तारा कुणी मनाच्या या छेडल्या अचानक?

रसिकहो!
आमच्या रानफुले’ या १९९२साली प्रकाशित झालेल्या प्रथम गझलसंग्रहातील आमची एक खूप जुनी गझल देत आहोत, जी आमच्या उमेदवारीच्या काळातील आहे. आपण समजून घ्यालच अशी आशा करतो.
..........प्रा.सतीश देवपूरकर

तारा कुणी मनाच्या या छेडल्या अचानक?
माझ्या नसानसा का झंकारल्या अचानक?

येऊन ठेपलेला होता वसंत दारी.....
स्वप्नातल्या कळ्या का कोमेजल्या अचानक?

मी हुंदक्यास माझ्या येऊ दिले न ओठी;
का पापण्या फुलांच्या पाणावल्या अचानक?

होते बऱ्याच वेळा त्यांना बजावले मी....
तुज पाहताच नजरा भांबावल्या अचानक!

हातात हात ज्यांच्या देऊन मी निघालो;
अर्ध्यावरीच वाटा त्या लोपल्या अचानक!

हा सूर्य ऐन दिवसाढवळ्या कुणी दडवला?
दाही दिशा कशा या अंधारल्या अचानक?

खाणाखुणा कुणाच्या पाहून पावलांच्या,
जखमा जुन्यापुराण्या गंधाळल्या अचानक!
                      
  -------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१