परीकथांचा गाभा: कामवासना आणि हिंसा

"द क्लासिक फेरी टेल्स" (संपादिका: मारिया टाटार) ह्या पुस्तकातील "सेक्स ऍन्ड वायोलेन्स: द हार्ड कोअर ऑफ फेरी टेल्स" ह्या मारिया टाटारलिखित प्रकरणाचा अनुवाद.

ग्रिम बंधूंच्या परीकथासंग्रहाची अविशोधित आवृत्ती वाचून अनेक प्रौढांचे डोळे पांढरे होतील. स्नो व्हाइटची सावत्र आई आपल्या सावत्र मुलीच्या खुनाचा कट रचते, कबुतरे सिंडरेलाच्या सावत्र बहिणींचे डोळे फोडतात, ब्रायर रोझला लग्नाची मागणी घालायला आलेले पुरुष तिच्या किल्ल्याबाहेरील कुंपणावर रक्तबंबाळ होऊन मरतात, संतापाने वेडापिसा झालेला रंपेलस्टिल्टस्किन स्वत:चे दोन तुकडे करतो हे सर्व ठाऊक असलेले वाचकही लहान मुलांना झोपायच्या वेळी वाचून दाखवण्याच्या ह्या गोष्टींत पानोपानी असलेली खून, अंगच्छेदन, नरभक्षण, व गोत्रगमनाची चित्रदर्शी वर्णने वाचून स्तिमित होतील. "द ज्युनिपर ट्री" ह्या लोकप्रिय कथेत एक बाई आपल्या सावत्र मुलाचा शिरच्छेद करते, त्याच्या धडाचे छोटे छोटे तुकडे करून आमटीत घालून शिजवते, आणि तिचा नवरा ते आवडीने फस्त करतो. "फ्लेजलिंग"मध्ये एका स्वैपाकिणीचा असाच काहीसा बेत असतो, पण त्यातला मुलगा व त्याची बहीण शेवटी तिला फसवतात. "फ्राउ ट्रूड"मध्ये फ्राउ ट्रूड एका मुलीचे लाकडाच्या ओंडक्यात रूपांतर करून तिला आगीत झोकून देते. "डार्लिंग रोलन्ड"मध्ये एक चेटकीण आपल्या सावत्र मुलीचा खून करण्यासाठी कुर्‍हाड हाती घेते, पण शेवटी सख्ख्या मुलीलाच मारते. दुसरीएक सावत्र आई आपल्या सावत्र मुलीला केवळ कागदी अंतरवस्त्रात हिवाळ्याच्या अत्यंत थंड रात्री वनात स्ट्रॉबेर्‍या आणायला पाठवते, आणि टोपलीभर स्ट्रॉबेर्‍या मिळाल्याशिवाय घरी परतायचे नाही अशी ताकीद देते.

अत्याचारांच्या ह्या जंत्रीवरून जर्मन परीकथांमध्ये फक्त स्त्रिया दुष्ट असतात असा जर तुमचा गैरसमज झाला असेल तर वडलांच्या व भावांच्या क्रौर्याची काही उदाहरणे पाहू. आपली मुलगी वाळलेल्या गवतातून सोने कातू शकते अशा बढायामारून तिची दुर्दशा करणारा गिरणीवाला विसरता येईल? त्याच्या ह्या बढाया खोट्या ठरल्या तर त्या मुलीला देहदंड देण्याची तयारी असलेला राजा विसरता येईल? आणखी एका गोष्टीत एक माणूस आपल्या मुलाच्या भाबडेपणाने इतका वैतागतो की आधी त्याला अव्हेरतो, आणि मग आपल्या नोकरांना त्याचा खून करण्याची आज्ञा देतो. "द सिंगिंग बोन"मध्ये एक भाऊ दुसर्‍या भावाचा खून करतो. त्याचे हाड तासून त्यापासून शीर्षकातील गाते हाड बनवले जाते. ते हाड जेव्हा खुनाचे निंदास्पद रहस्य जगाला सांगते तेव्हा खुनी भावाला गोणपाटात बांधून बुडवून मारले जाते. थाउजंडफर्ज नावाच्या एका परीकथेच्या नायिकेशी लग्न करायला तिचा बाप इतका आतुर झालेला असतो की तिला घर सोडून जंगलात पळून जावे लागते. आपले होऊ घातलेले तेरावे मूल मुलगी असल्यास तीच आपल्या सार्‍या संपत्तीची वारसदार व्हावी ह्यासाठी एक बाप आधीच्या बारा मुलग्यांसाठी बारा शवपेट्या तयार करून ठेवतो. कैक राजे दुष्ट स्त्रियांना शिक्षा करण्यासाठी त्यांना विवस्त्र करून, आतून खिळे ठोकलेल्या पिंपात बंद करून ती पिंपे टेकड्यांवरून खाली घरंगळत.

