प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!
ही हवीशी वाटणारी शृंखला आहे!!
ते कुठे संस्कार? संध्योपासना कोठे?
आज कोणाच्या कटीला मेखला आहे?
का न व्हाव्या चित्रदर्शी माझिया गझला?
ही न नुसती लेखणी, हा कुंचला आहे!
झोप रात्रीची उडाली, ना मन:शांती.....
झोपडीचा आज झाला बंगला आहे!
कोणतीही खेळ खेळी जीवना आता.....
आज जगण्याचाच झाला फैसला आहे!
द्रृष्ट माझी लागली माझ्याच प्रतिमेला;
आरसा तेव्हाच माझा भंगला आहे!
दागिन्यांची हौस तुजला, मी असा साधा!
ठेव तू मोती तुला, मज शिंपला आहे!!
जोम व्याख्यानात माझ्या तोच पूर्वीचा.....
मान्य, की, हा देह आता खंगला आहे!
सोस आहे, आव आहे गझल लिहिण्याचा!
कोण गझलेच्या नशेने झिंगला आहे?
ऐकते माझी चिताही भाषणे सारी!
सोहळा श्रद्धांजलीचा रंगला आहे!
..............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१