गझल
दगदगीमधे नित्याच्या प्रेमाला फुरसत होती!
जगण्यात रोजच्या सुद्धा वेगळीच गंमत होती!!
ती बड्या बड्या धेंडांची बसलेली पंगत होती.....
माझीच हजेरी तेथे तेवढी विसंगत होती!
का म्हणून मज वाटावा, हसण्याचा त्यांच्या हेवा?
कोणत्या सुखाला त्यांच्या दु:खांची सोबत होती?
उधळून मुक्तहस्ताने टाकली तरीही उरली...
नावावर माझ्या इतकी गझलांची दौलत होती!
ते सलाम मजला नव्हते, खुर्चीला सलाम होते!
मी म्हणायचो की, माझ्या शब्दांना किंमत होती!!
गातात गोडवे आता बघ एकमुखाने सारे.....
तो जिवंत होता तेव्हा, कोणाला किंमत होती?
एकटाच चालत होतो....तो रस्ता तसाच होता!
वाटले न पण एकाकी, रस्त्याची सोबत होती!!
कष्टाला सीमा नव्हती, वय देखिल तरूण होते!
स्वप्नांची झापड होती, जीवनात रंगत होती!!
या अपंग पायांनीही चालली जिंदगी माझी.....
सर शिखरांना करण्याची पण, मनात हिंमत होती!
मज कसे मायबापांनी छोट्याचे मोठे केले?
बापाची माझ्या तेव्हा किरकोळच मिळकत होती!
सोहळा यशाचा नाही साजरा कधीही केला!
ना हाव यशाला होती, ना माझी ऐपत होती!!
ती वाट वाळवंटाची, सोबतीस मृगजळ होते!
जाणीव तृषेला होती....ती निव्वळ फसगत होती!!
सर्कशीत आयुष्याच्या, मी एक विदूषक होतो!
आतल्या आत रडण्याची तेवढीच सवलत होती!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१