे. झाला तर झाला बंद प्लांट हजारो लोकं आहेत कामाला हाताखाली, त्यांनाच पाठवायला हवं होतं. '.

          'असं नाही रे ग्रेगरी. मागच्या वेळी तुला आधी हो म्हणाले म्हणून तर गेलास तू तिकडे. नाहीतर इथेच राहिला असतास माझ्या सारखा. तू आहेसच हुशार. बघ किती पुढे गेलास ते. माझ्या साठी इथे राहून काहीच मिळालं नसतं बघ. आणि आता तर ती वेळही निघून गेली. अर्ध आयुष्य गेल्यावर कुठे नवीन सुरुवात करू? '

          तो तावातावाने म्हणाला, ' म्हणजे आपलं आयुष्य असंच जाणार समांतर. कधीच नाही का या रेषा एकत्र येणार? ' ती निरुत्तर होती.  ख्रिस्ती ने आपला संवाद एकाला याचं दोघांनाही भान नव्हतं.  ग्रेगने मग  कुणाला तरी फोन केला आणि पुढच्या चार तासांमध्ये असणारी फ्लाईट बुक केली. ख्रिस्तीही निघाली त्याच्यासोबत. आणि त्यांचं बोलणं एकलं होतं त्यांमुळे पुढचे ४ तास त्याच्याशी एका शब्दही ती बोलू शकली नव्हती. तिला पहिल्यांदाच त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं. माणसाला कितीही मोठं झालं तरी सर्वच मिळतं असं नाही, नाही का? दोन दिवसांनी त्याने एक मीटिंग घेतली. तिथे सर्व डिरेक्टर त्या प्लांट बद्दल निर्णय घेणार होते. पुढच्या सर्व चौकश्या करायला  ग्रेगने दुसऱ्या एकाला पाठवून दिले होते.
           मीटिंगमध्ये आलेला तो रुक्ष ग्रेग आणि तिकडे प्लांटमध्ये पाहिलेला ग्रेग यात जमीन अस्मानाचा फरक होता. त्याने आपल्या निर्णायक आवाजात तिथली परिस्थिती सांगितली. नवीन प्लांट कुठे, कसा, कधी उभा करायचा याची योजनाही दाखवली.  सर्व लोकांना एकेक करून काढावे लागेल ते ही सर्व सांगितले. ख्रिस्तीला हे सर्व ऐकून खूपच बेचैन होत होते, पण पर्याय नव्हता. ती स्वतः: साक्षीदार होती सर्व परिस्थितीला आणि बाकी सर्व गोष्टींनाही.  शेवटचे काही मुद्दे, ग्रेगनंतर जाऊन आलेल्या इंजिनियराने सांगितले. शेवटी तो म्हणाला, 'आणि हो, तिथे जी लीड आहे ना  इम्ब्रोयडरीची तिने आपली ऑफर मंजूर केली आहे. म्हणजे आता नवीन कुणी शोधायला नको. '

        ग्रेगच्या आठ्या पडलेल्या चेहऱ्यावर एकदम हलकेसे हसू आल्याचा भास झाला ख्रिस्तीला. आज १८ वर्षांनी का होईना दोन रेषांमधलं अंतर कमी होणार होतं.

-विद्या.