नवीन सुरुवात: भाग पहिला राहुल

          पाठीला बॅकपॅक लावून राहुल रिक्षातून खाली उतरला. आकाशी रंगाचा कडक इस्त्रीचा शर्ट, काळी पॅट, काळे शूज. गव्हाळ रंग, मध्यम बांधा, काळे नीट वाळवलेले केस, साधारण ५' ८'' उंची. सुरुवातीला पाहिले तर सामान्य वाटणारे व्यक्तिमत्व. पण अनेकवेळा पेपर मधे छापून आलेल्या फोटोत असेही उंची थोडीच कळते? नेहमीचा कोन्फिडन्स चेहऱ्यावर घेऊन तो कंपनीच्या गेटजवळ पोचला. त्याने तिथल्या सिक्युरिटीला आपले ऑफर लेटर अभिमानाने दाखवले आणि विझिटर पास घेऊन तो आता शिरला. पूर्वतयारी म्हणून कंपनीच्या सर्व कॅंपसचे फोटो त्याने कितीतरी वेळा पाहीले होते. तरीही आत गेल्यावर समोर दिसणारी हिरवीगार गवताची सुंदर शाल, छान आकार दिलेली खुरटी झाडी, त्यात मध्यभागी उंचच उंच कारंजे आणि या सर्वांच्या मध्ये विखुरलेल्या पाच मोठ्या इमारती हे सर्व दिसलं आणि आपले या कंपनीत सेलेक्शन झालेय याचा त्याला खूप अभिमान वाटला. तसे प्रत्येक उत्कृष्ठ गोष्टं त्याने स्वत:च्या कष्टाने, हक्काने मिळवली होती आतापर्यंत. मग ते त्याचे बोर्डात आल्याने मिळालेले उत्तम कॉलेज असो, मार्कांच्याच जोरावर झालेले त्याचे सिलेक्शन असो किंवा ट्रेनिंग नंतरही पुणेच हवं असे भरलेला त्याचा फॉर्म असो. त्याची शैक्षणिक कारकीर्द त्याला आतापर्यंत नुसतेच हवे ते नाही तर त्यासोबत एक स्टेटसही देत होती. त्यामुळे प्रत्यके ठिकाणी मिळणारी 'रेड कार्पेट' वागणूक जणू त्याला ओळखीचीच.
     आज इतक्या मोठ्या कंपनीच्या एव्हढ्या मोठ्या कॅंपसमध्ये त्याला थोडे हरवल्यासारखे वाटले होते. पण तेही होईल कमी असे स्वत:ला समजावून तो रिसेप्शन पाशी गेला. तिथे त्याने त्याच्या मेनेजरचे नाव सांगितले, 'मनोज शर्मा'.
'कुठला मनोज शर्मा? ' तिने विचारले, 'इथे चार आहेत'. त्याने मग त्याला मिळालेल्या प्रोजेक्टचे नावही सांगितले. रीसेप्शनीस्ट ने नंबर शोधून त्याला फोन करून खाली यायला सांगितले.
एक मनोज शर्मा खाली आला. त्याने राहुल ला हात मिळवून ओळख करून घेतली. त्याला सांगितले की मी इथल्या प्रोजेक्टचा लीड आहे. 'मी राहुल घोरपडे', थोडे जोराने बोलला राहुल. पण त्याच्या नावावरून मनोज शर्माला काही क्लिक झाले असे वाटले नाही. मग जास्त अपेक्षा न करता राहुल त्याच्यासोबत लिफ्टमधून आठव्या मजल्यावर गेला. तिथे ते दोघे थेट एका कॉन्फरन्स रुममध्ये गेले. तो गेला तेव्हा तिथे अजून ३ लोक खुर्च्यात बसले होते. एका खुर्चीत तो बसला. थोड्या वेळात एकेक करून मनोज शर्मा अजून ४ पोरांना घेऊन वर आला होता. एकूण त्याच्यासारखी ८ मुले, दोन वयस्कर (२८- ३२ वर्षे? ) वाटणारे लोक आणि पुन्हा एकदा मनोज शर्मा अशी मिटिंग झाली. मनोज शर्मा ने त्याची ओळख करून दिली. तो कंपनीत गेले १० वर्षं काम करत होता आणि त्याच्या वयाच्या मानाने बराच मोठा हुद्दाही होता त्याचा. ग्रुप लीडचा. त्याने बाकी मुलांची आणि मोठ्या (? ) लोकांची ओळख करून दिली. त्यांना सांगितले की कॉलेजमधलं आयुष्यं कसं सोपं होतं आणि इथे बाहेरच्या जगातले नवीन अनुभव त्यांना मिळतील. त्यातही वेगवेगळ्या गोष्टीवर काम करायला मिळेल त्यांना या मोठ्या कंपनीत. प्रोजेक्ट होता अमेरिकेतला, तो क्लाएंट किती महत्वाचा आहे हे सर्व झालंच. राहुलने पाठ केलेले SDLC (Software Development Life Cycle) चे सर्व धडे आठवले आणि त्यातले सर्व शब्द इथे जोडण्याचा प्रयत्न केला. त्याला खूप आनंद झाला होता. आपल्याला मनोज शर्मा जे बोलतोय हे कळतंय याचा.
