पाहिलेस तू करून जे तुला करायचे!

गझल
पाहिलेस तू करून जे तुला करायचे!
जीवना! अजून काय राहिले घडायचे?   

पाज वीषही खुशाल, मी तयार प्यायला!
एवढेच जाणतो...मला अरे जगायचे!!

निर्झरामुळेच हे कळावयास लागले.....
गात यायचे तसेच गात गात जायचे!

सारखी परिस्थिती, कधीच राहणार ना;
घे शिकून की, कसे हळूहळू रुळायचे!

वृक्ष राहतो बिजात, तू तसा तुझ्यामधे!
विस्मरू नकोस तू, तुला इथे रुजायचे!!

जास्त पात्रतेहुनी, मला दिलेस ईश्वरा!
तूच सांग हे मला, पुढे कसे निभायचे?

 खेळ खेळल्यासमान जिंदगी जगायची!
जीत व्हायची कधी, कधी तरी हरायचे!!

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१