शोधतो मी ज्यास तो हा चेहरा नाही!
लोचने करतात दावा तो खरा नाही!!
लागले डोळे तुझ्या वाटेकडे माझे....
एवढा माझ्यावरी रुसवा बरा नाही!
पाहिजे होते तुला जगणे चिरेबंदी;
सांधता आला मला साधा चरा नाही!
माळरानासारखी ही माणसे सारी!
एकही, हृदयात प्रेमाचा झरा नाही!!
हा सुखाचा कैफ माझ्या काय कामाचा?
कैद मी व्हावे असा हा पिंजरा नाही!
जिंदगीचा केवढा गोतावळा होता!
द्यायला खांदा कुणीही सोयरा नाही!!
फूल मी होतो तुझ्या वेलीस आलेले!
का म्हणावे मी?....मिळाला आसरा नाही!!
जीवनाचे सर्व दरवाजे खुले केले!
खाजगी कुठलाच आता कोपरा नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१