मनाच्या आभाळी सांज दाटून आली
तुझ्या प्रितीच्य़ा लांबल्या सावल्या
रोजची वाटही आज गेली मुक्याने
पक्षिणी मैत्रीणी दूर का धावल्या
मिळाला तुझा सांजरंगी निरोप
क्षितिजावरी ठेवला हुर्मुजी तू
जुळवुनी अक्षरे तांबडी वाचताना
आशा निराशा खेळल्या की हुतूतू
निष्पाप आहे मनी रानजाई
आताही गंधाळते विश्व सारे
जरी हरवलेला असे स्वर्ग माझा
उगवले तरी कसे दूर तारे
तुझ्या पैंजणांचा रोज करतात हेवा
वाहती पहा आज निर्झर खुषीने
चाहूलीची सखे शीळ ओठात माझ्या
अशी आतल्या आत विरली कशाने
कोणत्या दिशेने गेली कळेना
पेरीत विरहास तुझी पाउले
उभे राहिले काहूराचे आडोसे
झाले मनाचे संशयी बाहूले
उ. म. वैद्य २०१२.