ओढणी.. साजणी..
माथा गळ्यास झाकते
एक ओढणी सजून
काय कवतिक तिचे
घे गं जरा समजून
उन्हा तान्हात साजणी
येते सावली बनून
कोणी नवखा दिसता
घेते अंगही झाकून
सार्या अंगा-खांद्यावर
कशी दिसते शोभून
एकटीने जाता येता
धीर देई उमजून
भंवताल दिसे नवा
जेव्हा ओढणी आडून
निरख तू वास्तवाला
नको जाऊस भुलून
किती जणी सख्या तुझ्या
देती ओढणी फेकून
क्षणिकाच्या सुखाला त्या
गेल्या भुलून फसून
ओढ लागते जीवाला
निसर्गाचे सारे देणे
घेई पारखून नीट
दान पदरात घेणे
ओढणीच साथ देई
पुढे पदर होऊन
रुप बदलून होई
बाळा माय पांघरुण...