       आनंद होणारच ना. सरकारी इंजिनीयरींग कोलेज मध्ये त्याला मेकेनिकल ब्रांच मिळाली होती. तिथेही सर्व नेहमी सारखच मग. अभ्यास, नंबर, कॅंपस. पण जेव्हा कंपन्या यायला लागल्या तेव्हा त्याला कळलं की डिग्री कुठलीही असली तरी पैसा IT मध्येच आहे. मग एकदा निर्णय घेतल्यावर त्याने परत एकदा मनापासून अभ्यास केला वेगवेगळ्या कम्प्युटर मधल्या भाषांचा, कन्सेप्टचा. त्यामुळे आज तो सर्व अभ्यास उपयोगी पडणार असे त्याला वाटले. बाकी लोक जे लेक्चर म्हणून ऐकत होते, तो ते मन लावून ऐकत होता आणि मध्ये काहीतरी लिहूनही घेत होता. त्याने विचारलेल्या प्रश्नांची मनोज शर्माने नीट उत्तरं दिली होती. सर्व बोलून झाल्यावर मनोज शर्माने त्यांना सांगितले की आता या पुढचे सर्व तुमचे टीम लीड सांगतील. ऑल द बेस्ट म्हणून तो निघून गेला. दोन टीममध्ये कुठली बेस्ट असेल याच्या विचारात राहुल गुंगला होता.
       पाणी प्यायला जाऊन येताना त्याने त्या मोठ्या दोघांना बोलताना ऐकले.
प., ' अरे मुझे एक डेव्हलपर तर लागेल ना. दोन मेकैनिकलच्या पोरांना घेऊन मी काय करू? आणि मनोज ने बोला है की टीममे एक तो डेव्हलपर होना ही चाहिये. '
दु. ' अरे पण माझ्याकडे काम पण जास्त आहे न. आणि तुला काय दोन लोक मिळतील टेस्टिंगला. '
राहुलला फार राग आला होता की आपल्या ब्रांच मुळे कुणाला तरी आपण नको आहोत. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला असं वागवलं होतं कुणीतरी. 'मी काय कमी हुशार आहे का? '
शाळेत कमी मार्क आहेत म्हणून मागे बसायला लागणाऱ्या मुलांसारखे, डिग्रीला एखादे वर्षं राहिलेल्या मुलाला मिळावी तशी वागणूक आपल्याला मिळतेय असे वाटले राहुलला. त्याला याची सवय नव्हती. पण समोर जाऊन त्यांना काही बोलणं शक्य नव्हतं. त्याने ऐकलं होतं की सुरुवातीचे थोडे दिवस त्याला जसे काम मिळेल तसे करायला लागणार होते आणि मग तो थोडा सिनियर झाला की प्रोजेक्ट बदलून घेता येईल त्याला. तो थोडा अस्वस्थ होऊन जागेवर आला. त्यादिवशी ८ लोकांची समान गटांत वाटणी झाली.