परीकथांमध्ये अट्टल गुन्हेगारांपासून वर्जिन मेरीपर्यंत जवळ जवळ सर्व पात्रे क्रूरपणे वागू शकतात. "द रॉबर ब्राइडग्रूम"मध्ये भीतीने थरथरणार्‍या एका तरुणीच्या डोळ्यांदेखत तिचा होणारा नवरा व त्याचे साथीदार एका मुलीला त्यांच्या अड्ड्यावर ओढत आणतात, तिच्या अंगावरील कपडे फाडून टाकतात, तिला एका टेबलावर ठेवून तिच्या शरिराचे तुकडे करतात, आणि त्या तुकड्यांवर मीठ शिंपडतात. एका दरोडेखोरास मेलेल्या मुलीच्या बोटात सोन्याची अंगठी दिसते. तो कुर्‍हाडीने ते बोट तोडतो. ते उडून, पाहणार्‍या मुलीच्या मांडीवर येऊन पडते. ती आणखी घाबरते. लुटारूंसाठी आणि वाटमार्‍यांसाठी हे वागणे स्वाभाविक असेल, पण ग्रिम बंधूंच्या संग्रहात वर्जिन मेरीही संतिणीपेक्षा राक्षसीणच भासते. स्वर्गाच्या तेरा दारांपैकी एक उघडू नये हा आदेश मेरीज चाइल्ड नावाची मुलगी पाळत नाही, आणि वर आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करते. शिक्षा म्हणून वर्जिन मेरी तिला परत पृथ्वीतलावर धाडते. तिथे मुलीचे लग्न एका राजाशी होते व तिला तीन मुले होतात. राणी आपला गुन्हा कबुल करत नसल्यामुळे रागावलेली वर्जिन तिन्ही मुलांना स्वर्गाला घेऊन जाते. मुले नाहीशी झाल्यामुळे राजाच्या सल्लागारांना संशय येऊ लागतो. ते राणीवर नरभक्षणाचा आरोप ठेवतात, तिच्यावर खटला भरतात आणि तिला मृत्युदंड ठोठावतात. लाकडे रचून, त्यावर एका खांबाला तिला बांधून, लाकडे पेटवली जातात. आगीचे लोळ अगदी तिच्या पावलांशी खेळू लागल्यावर मात्र राणी आपल्या गुन्ह्याची कबुली देते.तेव्हा कुठे मेरी तिला मुक्त करते व तिची तिन्ही मुले तिला परत करते. परीकथांमधील वर्जिन मेरीत कणव हा गुण नाही हे स्पष्ट आहे.

खलांना दिल्या गेलेल्या नृशंस शिक्षांचे वर्णन ग्रिम बंधूंनी क्वचितच सौम्य केले. आपल्या कथांमधील दु:ख आणि वेदना कमी करण्याच्या संधीही त्यांनी सहसा घेतल्या नाहीत. अन्‌ असे केलेच, तर बहुधा एखाद्या मित्राच्या किंवा सहकार्‍याच्या सांगण्यावरून, स्वेच्छेने नव्हे. उलट, अनेकदा त्यांनी मुद्दाम कथेत हिंसक भाग घातला किंवा अधिक ठाशिव केला. सिन्डरेलाच्या कथेच्या पहिल्या आवृत्तीत तिच्या सावत्र बहिणींचे डोळे फोडले जात नाहीत. परंतु नर्सरी ऍन्ड हाउसहोल्ड टेऽल्सच्या दुसर्‍या आवृत्तीत विल्हेल्म ग्रिमने, कबूतरांच्या सूडाचे स्पष्ट वर्णन केल्यानंतर, गोष्टीच्या शेवटी येणार्‍या स्तब्धनाट्याचे पुढील लंगडे समर्थन दिले: "अशा प्रकारे दोन्ही बहिणींना त्यांच्या खोटारडेपणाची व दुष्टपणाची शिक्षा म्हणून आंधळे करण्यात आले." रम्पेलस्टिल्टस्किनच्या गोष्टीच्या काही पाठभेदांत त्याला उडत्या चमच्यावर बसून पळून जाताना दाखवले असले तरी ग्रिमबंधूंचा कल वैचित्र्यपूर्ण विनोदापेक्षा हिंसेकडे जास्त दिसतो. राणीला त्याचे नाव कळल्यामुळे त्यांचा रम्पेलस्टिल्टस्किन अधिकाधिक चिडत जातो. नर्सरी ऍन्ड हाउसहोल्ड टेऽल्सच्या दुसर्‍या आवृत्तीत तर तो इतका संतापतो की स्वत:चे दोन तुकडे करतो. ब्रायर रोझच्या पहिल्या आवृत्तीत ती शंभर वर्षे झोपत असताना किल्ल्याभोवती कुंपण शांतपणे वाढते. ग्रिमंच्या कथासंग्रहाच्या नंतरच्या आवृत्त्यांमध्ये आपण ते काटेरी कुंपण यशस्वीपणे पार करून येणार्‍या राजपुत्राबद्दल वाचतोच, पण ब्रायर रोझच्या अयशस्वी प्रेमयाचकांविषयीसुद्धा वाचतो. ते हरतात कारण "ब्रायरची झुडपे जणू एकमेकांच्या हातात हात घालून होती. त्यांत अडकून त्या तरुण राजपुत्रांना दयनीय मरण आले."

