सरहद को प्रणाम !

फिन्स

- 'फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी' ही संस्था भारतीय सैन्यामधल्या काही निवृत्त पदाधिकारी, काही निवृत्त न्यायाधीश तसेच काही वकील यांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे.

भारतीय सीमा आणि अंतर्गत सुरक्षेसंदर्भात ज्या समस्या आहेत त्यांची लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे ह्या संस्थेचं प्रमुख काम. अधिक माहिती इथे मिळेल :

दुवा क्र. १

फिन्स द्वारा आयोजित 'सरहद को प्रणाम' हे अभियान नुकतेच पार पडले. त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. दिनांक २० ते २३ नोव्हेंबर रोजी देशाच्या विविध राज्यांमधून दहा हजारांहून अधिक युवक देशाच्या भूसीमेवर असणाऱ्या गावांमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तिथली परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. ह्याचे निवेदन काही दिवसांतच सरकारपर्यंत पोहोचवले जाईल.

ह्यात प्रामुख्याने - गावामध्ये मूलभूत जीवनावश्यक सुविधा उपलब्ध आहेत का?, लोक कोणता व्यवसाय करतात? रोजगाराच्या संधी कितपत आहेत? अशा प्रकारची माहिती गोळा करण्यात आली.

पुण्याच्या मध्यवर्ती भागातून (म्हणजे सगळ्या पेठा) आमचा ९ जणांचा चमू उत्तराखंड राज्यातील चंपावत ह्या ठिकाणी गेला होता. त्या भागातील नेपाळ सीमेवरील गावांचे सर्वेक्षण करायचे काम आमच्या भाग्यास आले. झारखंड, राजस्थान, उडीसा, महाराष्ट्र अशा चार राज्यातून तरुण कार्यकर्ते आले होते. तिकडे गेल्यावर ९ जणांचे ३ गट तयार करण्यात आले जेणेकरून प्रत्येक गटात प्रत्येक राज्यातील २ लोक तरी असतील. आमच्या गटात राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रातून प्रत्येकी २ तर उडीसामधले ३ कार्यकर्ते होते.

२१ नोव्हेंबरला आमचे काम सुरू झाले. भौगोलिक दृष्ट्या येथील सीमाभाग संपूर्ण डोंगरी भाग आहे. दोन उंच टेकड्यांच्या मधून 'काली' नदी वाहते. ही नदी म्हणजेच भारत आणि नेपाळ ह्यांच्यातील सीमा. ह्या भागातील टेकड्या साधारण ४००० फूट उंच असाव्यात. टेकड्यांच्या उतारावर अनेक गावे वसली आहेत.

ज्या गावापर्यंत गाडी जाते त्या गावात मुक्काम करायचा, सकाळी १० वाजता जेवण करायचं आणि निवडक साहित्य घेऊन डोंगर उतरायला लागायचं. डोंगर उतारावर आणि नदीच्या पात्रातील भागात जी गावे आहेत त्यांची माहिती गोळा करायची आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस वर चढून मुक्कामाच्या ठिकाणी यायचं असा चार दिवसांचा आमचा दिनक्रम होता.

ह्या सर्वेक्षणात आम्ही मटियानी, नकेला, असलाड पासन, मडलक, लेटी, जमरसू ह्या गावांमध्ये फिरलो. तिथल्या गावकऱ्यांशी चर्चा केली, फोटो काढले.

आमच्या सर्वेक्षणातून खालील माहिती डोळ्यासमोर आली!

प्राथमिक सुविधा :

- सीमेवरील बऱ्याचशा गावात पोचण्यासाठी रस्त्याची सोय नाही. जिथे रस्ता आहे तिकडे सरकारी दळणवळणाची साधने अजिबात नाहीत. पूर्ण वाहतूक खासगी जीप मधून केली जाते.

- इथल्या गावांमध्ये वीज पोचलेली नाही. ज्या ठराविक गावांमध्ये आहे, तिकडे ४ ते १६ तासांपर्यंत अनियमित स्वरूपाचे भारनियमन असते.

- मेडिकल इमर्जन्सी जसं की कोणत्या महिलेचे बाळंतपण असेल किंवा कोणाला हृदय रोग असेल तर लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. ऍंब्युलन्स सुविधेसाठी अनेक गावांतील लोकांना १२ किमी पायपीट करावी लागते. अशा वेळेस रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता बळावते. ( अनेकांना आपले प्राण याआधी गमवावे लागले आहेत. )

- जवळचं इस्पितळ लोहाघाट इथे आहे जे की काही गावांपासून २५ किमी दूर आहे.

- काही गावांत आयुर्वेदिक दवाखाने आहेत ज्यांच्यामार्फत लहान सहान आजार बरे होऊ शकतात.

- मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ६-७ किमी डोंगरी भाग उतरून नदीकाठी नेले जाते जे की खूप त्रासदायक आहे.

