सुगंधी गर्भ ज्याचा तोच दरवळणार गाभारा!
न त्याला काळजी कसली....सुटो किंवा पडो वारा!!
असे जात्याच दरवळते हृदय वक्षामधे ज्याच्या......
नको त्याला तुझे अत्तर, नको कुठलाच फव्वारा!
जगाची रीत ही आहे, न ठेवावी अपेक्षा तू!
सुखाचे सोबती सारे, करी दु:खात पोबारा!!
अशी प्रात्यक्षिके असती महाविद्यालयामध्ये....
बिडीकाडी, चहा चालू; मुलांना देवुनी चारा!
जळावा धूप गाभारी, तसे आयुष्य पेटावे!
बनावे राख, पण व्हावे.....जगाला एक अंगारा!!
समुद्रासारखी दुनिया, दिशांचा ना कुठे पत्ता!
मला पण, हात तो देतो, तुझ्या गगनातला तारा!!
मदत ज्याला हवी त्याला करावी मुक्तहस्ताने!
वहावा आपला आपण शिताफीने अरे, भारा!!
मनाच्या अंगणामध्ये सरी येतात स्मरणांच्या.....
मला अद्याप आठवते कशा मी वेचल्या गारा!
किती मी फाटका होतो....विसरलो मी न काहीही!
अरे, शून्यातुनी केला उभा मी आज डोलारा!!
मला साधायचे आहे, मला ते दे जरा साधू,
मनाचे खेळ थांबव तू! नको लावूस रे नारा!
उभे आयुष्य मी गझले! तुझ्या मागेच तर धावे!
तरीही समजले नाही.....न ये हातामधे पारा!!
जुनी वस्तू घरी असते, तरी वस्तू नवी येते!
घरी मग फक्त वस्तूंचा पसारा माजतो सारा!!
किती दु:खे पचवली मी, किती मी ढाळले अश्रू!
न लागो द्रृष्ट कोणाची, सुखाच्या आज संसारा!!
मला हा गोडवा अंगी कधी लागायचा नाही!
कसा पाण्यामधे गोड्या, जगावा मत्स्य रे खारा?
तुला प्रज्ञा तशी प्रतिभा दिली बुद्धयाच देवाने!
तरी अभ्यास नेमाने न चुकता रोज संथारा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१