चावणे आमचा धंदा

चावणे हा धंदा आहे व त्यात भरपूर मान सन्मान आहे ह्याचे दृश्य स्वरूप लोकसभेतील विश्र्वास मताच्या गोंधळापासून ते गुजराथ निवडणूक निकाल पर्यंत घडलेल्या तमाशातून मी बघितले आहे.

दूरचित्रवाणीच्या धंद्यात 'बाइट' हा फार महत्त्वाचा प्रकार आहे. बाइटचा कालावधी सेकंदात मोजतात व त्याचे मानधन त्या मापात दिले घेतले जाते. ह्या बाइटच्या शोधात वाहिन्यांवर सतत वावरणारी हि चावकर मंडळी चावणे व्यवसायात खास प्रशिक्षित आहेत. हि मंडळी वरिष्ठ पत्रकार ह्या नावाने प्रसिद्धी मिळवतात.   चावकर मंडळी जाती व्यवस्थेचे विरोधक असूनही त्यांच्यातील प्रचिलीत जाती व्यवस्थेला चिकटून आहेत. त्या जाती थोडक्यात माला अशा दिसल्या, आवाज उठवणे, मिळेल तिथे चावे घेणे, लचके तोडणे, चावून चोथा करणे वगैरे वगैरे...
आवाज उठवणे जातीचा पेहराव ठरावीक पद्धतीचा असून, केस विखुरलेले, कपडे चुरगळलेले / विस्कळीत, जन आंदोलनांच्या त्रासाने घामेजलेला बीना मेकअपचा चेहरा असा काहीसा प्रकार असतो.
मिळेल तिथे चावे घेणे जातीचा पेहराव व हावभाव सामान्य निरुपद्रवी वाटावा इतका साधा असतो. चावा घेताना कोणी अडवले तर पटकन माघार घेण्यास सदैव तयार असतात.
लचके तोडणे जातीचा पेहराव व हावभाव जरा हटके असतो. बरीच वर्षे लचके तोडल्याने चळवळीचे नेते, संपादक वगैरे असतात. सर्व प्रकारच्या कार्यक्रमातून ह्यांची हजेरी असते.
चावून चोथा करणे जातीच्या व्यक्ती जाड चष्म्याच्या मागचे डोळे वाक्यांची जुळवाजुळव करत शांतपणे खुर्चीत दबा धरून असतात. संधी मिळताच अनाकलनीय आकडेवारीचा गुंता घेऊन विषयांतर करण्यात चर्चेचा वेळ खातात.
हे चावकर आपापल्या गल्ली रस्त्याचे नियम मात्र चोख पाळतात. ह्यांचे काही ठळक रस्ते - सरकारची नीती, मानवी हक्क, समाज व्यवस्था, परराष्ट्र संबंध, संरक्षण व्यवस्था, गुन्हे व गुन्हेगार, खेळ/ खेळ पट्टी/ वगैरे, वगैरे....अशा ठळक रस्त्यांना सोयीस्कर असेल तेव्हा अनेक गल्ली-बोळ जोडले जातात.
चावण्याची सवय बालवयात सुरू होते. हा प्रकार माझा मुलगा बालवाडीत होता तेव्हा मी अनुभवला होता. एका मुलीने माझ्या मुलाची नवीन पेन्सिल ओढण्याचा प्रयत्न केला होता, मुलाने पेन्सिल दिली नाही म्हणून ती मुलगी त्याला चावली होती. दोघांच्या पालकांना शाळेत बोलावले होते. मुलीच्या आईने कबूल केले होते, वस्तू कोणी दिली नाही की जोरात चावायचे असे तिनेच मुलीला शिकवले होते. मी मुलाला हे का शिकवले नाही ह्याचे मला तेव्हा फार वाईट वाटले होते.
असेच एकदा आम्ही काही मित्र एका सुट्टीला आमच्या उच्च पदस्त अधिकारी मित्राच्या घरी एकत्र जमलो होतो. गप्पा रंगल्या होत्या, तेवढ्यात त्याच मित्राची धाकटी मुलगी रडत आई जवळ गेली, तीच्या आईने समजूत घातली, मुलगी निघून गेली. थोड्या वेळाने ती धाकटी मोठ्याने रडत आईकडे गेली, तिची आई आम्हाला कळेल इतक्या मोठ्या आवाजात गरजली, तिने धाकटीला त्रास देणाऱ्या मुलाच्या मांडीचा जोरात चावा घेण्याचा सल्ला दिला होता. ज्या मुलाला ती मुलगी चावली होती त्याने तिचे डोके जमिनीवर आपटले होते. त्या सुट्टीचा त्या चावण्याने तमाशा झाला होता.हे असे बाळकडू मिळाल्यावर ही अशी मुले पुढे चावणे विषयातील विविध रस्त्यांचे तंत्रज्ञ होत असावेत.