"द मॅजिक टेबल, द गोल्ड डॉन्की, ऍन्ड द कजेल इन द सॅक" ह्यांत पहिल्या व दुसर्‍या आवृत्तीत केलेले बदल पाहिल्यास ग्रिम हिंसक भागांना महत्त्व द्यायला किती उत्सुक होते ते दिसून येते. नर्सरी ऍन्ड हाउसहोल्ड टेऽल्सच्या पहिल्या आवृत्तीत त्याच्या भावांचे सामान बळकावून बसलेल्या धर्मशाळामालकाशी कथानायकाची भेट अशी रंगवली आहे:

    कातार्‍याने आपले गोणते उशीखाली ठेवले. जेव्हा धर्मशाळेच्या मालकाने येऊन ते ओढले तेव्हा कातारी म्हणाला, "लाठी, गोणत्यातून बाहेर ये!" लाठी टुणकन बाहेर आलीव मालकास बदडू लागली. तिने त्याला इतके मारलं की तो जादूचं टेबल आणि सोन्याचं गाढव परत करायला तयार झाला.

दुसरी आवृत्ती गुन्ह्याचे आणि शिक्षेचे सर्व तपशील देतेच, वर मालकाचा पाण‌उताराही सुस्पष्टपणे रेखाटते.

    रात्री कातार्‍याने फळकुटावर पथारी पसरली. उशी म्हणून आपले गोणते घेतले. उतारू गाढ झोपला आहे, आणि खोलीत दुसरे कोणी नाही असे जेव्हा मालकास वाटले तेव्हा तो येऊन हळूहळू गोणते ओढू लागला. ते काढून त्याच्या जागी दुसरे ठेवण्याचा त्याचा डाव होता. कातारी नेमका ह्याचीच वाट पाहत होता. मालक गोण जोरात ओढणार तोच कातारी ओरडला, "लाठी, गोणत्यातून बाहेर ये!" ताबडतोब लाठी बाहेर आली आणि तिने मालकावर हल्ला चढवला. धर्मशाळेचा मालक किंचाळू लागला, पण तो जेवढा जोरात किंचाळायचा तेवढी लाठी जोरात बसायची. शेवटी तो जमिनीवर कोसळला.मग कातारी म्हणाला, "आता मला जादुचे टेबल आणि सोन्याचे गाढव दे, नाही तर पुन्हा लाठी चालेल." "नको, नको! मी तुला सगळे देतो, पण त्या लाठीला परत पोत्यात ठेव." कातारी म्हणाला, "ठीक आहे. ह्या वेळी ठेवतो, पण याद राख. लाठी, परत गोणत्यात जा".

ग्रिम बंधूंना हिंसेपेक्षा, ज्यांचा ते लाजत "काही अवस्था आणि संबंध" अशा शब्दांत उल्लेख करतात, त्या सहन करणे जड गेले, आणि अशांना संग्रहातून वगळण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. ह्या अवस्थांमध्ये प्रमुख होते गर्भारपण. हॅन्स डमची गोष्ट घ्या. हॅन्सकडे केवळ इच्छाशक्तीने स्त्रियांना गरोदर करण्याचे सामर्थ्य आहे, व ते तो वापरतो. नर्सरी ऍन्ड हाउसहोल्ड टेऽल्सच्या पहिल्या आवृत्तीत असलेली ही गोष्ट दुसर्‍या आवृत्तीत गाळली गेली. ग्रिमंच्या मते डॉरोथिया विहमन उत्तम प्रकारे लोककथा कथन करीत असे. पण "द मास्टर हन्टर"चा तिने सादर केलेला पाठ त्यांना पसंत पडला नसावा. त्यांनी तिचा पाठभेदास गौण स्थान देऊनआपल्या संग्रहाच्या टीपांत घातले. विहमनच्या पाठात कथेचा नायक एका मनोर्‍यात शिरतो. तिथे त्याला एक राजकन्या आपल्या पलंगावर विवस्त्र झोपलेली आढळते. तो तिच्या शेजारी आडवा होतो. तो निघून गेल्यानंतर राजकन्येच्या लक्षात येते की ती गरोदर आहे. हे कळल्याने तिला अत्यंत क्लेश होतो, तर तिचे वडील क्षुब्ध होतात. ह्या कथेचा जो पाठ प्रत्यक्षात नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्समध्ये समाविष्ट केला गेला त्यात राजकन्येने पूर्ण वस्त्रे परिधान केलेली होती, अन्‌ राजपुत्र संयमाचा व सभ्याचाराचा जणू पुतळा होता.

