(आमच्या रानफुले गझलसंग्रहातून)
समजून घ्यालच!
गझल
मनातल्या मनात हे कुणी मला पुकारले?
फिरून मोहरून अंग अंग हे शहारले!
लपेटुनी धुके, पहाट अंगणी उजाडली;
फुलाफुलात की, तुझेच स्वप्न हे दवारले?
तुझीच घेवुनी प्रभा, प्रभात रोज उगवते!
तुझ्यामुळेच हे वसंत एवढे फुशारले!!
मधेच ही झुळूक काय सांगते अशी अम्हा;
मनाचिया वनात पान पान का थरारले!
तिच्यासवे बराच काळ मी निवांत बोललो!
अजून आठवे न काय मी तिला विचारले?
बघून चित्र एवढी करू नकोस तू स्तुती;
तुझेच रंग घेवुनी तुलाच मी चितारले!
तुझी फुले, तुझीच बाग, हे वसंतही तुझे!
तरी स्वत:स तू उगाच का असे झुगारले?
जरा कुठे विसावण्यास थांबता तरूतळी;
डसावया अम्हावरी फणे कुणी उगारले?
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१