गझल
स्वप्नांत झिंगण्याचा आता सराव झाला!
दु:खात हासण्याचा आता सराव झाला!!
पायांस चालण्याची झाली सवय अशी की,
झोपेत चालण्याचा आता सराव झाला!
होणार भंग नाही माझी कधीच तंद्री.....
कल्लोळ ऐकण्याचा आता सराव झाला!
होळी असो दिवाळी, आम्हास काय त्याचे?
काळोख सोसण्याचा आता सराव झाला!
ही जाळपोळ, दंगे, हे बॉंबस्फोट कोठे......
रक्तात नाहण्याचा आता सराव झाला!
ते लोक, कोण जाणे, होणार काय जागे?
त्यांना फसावयाचा आता सराव झाला!
काही करू परंतू त्या भागवूच गरजा;
चैनीत राहण्याचा आता सराव झाला!
त्या कूपमंडुकांना गोडी न सागराची.....
विहिरीत डुंबण्याचा आता सराव झाला!
आता नकोस देवू कुठलाच कामधंदा!
देहास विक्रयाचा आता सराव झाला!!
बिंधास्त बोल काही जे पाहिजे तुला ते....
पोटात घालण्याचा आता सराव झाला!
ही योजना घरांची होणार पूर्ण केव्हा?
गोठ्यात राहण्याचा आता सराव झाला!
त्यांना नकोत शाली उबदार रेशमाच्या;
थंडीत गोठण्याचा आता सराव झाला!
ही रोजचीच झाली धुळवड सभोवताली!
चिखलात माखण्याचा आता सराव झाला!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१