गर्भारपण, मग ते "हॅन्स ड्रम"प्रमाणे छचोर इच्छेमुळे असो की "द मास्टर हन्टर"प्रमाणे निषिद्ध शरीरसंबंधांमुळे असो, ग्रिम बंधूंना अस्वस्थ करी. वास्तविक, विवाहपूर्व लैंगिक सक्रीयतेची अप्रत्यक्ष सूचनाही त्यांचे, विशेषत: विल्हेल्म ग्रिमचे, गाल लज्जेने आरक्त करत असावी. "फ्रॉग किंग ऑर आयर्न हाइनरिक" ह्या संग्रहातील पहिल्याच व त्यामुळे सर्वाधिक दृश्य कथेवर ओझरती नजर टाकली तरी त्यातील लोककथेच्या भागांवर पांघरूण घालण्यासाठी त्याने वापरलेल्या क्लृप्त्या दिसून येतात. त्या प्रसिद्ध कथेत राजकन्येने दुर्दैवी बेडकाला भिंतीवर आपटल्यावर तो "देखणा राजपुत्र होऊन तिच्या बिछान्यावर येऊन पडतो, आणि राजकन्या त्याच्या शेजारी आडवी होते." नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सच्या कोणत्याही छापिल आवृत्तीत हे वाक्य नाही. क्लेमेन्स ब्रेन्टानोनामक आपल्या मित्राला ग्रिम बंधूंनी सन १८१०मध्ये आपल्या परीकथासंग्रहाच्या मूळ मसुद्याची एक प्रत पाठवली होती. बर्‍याच वर्षांनंतर ती एका ट्रॅपिस्ट मठात सापडली. बेडुक कोठे पडतो, आणि राजकन्या लगेच तेथे त्याच्याशेजारी आडवी होते हे फक्त त्या प्रतीमध्ये नि:संदिग्धपणे सांगितले आहे. पहिल्या आवृत्तीनुसार बेडूक बिछान्यावर पडतो. बेडकाचा राजपुत्र झाल्यानंतर तो राजकन्येचा "प्रिय सोबती" होतो. "वचन दिल्याप्रमाणे तिने त्याच्यावर प्रेम केले", आणि त्यानंतर ताबडतोबते दोघे "शांतपणे झोपी गेले" असेही तीत म्हटले आहे. दुसर्‍या आवृत्तीत विल्हेल्म ग्रिमने बेडकाचे बिछान्यावर पडणे काढून टाकले. बेडूक भिंतीवर आपटताक्षणी त्याचा राजपुत्र झाला, एवढेच म्हटले. ह्या पाठभेदात राजकन्येच्या वडलांच्या संमतीने लग्न झाल्यानंतरच राजपुत्र व राजकन्या शय्यासोबती होतात. मूळ लोककथेतील बेडकाचा राजपुत्र होणे जितके वेधक आहे तितकेच ग्रिमंनी एका लैंगिक वक्रोक्तींनी भरलेल्या कथेचे शिष्ट आणि बालसुलभ गोष्टीत केलेले रूपांतरही.

ग्रिम बंधूंना आपल्या संग्रहाच्या विषयास प्रतिकुल किंवा निदान अयोग्य वाटलेल्या "काही अवस्था आणि संबंधां"पैकी आणखी एक आहे गोत्रगमन आणि गोत्रगमनाची इच्छा. काही गोष्टींत गोत्रगमन एवढे अविभाज्य होते की विल्हेल्म ग्रिमलाही ते गाळून टाकणे वा लपवणे शक्य नव्हते. त्याऐवजी त्याने कथानकात त्याविषयी नकारात्मक टिप्पण्या गुंफल्या. नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सच्या सर्व आवृत्त्य़ात थाउझन्डफर्सचा बाप तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडत असला तरी दुसर्‍या आवृत्तीपासून त्याचे दरबारी त्याला कडक ताकीद देतात. "वडलांचे मुलीशी लग्न होऊ शकत नाही. देवाने त्याला मज्जाव केला आहे. हे पाप आहे. त्यातून काहीही चांगले निष्पन्न होणार नाही." नंतरच्या आवृत्त्यांमध्ये असेही म्हटले आहे की असे घडल्यास पापी राजासोबत सारे राज्य "रसातळाला जाईल". ***

एखाद्या लोककथेचे एकाहून अधिक पाठ उपलब्ध असल्यास ज्यात गोत्रगमनिक इच्छा व ईडिपी गुंते लपवले होते तोच ग्रिम बंधू पसंत करीत. पोटच्या पोरींविषयी वैषयिक इच्छा असणार्‍या बापांबद्दलच्या कथा ग्रिमंना किती अस्वस्थ करीत हे "द गर्ल विदाउट हॅन्ड्स" ह्या कथेचा प्रकाशन-इतिहास दाखवून देतो. ती गोष्ट ग्रिमंना प्रथम सापडली ती पुढील स्वरूपात: एका गिरणीवाल्यावर वाईट दिवस येतात तेव्हा तो सैतानाशी सौदा करतो. सैतानाने त्याला अमाप संपत्ती द्यावी,व त्याच्या बदल्यात गिरणीच्या मागे जे असेल ते त्याने सैतानास द्यावे. घरी परतल्यावर त्याला कळते की सौदा झाला त्या वेळी त्याची मुलगी गिरणीमागे उभी होती. तो गांगरून जातो. तीन वर्षांनंतर मुलगी सैतानाला देणे भाग होते. परंतु त्याची धर्मपरायण मुलगी स्वत:ला सैतानापासून वाचवते. मात्र त्यासाठी तिला अंगच्छेदनाची किंमत मोजावी लागते. सौदा पूर्ण न केल्याबद्दल सैतान तिच्या बापाला तिचे दोन्ही हात कापून टाकायला भाग पाडतो. का कोणास ठाऊक, पणती मुलगी आपले तोडलेले हात बांधून घेते, आणि कामधंदा शोधायला घराबाहेर पडते. बाप तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, घरी तिला सर्व सुखसोयी पुरवण्याचे वचन देतो, पण ती बधत नाही. गोष्टीच्या उरलेल्या भागात, पुढे एका राजाशी तिचे लग्न होण्याआधी तिला सोसाव्या लागलेल्या हाल-अपेष्टांचे वर्णन आहे. ग्रिम ह्यांच्या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत ही कथा ह्या स्वरूपात आहे. नंतर त्या गोष्टीचे आणखी काही पाठभेद ग्रिम बंधूंच्या हाती लागले. त्यांतील एक त्यांनी इतरांपेक्षा सरस ठरवला. त्या पाठाने ते एवढे प्रभावित झाले की नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सच्या पुढील आवृत्त्यांमध्ये त्यांनी मूळ गोष्टीऐवजी हा पाठ छापला. मात्र, नव्या, "श्रेष्ठ" पाठभेदाचा पहिला परिच्छेद मुलीच्या घर सोडून जाण्याचे स्पष्ट व तार्किक कारण देत असूनही त्यांना पसंत नव्हता. मुलगी स्वत:हून आणि कारणाशिवाय घर सोडून जात नाही. तिचा बाप आधी तिच्याशी लग्न करण्याची मागणी करतो. तिने नकार दिल्यावर तिचे हात व स्तन कापून टाकतो, म्हणून ती पळून जाते. ह्यात सैतानाचा कोठेही उल्लेख नाही; मुलीचा बापच सैतानासारखा वागतो. लोककथांच्या अस्सलपणाचे कौतुक असणार्‍या ग्रिमंनी मात्र त्याच कथेची चिरफाड करून त्यात सैतानाचे पात्र पुन्हा घुसवले. मुलीच्या बापाच्या गुन्ह्यांचा पाढा वाचणारे प्रास्ताविक गाळले आणि त्याच्या जागी सैतानाशी केलेल्या सौद्याचा कमी सनसनाटी वृत्तांत घातला.

