तुझा आभासही आता मनाला वाटतो दावा!
तुझ्यामध्ये अहोरात्री किती हा जीव गुंतावा?
तुझी दिसते खुबी मजला इथे दृश्यात एकेका....
मला हे ओळखू आले....न हा नुसताच देखावा!
रगाड्यातून कामाच्या कुठे मज वेळ वाचाया?
मला प्रत्येक क्षण येतो नवा घेवून सांगावा!
विसर पडतोच देवाचा, परंतू दु:ख आले की,
न चुकता त्याच देवाचा सुरू करतात ते धावा!
पहा कोणासही त्याच्या दिसे हातात मोबाइल!
जवळ हे विश्व आलेले, हरवला मात्र ओलावा!!
किती छोटे, किती साधे, असो घर आपले असते!
स्वत:चे खोपटे सुद्धा, अरे, प्रासाद मानावा!!
न लागे वेळ तोडाया, कधीही कोणते नाते....
उभे आयुष्यही लागो, परी माणूस जोडावा!
सतत रोमांचते काया, सुरांनी मारव्याच्या या;
कळेना कोण वाजवतो? असा श्वासांमधे पावा!
असे नाही न चुकतो मी, चुका होतात माझ्याही!
न चुकता मात्र मी घेतो चुकांचा रोज आढावा!!
पचवली हार की, कळते खरी जिंकायची गोडी!
पडो पदरात काहीही, नव्याने डाव मांडावा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१