- ह्या भागात रानडुकरांचा खूप सुळसुळाट आहे. ते शेतीचे मोठे नुकसान करतात. काही गावात रानडुक्कर घरात घुसण्याच्या घटना पण घडल्या आहेत

व्यवसाय / रोजगार :

- बहुतेक लोक शेती करतात आणि आपले पोट भारतात. शेतात गहू, मटकी, बटाटा आणि मुळा ह्यांची प्रमुख पिके घेतली जातात.

- शेती डोंगर उतारावर आहे. शेतीचा आकार अतिशय लहान आहे. (काही शेते तर आपल्या घराच्या बाल्कनी इतकी लहान आहेत). लहान आकारामुळे बऱ्याच बाधा येतात. जास्ती कष्ट करावे लागतात आणि उत्पादन मात्र खूपच नगण्य होते.

- शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. इथे सिंचनाची कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. पाणी साठवून ठेवायची व्यवस्था पण नाही. ह्या कारणांमुळे ३ ते ४ महिने पुरेल इतकेच धान्य पिकते.

- ज्या ठिकाणी जास्तीचे पीक होते ते बाजारात नेण्यास बराच खर्च आणि कष्ट पडतात. बाजार हा लोहाघाट किंवा चंपावत इथे आहे जो की २५ - ३० किमी दूर आहे. बाजारात सरकारी ग्राहक उपलब्ध नाही. त्यामुळे ह्या धन्याला ठराविक किंमत नाही. अतिशय कमी किमतीला लोक धान्य विकत घेतात. (१००% नुकसान भोगण्यापेक्षा हे बरं असा शेतकरी विचार करतो. )

- सरकारने शेतीसाठी कमी दारात बियाणी उपलब्ध केली आहेत परंतु ही बियाणी येथील भौगोलिक परिस्थितीला अनुकूल नाहीत. त्यामुळे साल दरसाल शेतीचे उत्पादन घटते आहे. जितके पेरले तितकेही परत येत नाही अशी अवस्था आहे.

- बऱ्याच लोकांनी गाय, म्हशी, कोंबड्या पाळल्या आहेत. त्यांच्यापासून दूध, अंडी अशी सामग्री मिळते.

- काही लोक मजुरी करून आपले पोट भरतात. सरकार प्रतिदिन १२५ रुपये (फक्त) मजुरी देते जी खूपच नगण्य आहे. खासगी कामात प्रतिदिन २०० ते २५० रुपये इतकी मजुरी मिळते. सरकारकडून पैसे वेळेत मिळतीलच ह्याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे सरकारद्वारा करण्यात येणाऱ्या विकासकामांची गती खूपच मंद आहे.

- काही लोक ड्रायव्हिंग करतात आणि आपले पोट भारतात. ते बरेच दिवस फिरतीवरच असतात.

शिक्षण :

- बहुतेक गावांमध्ये आठवी पर्यंत शाळा आहेत. ज्या मध्ये सरस्वती शिशू मंदिर किंवा सरकारी शाळा किंवा दोन्ही चा समावेश आहे. काही ठिकाणी लहान आकाराच्या गावांमध्ये पाच गावांत एक शाळा असे समीकरण आहे.

- विद्यार्थ्यांना आठवीच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी मात्र जवळच्या मोठ्या गावात पायी जावे लागते. काही ठिकाणी ही वाट दहा किलोमीटर पर्यंत लांब आहे. ह्या कारणामुळे बहुतांश मुली शिक्षणापासून वंचित राहतात.

- सरकारी शाळांमध्ये २ ते ३ शिक्षक मिळून दीडशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिकवतात. ह्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी आहे असे आढळून आले.

- सरकारी शाळांमध्ये ४२ इंच एल सी डी टीव्ही लावण्यात आले आहेत. ते कसे चालवायचे हे मात्र इथल्या शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला माहीत नाही. तसेच भारनियमन मोठ्या प्रमाणात असल्याने शाळेच्या वेळात वीज उपलब्ध असेल ह्याची शाश्वती नाही.

सामाजिक सद्भावना आणि सीमा सुरक्षा :

- भारत आणि नेपाळ ह्या राष्ट्रांमध्ये पूर्वीपासूनच शांततापूर्ण वातावरण कायम आहे.

- नेपाळ मधील अनेक लोक भारतात रोजगारासाठी सरहद पार करून ये-जा करत असतात. काही लोक अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक गोष्टी खरेदी करायला भारतात सीमा पार करून येतात.

- जत्रा, शुभकार्य प्रसंगी भारतीय लोकसुद्धा नेपाळ मध्ये जातात. नेपाळच्या त्या भागातील अनेक मुलींचे विवाह हे भारतीय पुरुषांशी झालेले आढळून आले.