बापाऐवजी सैतानाचे प्रतियोजन करण्याचे कारण समजण्यासाठी फ्रॉईड वाचण्याची गरज नाही. जसे लोककथांमध्ये काही उपकारकर्त्यांच्या जागी देव, सेन्ट पिटर, वख्रिस्त आले, तसा खलनायकांच्या जागी सैतान आपल्या विविध रूपात निषिद्ध वासनांचा प्रतीक होऊन येतो. नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्समध्ये"द पूअर मॅन ऍन्ड द रिच मॅन", "द डेव्हिल ऍन्ड हिज ग्रॅन्डमदर", "द कार्नेशन" ह्यांसारख्या अनेक कथांमध्ये देव आणि दैत्य चांगल्या आणि वाईटाचे प्रतिनिधी बनून येतात. सर्वसाधारणपणे ग्रिमंनी अख्रिस्ती पात्रांपेक्षा ख्रिस्ती पात्रे असलेल्या कथांना प्राधान्य दिले. खरे तर लोककथांच्या संदर्भात असे करण्याचे कोणतेही सबळ कारण नव्हते. "द गर्ल विदाउट हॅन्ड्स"च्या "श्रेष्ठ (व पूर्ण)" पाठभेदास त्यांनी त्यांच्यामते कनिष्ठ असलेल्या पाठभेदाचे प्रास्ताविक जोडले (कारण त्यामुळे बापाऐवजी सैतानास वाईट ठरवता आले). ह्यावरून उघड आहे की नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्स असे शीर्षक असलेल्या कथासंग्रहात गोत्रगमनिक विषय असलेल्या गोष्टी समाविष्ट करण्याची कल्पना ग्रिम बंधूंना फारशी रुचली नव्हती. कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी वाखाणलेल्या नैसर्गिक बाबींत गोत्रगमन बसणे शक्य नव्हते.

कामवासना आणि हिंसा ही ग्रिमंच्या संग्रहातील कथांची प्रमुख सूत्रे आहेत - निदान त्या कथांच्या असंपादित रूपात. कुटुंब हा त्यातील बर्‍याच कथांचा विषय आहे, आणि बहुतेक महत्त्वाची पात्रे विभक्त कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्या कथांतील कामवासना व हिंसाचार, गोत्रगमन व बालशोषण ह्या विकृतींच्या रूपात वारंवार दिसतात. लैंगिक तपशिलांनी भरलेल्या परिच्छेदांना व ईडिपी संघर्षाधारित कथानकांना संपादित करण्यात विल्हेल्म ग्रिमने असाधारण उत्साह दाखवला. काही वर्षांत त्याने पद्धतशीरपणे संग्रहातील लैंगिकतेचे उल्लेख काढून टाकले व गोत्रगमनिक इच्छांची चित्रणे लपवली. पण लहान मुलांचे शोषण, उपासमार, वस्त्रविहीनता, क्रूर शिक्षांची चोखंदळ वर्णने ह्यांचे अभ्यवेक्षण केले नाही. रोजच्या आयुष्याच्या कठोर वास्तवाहून जीवनातील वैषयिक बाबी ग्रिम बंधूंसाठी जास्त धक्कादायक होत्या असे दिसते.

