गझल
भाबड्या मनाला माझ्या पढवून नको ते बसलो!
ती सहज हासली अन् मी समजून नको ते बसलो!!
अद्याप समजले नाही मन तिचे म्हणावे तैसे;
मी अर्थ तिच्या नजरेचे जुळवून नको ते बसलो!
ठसठसू लागल्या माझ्या प्राणांत गुलाबी जखमा.....
मी नकळत काही धागे उसवून नको ते बसलो!
माझ्याच मनाची आता समजूत कशी घालू मी?
मी मनोगतांचे कित्ते गिरवून नको ते बसलो!
लोटल्या बघ्यांच्या झुंडी, मी नव्हतो भानावरती;
फुटलेल्या धरणासम मी बरळून नको ते बसलो!
शेवटी जुंपले त्यांनी मजलाच हाय घाण्याला!
मी ठरलो दीडशहाणा, सुचवून नको ते बसलो!
आवरू कसा मी आता स्मरणांचा सांग पसारा?
मी तुला शोधण्यासाठी, पसरून नको ते बसलो!
------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१