दुर्दशा माझी बघाया लोटली गर्दी!

दुर्दशा माझी बघाया लोटली गर्दी!
हाक मी देताच सारी पांगली गर्दी!!

थांबले नाही कुणी, मी फोडला टाहो....
प्रेत माझे चालले अन् थांबली गर्दी!

काय थोडे लोक होते प्रेतयात्रेला?
ती पहा रस्त्यात जमली चांगली गर्दी!

मी असे काही खुबीने ढाळले अश्रू.....
हासरा मी वाटलो अन् हासली गर्दी!

मोकळी आहे हवा, ये, बागडू प्रेमा!
संशयाची एकदाची संपली गर्दी!!

मोकळा होईल आता तो पिण्यासाठी.....
भोवतीच्या बेवड्यांची संपली गर्दी!

मैफिलीला शायरांनी लावली वर्णी!
त्यामुळे का होइना पण, भासली गर्दी!!

वाचुनी आपापल्या गझला सटकले ते.....
मैफिलीमधली अखेरी विरळली गर्दी!

तो न घाबरता कुणालाही शिव्या देतो!
त्यामुळे हटकून तेथे दाटली गर्दी!!

बोलताना जोश असतो...होशही असतो!
त्यामुळे त्याने सभेला खेचली गर्दी!!

तो स्वत: गाण्यात इतका रंगला होता!
ऐकताना गीत त्याचे झिंगली गर्दी!!

कोण सरकवणार माघारी प्रथम गाडी?
या अहंकाराच पोटी तुंबली गर्दी!

तो मुसंडी मारणारा एकटा होता!
आज मागोमाग त्याच्या चालली गर्दी!!

आसवांची ओल  झिरपू लागली नेत्री!
पापण्यांच्या कुंपणांनी कोंडली गर्दी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१