ओळखू नाही मला आला सुखाचा चेहरा!

गझल
ओळखू नाही मला आला सुखाचा चेहरा!
कोणताही चेहरा नव्हता पुरेसा हासरा!!

जोडता आली मलाही निरनिराळी माणसे....
सांधता नाही स्वत:चा एकही आला चरा!

तू दिली आहेस अगदी वेगळी मुक्ती मला;
लागले वाटू मला आकाश सुद्धा पिंजरा!

मी घरापासून जेव्हा दूर जाऊ लागलो....
लागला पायात घोटाळू घराचा उंबरा!

शेवटी का होइना, आलोच मी ओठी तिच्या!
जाहलो होतो तिच्या मी काळजाचा कोपरा!!

मी कुठे जाऊ? कुठे फिर्याद माझी नोंदवू?
मारले ज्याने मला तो एक होता सोयरा!

वेचल्या काड्याकुड्या बांधायला मी झोपडी;
शोधला नाही कुणाच्या वळचणीचा आसरा!
   
शेलकी वाक्ये पहा थुंकेल तो तुमच्यावरी....
त्याचिया तोंडात शब्दांचाच असतो तोबरा!

आज जगताना तुझ्यावाचून ऐसे वाटते....
दोर तुटलेला जणू आडातला मी पोहरा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१