गझल(तरही)
विस्मृती झरतात संततधार हल्ली!
(दाटते आहे निराशा फार हल्ली!!)
शुद्ध झोपेची न खाण्याची, पिण्याची!
होय अंतरजाल हा आजार हल्ली!!
आज लाखोली कुणीही लाख वाहो.....
मी परत करतो शिव्या साभार हल्ली!
शायरी माझी जरा ऎकून घेते!
बायकोचा वाटतो आधार हल्ली!!
एकमेकांनाच श्रीफळ, शाल देती;
साजरे होती असे सत्कार हल्ली!
शांत मी आहे स्वभावाने तरीही....
शायरीमध्ये झरे अंगार हल्ली!
मायबोलीवर न माशांचा तुटवडा!
रोज भरतो मासळीबाजार हल्ली!!
थांबवू का शायरीची उधळमाधळ?
वाटतो घाट्यातला व्यवहार हल्ली!
काय तू प्रेमाबिमामध्ये न माझ्या?
कळत का नाही तुझा होकार हल्ली!
टंकतो दिनरात नुसती उत्तरे मी!
होय प्रश्नांचा किती भडिमार हल्ली!!
केवढा बाणा मराठी काय सांगू?
ते गझल लिहितात बाणेदार हल्ली!
दार ठोठावून मृत्यू काय गेला......
भेटुनी जातात वारसदार हल्ली!
वेतनेतर कैक भत्ते, लठ्ठ मिळकत!
राहती थाटात नोकरदार हल्ली!!
रेटण्यासाठी प्रपंचाचाच गाडा....
ठेवतो तारण उभे घरदार हल्ली!
कष्ट करतो, पोट भरतो, शांत निजतो!
चालला झोकामधे संसार हल्ली!!
नोकरीमधुनी जसा निवृत्त झालो.....
बायकोचा चालतो अधिकार हल्ली!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१