ह्या विचित्र संपादकीय रीती कशा समजून घ्यायच्या? लक्षात ठेवा, ग्रिम बंधूंनी हे काम एक पांडित्यपूर्ण व राष्ट्राभिमानी उपक्रम म्हणून हाती घेतले होते. १८११ सालीच त्यांनी जाहीर केले होते की संग्राहक म्हणून ते करत असलेले काम विद्वत्तेच्या तत्त्वानुसार चालते. अर्थात त्यांनी असे सूचित केले की ते त्यांच्या पंडिती सहकार्‍यांसाठी लिहीत होते. जर्मन लोककथांची परंपरा काळाच्या उदरात लुप्त होण्याआधी ग्रंथबद्ध करण्याचा, व जर्मन काव्याच्या इतिहासास अल्पसे योगदान देण्याचा हा त्यांचा ध्येयवादी प्रयास होता. प्रकाशकाच्या शोधात असताना जेकब ग्रिम म्हणाला होता की प्रस्तावित संग्रहाचा मुख्य उद्देश स्वामित्वशुल्क कमावणे हा नसून एक अमूल्य राष्ट्रीय ठेवा जतन करणे हा आहे. त्यामुळे, पुस्तक छापले जावे ह्यासाठी ग्रिम बंधू स्वामित्वशुल्कावर पाणी सोडायला तयार होते. येऊ घातलेला संग्रह लोकांना पसंत पडेल, त्यांची करमणूक करेल अशी आशा त्या दोघांनी व्यक्त केली होती.

जड प्रस्तावना, व विस्तृत टीपांमुळे नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सची पहिली आवृत्ती सर्वसामान्यांसाठी लिहिलेल्या पुस्तकासारखी न वाटता पंडिती ग्रंथासारखी भासे. खप मात्र चांगला झाला. ह्यास काही अंशी पुस्तकाचे शीर्षक जबाबदार असावे. ग्रिमंच्या काही समकालिनांनी लिहिलेले बालकथांचे संग्रह ह्याआधीच चांगले खपले होते. नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्स प्रकाशित झाले त्यावेळी परीकथांचा बाजार गरम होता. १८१५पर्यंत पहिल्या भागाच्या ९००पैकी जवळ जवळ सार्‍या प्रती विकल्या गेल्या होत्या. "भरपूर मागणी" लक्षात घेता विल्हेल्म ग्रिम दुसरी आवृत्ती काढण्याविषयी बोलू लागला होता. तीस वर्षांनंतर साक्षरतेचे प्रमाण व लहान मुलांच्या पुस्तकांना मागणी बरीच वाढूनही स्ट्रुव्वेलपिटरसारख्या लोकप्रिय पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ १५००ची होती हे लक्षात घेतल्यास ग्रिमंना झालेला आनंद रास्त होता. "बारीकसारीक तपशिलाचा आदर" करण्याबद्दल त्यांची कीर्ती, आणि लेखन प्रकाशित करण्यासाठी ते घेत असलेले अथक परीश्रम पाहता त्यांनाही व्यावसायिक यश चाखण्याची थोडी तरी इच्छा असणार. निदान लोकांना आपल्या साहित्यिक प्रयत्नात रुची असावी, त्या प्रयत्नांना त्यांचा पाठींबा असावा असे वाटत असणारच. नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सच्या दुसर्‍या आवृत्तीची तयारी सुरू करण्याआधीच विल्हेल्म ग्रिमने पहिल्या व दुसर्‍या आवृत्त्यांचे उचित स्वामित्वशुल्क किती असावे ह्याचा हिशोब केला होता.

संग्रहाच्या स्वामित्वशल्काची अपेक्षित रक्कम क्षुल्लक नव्हती. त्या काळात ग्रिम बंधूंना पैशाची चणचण असे. एकमेकांना लिहिलेल्या पत्रांत आर्थिक अडचणीचे, व त्यामुळे झेलाव्या लागणार्‍या अवहेलनेचे उल्लेख असत. हातात पैसा नाही, कपडे जुने व विटके आहेत आणि बूट झिजून गेलेत अशी कुरकुर विएन्नाहून जेकबने केली. ज्यात निर्धोकपणे बसता यावे अशी घरात एक धड खुर्ची राहिलेली नाही ही १८१५ साली विल्हेल्म ग्रिमची तक्रार होती. त्यामुळे नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सच्या पहिल्या आवृत्तीच्या स्वामित्वशुल्कापोटी सॅविनी व विल्हेल्म ग्रिमने ठरवलेली ५०० टॅलरची रक्कम नक्कीच स्वागतार्ह होती. दुसर्‍या आवृत्तीसाठी ४०० टॅलर मिळतील अशी विल्हेल्म ग्रिमला अपेक्षा होती. १८१६ साली कॅसेलमध्ये ग्रंथपाल म्हणून जेकब ग्रिमला वर्षाला ६०० टॅलर, आणि विल्हेल्मला वर्षाला ३०० टॅलर पगार मिळत असे. हे आकडे लक्षात घेता स्वामित्वशुल्काची रक्कम त्यांच्या कौटुंबिक अंदाजपत्रकासाठी किती महत्त्वाची होती ते कळते. त्यातून त्यांची अनेक कर्जे फिटणार होती.