- नेपाळच्या सीमा भागातील ही गावे पूर्णपणे भारतावर अवलंबून आहेत. लोक सीमा पार करून ये जा करतात ही गोष्ट भारतीय लष्करास ठाऊक आहे.

- एकंदरीत वातावरण अतिशय शांततापूर्ण आहे आणि कोणताही धोका नाही.

भीषण वास्तव :

- सीमा भागातील भारतीय नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने खूपच कमी जागरूक आहेत. आमचं ९ लोकांचा गट गावात का आलाय ते जाणून घ्यायची उत्सुकता फारच कमी लोकांनी दाखवली.

  "आमच्या हातात वही पेन च्या ऐवजी बंदूक असती तर? " असा सवाल केल्यावर मात्र अनेक जण खजील झाले.

- गावांमधील ८० % युवक हे बाहेरगावी नोकरी धंदा करतात. ह्यामुळे गावाच्या विकासाला खूप मोठा अंकुश लागतो. (म्हणा त्यांनी तरी का थांबावे गावामध्ये).

- गरिबी आणि हलाखीच्या अवस्थेमुळे गावेच्या गावे जवळील विकसित नगरांमध्ये स्थलांतर करताना दिसतात. सीमा सुरक्षेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट अजिबातच नाही.

- लोक अतिशय गरीब असल्याने डोंगर दर्यातून वाहून जाणारे पाणी पाइप टाकून शेतात वळवण्याची ऐपत त्यांच्यात नाही. आपल्या पाल्याला आठवीच्या पुढील शिक्षण देण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत.

- नाईलाजास्तव गावामध्ये राहत असल्याची कबुली अनेक लोकांनी दिली.

आशेचा किरण :

- शाळेत शिकवणारा प्रत्येक शिक्षक मुलांना शिकवायची प्रगल्भ इच्छा बाळगतो. स्वतः: शहरी भागातून असूनसुद्धा तो गावामध्ये मुक्काम करतो. (किंवा रोज ८ किमी ची पायपीट करणे पसंत करतो. )

- सरकार तर्फे शाळेतील मुलांना रोज जेवण बनवून दिले जाते. जेवण बनवण्यासाठी गावातील महिला नेमलेल्या आहेत. ह्यामुळे मुलांना चांगल्या प्रतीचा आहार मिळतो तसेच काही लोकांना रोजगार.

मुलांना वर्षाला गणवेशाचे २ जोड आणि पाठ्यपुस्तके दिले जातात.

- गावांमध्ये गुंडगिरी, भांडण तंटे अजिबात नाहीत. सर्वत्र शांतता टिकून आहे.

- लग्न कार्य किंवा इतर शुभप्रसंगाच्या वेळेस सर्व गावकरी एकत्र येऊन उत्साहाने कार्यात भाग घेतात. सर्वजण एकमेकांची जमेल तशी मदत करतात.

- बहुतांश लोकांची मतदार यादीमध्ये नोंद आहे आणि ते वेळोवेळी आवर्जून मतदान करतात.

- भौगोलिक विषमता असूनसुद्धा भारताची 'विविधतेत एकता' हे सूत्र आपल्याला इथे बघायला मिळते.

- इथला नागरिक निसर्गावर खूप प्रेम करतो आणि त्यालाच आपली संपत्ती मानतो. त्यामुळे वृक्षतोड, प्रदूषण असल्या वाईट गोष्टींपासून गावे मुक्त आहेत.

- सशस्त्र सेना बल (सीमेवरील सुरक्षा जवान) आणि गावकरी ह्यांच्यात शांततापूर्ण वातावरण टिकून आहे. गावातील समस्या वेळोवेळी जवानांची मदत घेऊन सोडवल्या जातात.

- ह्या भागातील अनेक गावांमधून लोक सैन्यात भरती होताना दिसतात. लहान मुलांना मोठेपणी कोण व्हायचे असा प्रश्न विचारला असता बऱ्याच मुलांनी मोठेपणी सैन्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली.

गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या गावात हिंडलो, अनेक लोकांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली.

काही माजी सैनिकांना भेटलो, १९७१ साली पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत शहीद झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीला भेटलो. सरकारद्वारे मिळणारा सगळा पैसा ही माता गावाच्या विकासासाठी खर्च करते. स्वतः अतिशय गरिबीत राहते.

खरंच, हे सगळं रक्तातच असायला लागतं.

पुण्याहून नेलेल्या खडकवासला धरणाचे पाणी तिकडे नेऊन तिथल्या निसर्गावर त्याचा अभिषेक केला. सरहद भागातील माती आणि काली नदीचे पाणी पूजा करण्यासाठी घरी घेऊन आलो. त्याचबरोबर आणल्या असंख्य आठवणी!

पाच दिवसात बरंच काही शिकलो. आता हे वास्तव जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.

-धन्यवाद,

भूषण करमरकर