घराचे दार वाऱ्याने जरासे हालले होते!

घराचे दार वाऱ्याने जरासे हालले होते!
मघाशी काळजाचे या धडकणे थांबले होते!!

कुणाची हाक ती होती? कुणाला साद मी देतो?
विसरलो सर्वकाही मी मघा जे ऐकले होते!

चितेवर लेटल्यासम मी बिछान्यावर अरे, निजतो!
मला प्रेताप्रमाणे या जगाने जाळले होते!!

चितेवर काय तो डोळा जरासा लागला माझा......
मला या जिंदगानीने कुठे झोपू दिले होते?

जसा निष्पर्ण मी झालो, तसा मी एकटा पडलो!
सुगीचे सोबती सारे कधीचे पांगले होते!

पुसे वार्धक्य तारुण्यास माझ्या प्रश्न हा साधा....
कुणी मज टाळले होते, कुणी फेटाळले होते!

मला श्वासांमधे आता तुझी येजाच जाणवते!
तुला दाही दिशांना मी उगा धुंडाळले होते!!

जशी आली तशी गेली मला सोडून श्रीमंती.....
परी, आजन्म गरिबीने मला सांभाळले होते!

कळेना काय मी घोडे कुणाचे मारले होते?
शिताफीने मला त्यांनी अखेरी गाळले होते!

पुन्हा मी लागलो नाही कधी हातास कोणाच्या!
क्षणांचे काफिले केव्हा कुणास्तव थांबले होते?
   
झुळुक बागेतली तुझिया मला बिलगून गेली,अन्
उभे आयुष्य हे माझे तिने गंधाळले होते!

तुला मी पाहिले होते घडीभर फक्त ओझरते!
तुला हृदयामधे माझ्या क्षणी त्या गोंदले होते!!

जगाच्या राहिली लक्षात ओहोटीच का माझी?
कितीदा या किनाऱ्याने मला कवटाळले होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१