तू सोबतीस जोवर, तोवर मजेत आहे!
आकाश आणि धरणी माझ्या कवेत आहे!!
माझी खबर मलाही नाही, परिस्थिती ही.....
सध्या तिन्हीत्रिकाळी, मी तर हवेत आहे!
सत्ता असो सुबत्ता, पैसा असो प्रसिद्धी....
धुंदी कशात नाही? जो तो नशेत आहे!
हसतो दुरून नुसते पाहून एकमेकां....
काही तरी जगाला मी देतघेत आहे!
हे सत्य की, मलाही, मी वाटतोच बोजड;
बोजा निदान माझा, मी आज नेत आहे!
चुकले कितीक वेळा तारुण्य मातलेले!
वार्धक्य तोच पाढा वाचून घेत आहे!!
आहे निवास त्याच्या वचनी सरस्वतीचा!
दिलखेच एक जादू त्याच्या सभेत आहे!!
लेबल नकोस पाहू, त्या सर्व भेटवस्तू....
अनमोल मोल त्यांचे त्या भावनेत आहे!
पैसा बघून हल्ली जुळतात सर्व नाती;
पाया मुळात ज्यांचा त्या वासनेत आहे!
कोणास दोष देवू? कोणास बोल लावू?
माझाच हात माझ्या या वंचनेत आहे!
येईल या जगाला प्रचिती भविष्यकाळी.....
सामर्थ्य काय माझ्या या प्रार्थनेत आहे!
ती गझल वेदनेची हृदयास थेट भिडते....
स्पंदन अनाहताचे ज्या वेदनेत आहे!
घर हे पडीक आहे, पण हे पवित्र आहे!
पदस्पर्श विठ्ठलाचा त्याच्या विटेत आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१