* * *

नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्समधून ग्रिमंच्या हाती घबाड लागले नसेल, तशी त्यांना आशाही नसेल, पण नफा करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असे म्हणता येणार नाही. पहिल्या आवृत्तीनंतर केलेल्या बदलांमागे अंशत: तरी हा उद्देश असणारच. पण संग्रहाच्या खपातून होऊ शकणारा आर्थिक फायदा हा दुय्यम होता. साहित्यिक विश्वाची प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची होती. दोन्ही भाऊ परीक्षणांवर बारीक लक्ष ठेवून असत. पण त्यांच्या पदरी एकामागून एक निराशाच पडत गेली. १८१३ ते १८१५ दरम्यान राजनैतिक सेवेत असलेला जेकब सतत फिरतीवर असे. पत्रांतून तो पुन्हा पुन्हा आपल्या भावाला संग्रहाच्या स्वागताविषयी विचारी. परंतु ज्यांची मते विचारात घेण्यासारखी होती असे लोक संग्रहाचे परीक्षण करण्यात रुची दाखवत नव्हते, अन्‌ ज्यांनी परीक्षण केले ते त्याविषयी फारसे चांगले बोलत नव्हते. ***

* * *

अनेक निरीक्षकांच्या मते ग्रिम बंधूंच्या पंडिती महत्त्वाकांक्षांमुळे नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्स लहान मुलांचे पुस्तक म्हणून अपेक्षित यश गाठू शकले नाही. मौखिक लोकपरंपरा व खास करून ग्राम्य लोकभाषा ह्यांच्याशी ग्रिमंनी राखलेल्या इमानावर खूप टीका झाली. ऑगस्ट विल्हेल्म श्लेगेल व क्लेमेन्स ब्रेन्टानो ह्यांच्या मते ग्रिमंनी थोड्या युक्त्या वापरल्या असत्या तर त्यांच्या संग्रहातील कथांची कलात्मकता व आकर्षकता वाढली असती. ब्रेन्टानोने आर्निमला लिहिले, "मुलांचे कपडे दाखवायचे तर ते बटणतुटके, मळके, शर्ट पॅंटच्या बाहेर लोंबकळणार्‍या अवस्थेत का दाखवा?". आर्निमने ग्रिमंना स्पष्टपणे सांगितले की पुस्तकाच्या भावी आवृत्त्यांत "गोष्टी निवडून मुलांना सांगू शकतील अशा पालकांसाठी" हा उपशीर्षकरूपी इशारा घालणे इष्ट. इतर वाचकांनी इतके सौम्य शब्द वापरले नाहीत. हाइनरिक वॉबने काही कथा वगळता शेष संग्रहास "रद्दी" म्हटले.
* * *
** * नंतरच्या आवृत्त्यांत विल्हेल्म ग्रिमने कथांचा एवढा विस्तार केला की अनेकांची लांबी मूळ कथेहून दुप्पट झाली. तसेच, त्याने कथांची भाषाही सुधारली व कथानकांतील आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याचा प्रयत्न केला. ए. एल.ग्रिम व फ्राइड्रिक रुह्स दोघांनी "रॅपुन्झेल" ही कथा लहान मुलांच्या हाती लागणार्‍या कथासंग्रहासाठी अयोग्य ठरवली. "आपल्या निरागस मुलीला न लाजता रॅपुन्झेलची परीकथा कोणती आई सांगू शकेल?", रुह्स म्हणाला. टीकाकारांच्या आक्षेपांनुसार विल्हेल्म ग्रिमने कथेचे पुनर्लेखन केले. हा संग्रह लहान मुलांसाठी नाही, असे जेकब ग्रिमने ह्या टीकेला प्रत्युत्तर दिले असते, पण त्याचा भाऊ लहानांसाठी अयोग्य कथांमध्ये बदल करायला वा त्या कथा गाळायला तयार होता. ह्यात त्याला त्यांचा भाऊ, फर्डिनांड, ह्याचा पाठिंबा होता. ज्याने वाचकांच्या भावना दुखावल्या जातील असे सर्व काही गाळायला फर्डिनांड तयार होता.
* * * नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सच्या पहिल्या आवृत्तीतील खालील उतारा पहा (वाचल्यावर मनोर्‍यात राजपुत्रासोबत रॅपुन्झेल रोज करीत असलेल्या मस्तीचे 'वजनदार' परिणाम आपल्याला कळतात).

    आधी भयभीत असलेल्या रॅपुन्झेलला लवकरच तरुण राजपुत्र एवढा आवडू लागला की तिने त्याला रोज येण्याची परवानगी दिली. ती रोज त्याला दोरीने वर मनोर्‍यात ओढूनघेऊ लागली. अशा प्रकारे काही काळ दोघे आनंदात राहिले. एके दिवशी जेव्हा रॅपुन्झेल परीला म्हणाली, "काय ग, माझे कपडे इतके घट्ट का झालेत?" तेव्हा कुठे परीला सुगावा लागला. "चांडाळणी, काय केलंस हे!", ती उद्गारली.

नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सच्या दुसर्‍या आवृत्तीत विल्हेल्म ग्रिमने ह्या उतार्‍याचा "चावटपणा" कमी केला - अन्‌ त्याचबरोबर त्याची रोचकताही. इथे, रॅपुन्झेलच्या "चांडाळीण" असण्याचे कारण फार वेगळे होते.