          त्याच्या प्रोजेक्टमध्ये तो टेस्टर म्हणून काम करणार हे फायनल झाले होते. नेहा म्हणून एक डेव्हलपर आणि अजून दोघांची सपोर्ट साठी नेमणूक झाली होती. सपोर्टसाठी ठेवलेल्या दोघांनाही तसा राग आलाच होता की आता त्याना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे लागणार होते. पण सपोर्टला असले की रात्रीच्या शिफ्टमध्ये पैसे मिळतात जास्त (शिफ्ट अलाउन्सचे) हा फायदा होताच. सिद्धार्थ, त्यांचा टीम लीड, त्यांना त्यांचे डेस्क दाखवायला घेऊन गेला. एका मोठ्या फ्लोअरवर वरून पहिले तर ग्रीड आहे असे वाटणारे क्यूब. त्यात मन लावून काम करणारे काही, लोक जातआहेत बाजूने म्हणून मन लावून काम करण्याचे नाटक करणारे काही, तर महत्वाचे बोलत आहोत असे भासवून नवीन आलेल्या लोकांमध्ये कुणी चांगली पोरगी आहे का बघणारे काही. ते चौघे मग सिद्धार्थच्या मागे गेले. आपल्याला कसा डेस्क मिळणार याची उत्सुकता होतीच. फ्लोअरच्या शेवटच्या रांगेत ओळीने चार डेस्क त्यांना मिळाले होते. आता कुणी म्हणेल मुद्दाम कोपर्यातले डेस्क दिले नवीन पोरांना. पण मला विचाराल तर कोपर्यातला डेस्क म्हणजे सुख!! आपल्या जागेवर स्वत:चे नाव आधीच लावलेलं पाहून चौघेही खुश झाले होते. सिद्धार्थ त्यांना सेटल व्हायला सांगून निघून गेला.
       आता ते चौघे सेटल झाले. राहुलने आपल्या बॅकपॅकमधून नोटबुक, पेन काढून ड्रावरा मध्ये ठेवले. बॅकपॅक कोपऱ्यात टेकवला आणि फॉर्म भरलेत ना नीट हे चेक करून घेतले तोवर बाकीचे तिघे खायला जाण्यासाठी तयार झाले होते. सगळ्यांशी नीट ओळख करून घेतली त्याने. आणि तासभर जेवताना थोडंफार बोलणही झालं प्रत्येकाबद्दल. पण नेहमीसारखी मजा नव्हती त्यात. कॉलेजमध्ये वगैरे कसं नावं सांगितलं की बाकीचे लोक स्वत:हून विचारायचे त्याच्याबद्दल. इथे तो मान नव्हता त्याला. जेवणा नंतर आता काय काम करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मग स्वत:च पुढाकार घेऊन राहुलने कुठल्या गोष्टीला एक्सेस लागतो, तो कसा मिळवायचा हे सर्व माहिती काढली. सर्वांना मदत करून ते फॉर्म त्याने देऊनही टाकले सिद्धार्थकडे. तेही काम झाल्यावर आता पुढे काय प्रश्न होताच. पुन्हा एकदा कामात व्यस्त असलेल्या सिद्धार्थ कडे गेला राहुल. 'सर, व्हॉट इज नेक्स्ट? '. 'सिद्धार्थने त्याला सांगितले, 'यहा सर-वर कुछ नही चलेगा. सिड भी बुला सकते हो. थोडे डॉक्युमेंट है पढना है तो'.
त्याने मग थोडे पेपर दिले वाचायला. तो गेल्यावर शेजारचा लगेच म्हणालाच, 'बंडा बडा काम करनेवाला लागता है. '
' आज पहेला दिन है ना. इसलिये. थोडे यहा रहेगा तो तुम्हारे जैसा हो जायेगा'. हसत हसत सिद्धार्थ म्हणाला.
जाता जाता हे ऐकून राहुल अजूनच नाराज झाला आपल्या सिन्सियारीटी बद्दल कुणी शंका घेतंय हे त्याला अजि बात आवडलं नाही. मिळालेले पेपर वाचण्यात ६ वाचलेही. सगळे निघाल्यावर राहुलही रूमवर जायला निघाला. त्याच्यासोबत त्रेनिम्गाला असलेल्या एका मुलासोबत त्याने एक फ्ल्याट भाध्याने घेतला होता. तासभर प्रवास करून तो रूमवर पोचला. रात्री जेवण करून घरी फोन लावला त्याने. पलीकडून आई विचारात होती, 'कसा गेला रे दिवस? ' त्याच्या बोलण्यात तो नेहमीचा उत्साह नव्हता. त्याच्या करियरचा पहिला दिवसा होता तो....

क्रमश:

विद्या.