दूरचित्रवाणीच्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील चर्चा प्रकारांचे निरीक्षण करताना बऱ्याच गोष्टींचा अर्थ नव्याने लक्षात आला आहे. ह्या चावकरांचे हाव-भाव त्यांचे पेहराव बघताच मी त्या व्यक्तीची चावकर जात, रस्ता व गल्ली बोळ ओळखतो.अहो मीच काय कोणीही थोड्याफार निरीक्षणाने ओळखू शकेल. आता तर चावकर व्यक्तीने तोंड उघडण्या पूर्वीच कोणती वाक्य पचकणार त्याचे भाकीत मी सहज करू शकतो. हिंदी व इंग्रजी भाषेतील चावकर मंडळी मात्र नटून थाटून त्यांचा धंदा चालवतात. बहुतेक त्यांना मराठी वाहिनी पेक्षा हिंदी व इंग्रजी वाहिनी तर्फे जास्त बिदागी मिळत असावी.
त्या कसाबला फाशी का देऊ नये हे दिमाखात कॅमेरा समोर सांगणाऱ्या चावकर व्यक्ती सीएसटी गोळीबारात का बळी गेल्या नाहीत हे मला खुपले होते. ह्या चावकरांना मानधन देणारे कोण असावेत हा प्रश्र्न बरेच दिवस मला त्रास देत होता, पण सत्याला सामोरे होण्यास घटना घडाव्या लागतात.
मला माझा शेजारी आठवला, एकदा तो घरात नव्हता, फोन कंपनीच्या माणसाने ५० पानाचे त्याचे बील माझ्या घरात टाकले होते. प्रत्येक संभाषण ४० ते ५० सेकंदाचेच होते. ते प्रत्येक संभाषण सट्ट्याची बोली होती ही माहिती त्यानेच मला दिली होती. हो की नाही, बरोबर की चूक, ९ की १० रानास, ऑऊट की नो बॉल, . . . . . .माझे डोके गरगरले होते. म्हणूनच की काय आजकाल शाळा कॉलेजातून खरे का खोटे, हो की नाही अशा प्रश्र्नांचा सराव होण्या करता खास महत्त्व दिले जात असावे. पण क्रिकेट मधील सट्ट्याची सत्यता पाकिस्तानी खेळाडूंनी पटवून दिली. दक्षिण अफ्रिकी खेळाडूला तर जीवे मारले गेले.
गुजराथ निवडणूकीने सट्टे बाजांचा खूप धन लाभ झाला आहे. म्हणूनच प्रत्येक वाहिनीने चावकरांच्या सोबतीने १२ तास टाहो फोडला होता. बोली लावणाऱ्याचा दर १० मिनीटाला कसा फायदा तोटा होईल ह्याची पूर्ण काळजी घेतलेली होती. सट्टा चालवणाऱ्यांचा दर १० मिनीटाला कारोडने फायदा होण्यात ह्या वाहिन्यांनी फार सहजतेने मदत केली. कदाचीत ह्याच काराणांमुळे वाहिन्यांचा धंदा फायदेशीर होत आहे. ह्या देशात बलात्काराचे निर्घृण प्रकार दर तासाला घडले आहेत व घडत आहेत पण राजधानीतल्या बलात्काराचा गलिच्छ ओंगळवाणा सट्टा खेळला जात आहे. फाशी असावी की नसावी, भर रस्त्यात आरोपीला यातना द्याव्या की नाही अशा अनेक प्रकारांनी बोली लावली जात आहे. हा प्रकार थांबवण्याची कोणात हिंमत आहे का?????? लोकशाहीचा जयजयकार असो !!!!!!!!
हि चित्रफीत पाहून मोफत सुख देण्या-घेण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे. हि चित्रफीत मी मागील महिन्यात तयार केली होती.