कधी मी आगही प्यालो, कधी मी झोकला वारा!

कधी मी आगही प्यालो, कधी मी झोकला वारा!
कधी मी वेचल्या ठिणग्या, कधी मी वेचल्या गारा!!

गळाले फूल चाफ्याचे, तिच्या वेणीतुनी ऐसे;
अवेळी कोसळे कोणी नभामधला जसा तारा!

तिचे ते ओठ थरथरते, जणू वीणाच गाणारी!
कशा छेडायच्या आधी अशा झंकारती तारा?

कधी दिंडी, कधी माझी निघाली धिंडही येथे;
जगाला लाभला होता जणू हुकमीच डोलारा!

दिल्या हाका मला कोणी? कुठे मी चाललो आहे?
मला पाहून का केला दिशांनी आज पोबारा?

मलाही पेलवेना का स्वत:ची जिंदगी माझी?
असे का लागले वाटू? जणू मी वाहतो भारा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१