    आधी भयभीत असलेल्या रॅपुन्झेलला लवकरच तरुण राजपुत्र एवढा आवडू लागला की तिने त्याला रोज येण्याची परवानगी दिली. ती रोज त्याला दोरीने वर मनोर्‍यात ओढून घेऊ लागली. अशा प्रकारे काही काळ दोघे आनंदात राहिले, आणि एकमेकांवर पतिपत्नीप्रमाणे प्रेम केले. एके दिवशी जेव्हा रॅपुन्झेल चेटकिणीला म्हणाली, "काय ग, तुला वर ओढणे राजपुत्रास ओढण्यापेक्षा कठीण का आहे?" तेव्हा कुठे तिला सुगावा लागला. "चांडाळणी, काय केलंस हे!", चेटकीण उद्गारली.

रॅपुन्झेलमध्ये केलेल्या बदलांमागे ट्यूटॉनिक सोवळेपणा होता, किंवा ग्रिम बंधूंच्या उचितानुचिताच्या कोमल जाणिवा होत्या हा निष्कर्ष काढणे सोपे आहे. तसे असेलही. परंतु संग्रहावर झालेली टीका विल्हेल्म ग्रिमने मनाला लावून घेतली,व वाचकवर्ग वाढवण्यासाठी योग्य ते बदल केले असे मानणे हे जास्त तार्किक आहे. संग्रहातील कथांविषयी घेतल्या गेलेल्या नैतिक आक्षेपांबद्दल त्याची अस्वस्थ संवेदनशीलता पंडितांपेक्षा मुलांसाठी लिहिण्याच्या त्याच्या वाढत्या इच्छेचे द्योतक आहे.

नर्सरी ऍन्ड हाऊसहोल्ड टेऽल्सच्या पहिल्या दोन आवृत्त्यांमधील वर्षांत विल्हेल्म ग्रिमने संग्रहाला नवी दिशा दिली. पुढे त्याच्या मुलाने असा दावा केला की मुलांनी मुळात त्यांच्यासाठी नसलेल्या पुस्तकाचा ताबा घेतला होता. पण विल्हेल्मने ह्या प्रक्रियेस हातभार लावला हे उघड आहे. त्याने जेकबच्या परोक्ष काही संपादन केले, पण तेवढे टीकाकारांसाठी पुरेसे नव्हते. दुसर्‍या आवृत्तीची प्रस्तावना, लहान मुलांसाठी ह्या गोष्टी किती मौल्यवान आहेत ह्यावर जोर देते, आणि मग - पश्चातबुद्धी झाल्याप्राणे - त्या मोठ्यांनाही आवडतील व मोठेही त्यांच्यापासून बोध घेऊ शकतील अशीही नोंद करते. मौखिक परंपरांशी शब्दश: इमान राखण्याचा आग्रह ग्रिमंनी सोडून दिला होता. "मुलांनी वाचण्यायोग्य नसलेला प्रत्येक वाक्यांश" कटाक्षाने गाळून टाकल्याचे त्यांनी जाहीरपणे कबूल केले, व आपला संग्रह "शिष्टाचाराची नियमपुस्तिका" म्हणून वापरात येईल अशी आशा व्यक्त केली.

* * *

१ : अनएक्सपर्गेटेड
२ : म्यूटिलेशन
३ : इन्सेस्ट
४ : ग्रिमंनी कथांतून हिंसक भाग वगळल्याचा चुकीचा दावा जॉस्ट हर्मॅन्ड करतो. ("Biedermeier Kids: Eine Mini-Polemik," Monatshefte 67 [1955]: 59-66). ह्याच्या विरोधात जॉन एलिस म्हणतो की "त्यांच्या नैतिक दृष्टिकोणातून जेव्हा पात्रांना तशी शिक्षा मिळायला हवी होती तेव्हा त्यांनी कथांतील हिंसा व क्रौर्य वाढवले." [वन फ़ेरी स्टोरी टू मेनी: द ब्रदर्स ग्रिम ऍन्ड देअर टेल्स (शिकागो: युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस, १९८३), पृष्ठ ७९.]
५ :  Die Kinder- und Hausmärchen der Brüder Grimm: Vollständige Ausgabe in der Urfassung, ed. Friedrich Panzer (Wiesbaden: Emil Vollmer, 1953), पृष्ठ १५५
६ : डॉरोथिया विहमनची कथा हाइन्ज़ रोलेकने १८५६ साली प्रकाशित केलेल्या ग्रिमच्या कथासंग्रहाच्या [Brüder Grimm: Kinder- und Hausmärchen (Stuttgart: Reclam, 1980), तिसर्‍या खंडात पृष्ठ १९२-९३वर आहे.
७ : "द फ्रॉग किंग ऑर आयर्न हाइनरिक"च्या मूळ प्रतीसाठी पहा Die älteste Märchensammlung der Brüder Grimm: Synopse der handschriftlichen Urfassung von 1810 und der Erstdrucke von 1812, ed. Heinz Rölleke (Cologny-Genève: Fondation Martin Bodmer, 1975), पृष्ठ १४४-४६.
८ : ए. एल. ग्रिम हा जेकब व विल्हेल्म ग्रिमचा नातलग नव्हता.
९ :  Die Kinder- und Hausmärchen der Brüder Grimm, ed. Friedrich Panzer, पृष्ठ ८५