कशास चांदणे हवे? हवा कशास चंद्रमा?
तुझ्या समीप वाटते हरेक रात्र पोर्णिमा!!
गुलाब पाकळ्यांपरी तुझेच ओठ पाहुनी.....
पहा नभासही चढे विलोभनीय लालिमा!
दडून काय राहतो मनात राग साठता?
झरेल लोचनांमधे मनातलाच रक्तिमा
उभी हयात एकही न शुद्ध शेर साधला....
असेच लोक फासतात शायरीस काळिमा!
विटाळणार ना कधीच वैखरी तुझ्यापरी;
खुशाल दे शिव्या तरी मला न वाटते तमा!
बघू, थकेल कोण प्रथम, मी थकेन की, तुम्ही?
गुन्ह्यावरी गुन्हे करा, करेन मी तुम्हा क्षमा!
हिशेब मांडतो वहीत चित्रगुप्त आपुल्या,
हरेक पाप-पुण्य ते तिथेच व्हायचे जमा!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१